दाशरथि

दाशरथि : (१० फेब्रुवारी १९२७ –  ). प्रसिद्ध तेलुगू कवी. त्यांचे संपूर्ण नाव दाशरथी कृष्णम्माचार्य असे असून त्यांचा जन्म वरंगळ जिल्ह्यातील चिन्नगुडुरू येथे झाला. वडील वेंकटाचार्य यांच्याजवळ ते संस्कृत व तेलुगु शिकले. हायस्कूलपर्यंतचे शिक्षण खम्मम येथे उर्दू माध्यमातून झाले. त्यामुळे उर्दू व फार्सी भाषांचा अभ्यासही त्यांनी केला. १९४२ सालापासून त्यांनी राष्ट्रीय कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. हैदराबादच्या स्वातंत्र्यचळवळीत त्यांनी मोठ्या हिरिरीने भाग घेतला. त्यांना लहानपणापासून कविता करण्याचा छंद होता. निजामाच्या हस्तकांकडून गांजल्या गेलेल्या पीडित जनतेच्या दुःखास दाशरथींनी वाचा फोडली. गावोगाव फिरून व वीररसपूर्ण कविता गाऊन त्यांनी तेलंगणातील जनतेत जागृती करण्याचा प्रयत्न केला. वरंगळ आणि निझामाबाद येथील तुरुंगांत असताना त्यांनी बऱ्याच उद्‌बोधनपर कविता लिहिल्या. निझामाबादच्या तुरुंगात त्यांच्यावर काही रझाकारांनी हल्ला केला होता पण त्यातून ते वाचले.

हैदराबाद १९४८ मध्ये भारतात विलीन झाल्यानंतर त्यांनी शिक्षणखात्यात नोकरी केली. नोकरी करून ते बी. ए. झाले. १९५१ साली त्यांनी तेलंगण लेखक संघाची स्थापना केली. याच सुमारास त्यांनी चित्रपटगीतेही लिहिण्यास सुरुवात केली. हैदराबाद व मद्रास येथील आकाशवाणी केंद्रांवरही त्यांनी काम केले.

आजपर्यंत त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. अग्निधारा (१९४९), रुद्रवीणा (१९५०), महांध्रोदयम् (१९५५),पुनर्नवम् (१९५६), अमृताभिषेकम् (१९६३), महाबोधि (बुद्धचरित्रावरील काव्य–१९७१) हे त्यांचे संग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या तिमिरमुलो समरन् (१९७३) या संग्रहास साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांचा आलोचना लोचनालु नावाचा एक निबंधसंग्रहही प्रकाशित झाला आहे. त्यांनी दाशरथिशतकम् नावाचे एक काव्य लिहिले आहे. आकाशवाणीत काम करीत असताना त्यांनी अनेक संगीत रूपकेही लिहिली. त्यांच्या कवितांतून देशप्रेम, विशेषतः तेलंगणावरील प्रेम, व्यक्त झाले आहे. ‘तेलंगाणा कोटिरत्नाल वीणा’ ही त्यांची काव्यपंक्ती आंध्र प्रदेशात फार प्रसिद्ध आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून दलितवर्गाविषयीची अपार सहानुभूती व शोषक वर्गाविषयीची सात्त्विक चीड व्यक्त होते. त्यांच्या जवळजवळ प्रत्येक कवितेतून सामाजिक विषमतेचे खंडन, क्रांतीचा पुरस्कार आणि विश्वकल्याणाची तळमळ व्यक्त होते. त्यांच्या चित्रपटगीतांत वास्तवता व माधुर्य यांचा मनोज्ञ संगम झालेला दिसून येतो.

लाळे, प्र. ग.