शास्त्री, भागवतुल सदाशिव शंकर : (३१ ऑगस्ट १९२५–४ जून १९९८). आधुनिक तेलुगू कवी. टोपणनाव ‘आरुद्र’. जन्म आणि शिक्षण विशाखापटनम्‌ येथे. १९४२ च्या छोडो भारत चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले. नंतर शाही विमानदलात नोकरी (१९४३–४६). १९४६ साली विशखापटनम्‌ला परत येऊन छायाचित्रणाचा व्यवसाय. पुढे ते चेन्नईला आले (१९४९) व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत संवादलेखन व गीतकार म्हणून कीर्ती मिळविली.

‘आरुद्र’ यांनी वयाच्या सतराव्या वर्षी लोह विहंगळु हे काव्य लिहिले. सामाजिक सुधारणावादी अभ्युदयकवी. परंपरेच्या तसेच श्रीरंगम्‌ श्रीनिवासराव या ज्येष्ठ तेलुगू कवीच्या प्रभावातून त्यांनी पुढे मार्क्सवादी वळणाच्या कविता लिहिल्या. त्वमेवहम्‌ (१९४८) या काव्यसंग्रहात तेलंगणातील जनतेने रझाकारांविरुद्ध केलेल्या बंडाचे चित्रण आहे. यातील विपुल प्रतीके व प्रयोगशीलता उल्लेखनीय आहे. सिनेवाली (१९६०) या काव्यसंग्रहात त्यांच्या क्रांतिकारी सामाजिक विचारसरणीचे दर्शन घडते. त्यांच्या भावगीतांचे अनेक संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. उदा., येमे (१९५४), कूनलम्मा पद्यालू (१९६४), एंचिन पद्यालु (१९६५), इंटिंटि पद्यालु (१९६९), पैला पच्चीसु (१९६७ २५ वर्षांतील कवितांचे संकलन). १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या प्रसंगी त्यांनी अनेक देशभक्तिपर कविता लिहिल्या.

‘आरुद्र’ यांच्या काव्यशैलीवर ‘ श्री श्रीं’ प्रमाणेच ⇨ टी. एस्. एलियट व ⇨ एडवर्ड एस्टलिन कमिंग्ज या इंग्रजी कवींचाही प्रभाव जाणवतो. वैज्ञानिक प्रतिका-प्रतिमांचा वापरही त्यांनी वैपुल्याने केला आहे. आधुनिक संस्कृतीत होणारी मानवाची कुचंबणा, अगतिकता व व्यक्तीचा एकाकीपणा यांचाही प्रत्यय त्यांची कविता देते. त्यांची गद्यगीते (वचनगेय) नादमधुर आहेत. तेलुगूतील उत्साहम्‌, स्वागतम्‌, दंडकम्‌ इ. जुने छंद त्यांनी वापरले, तसेच काही नवीन छंदही रूढ केले. ‘आरुद्रां’च्या गद्यरचनेत विरामचिन्हे जवळजवळ लुप्तच आहेत. ग्रामायणमु (१९५४) ही त्यांची ग्रामीण जीवनावरील कादंबरी. गुप्तहेरकथा, आकाशवाणीसाठी श्रुतिका तसेच एकांकिकाही त्यांनी लिहिल्या. समग्र-आंध्र साहित्यमु (१६ खंड, १९६५–६८) या त्यांच्या ग्रंथात तेलुगू साहित्याचा समग्र इतिहास आहे. साहित्य अकादमीची पारितोषिकेही त्यांना लाभली (१९७४ १९८७).

लाळे, प्र. ग.