रामराजभूषण : (सोळावे शतक). प्रख्यात तेलुगू महाकवी. त्याचे मूळ नाव ‘भट्टुमूर्ती’ होते. वडिलांचे नाव वेंकटराय भूषण. कडप्पा जिल्ह्यातील बट्टपल्ले येथील तो रहिवासी. त्याचे उपनाव या उपाधी रामराजभूषण. तो चारणभाट-वंशी होता. कृष्णदेवरायाच्या दरबारात अष्टदिग्गजांपैकी तो एक होता की नाही, याबद्दल अभ्यासकांत मतभेद आहेत.

नरसभूपालीयमु, हरिश्चंद्र-नलोपाख्यान (संपा. १९१८) आणि वसुचरित्रमु (संपा. १९१५) हे त्याचे ग्रंथ होत. नरसभूपालीयमु वा काव्यालंकारसंग्रह (संपा. १९५१) हा रीतिग्रंथ असून तो विद्यानाथांच्या प्रतापरुद्रीयाच्या धर्तीवर लिहिलेला आहे. त्यात काव्यभेद, रस, अलंकार, नायकभेद इत्यादींचे विवरण आहे. उदाहरणे म्हणून दिलेल्या पद्यात अभय राजपुत्र नरसभूपालाचे गुणगान केलेले आहे. विश्वनाथाच्या मूळ ग्रंथातील नाट्यासंबंधीची चर्चा मात्र यात नाही. रामराजभूषणाच्या हरिश्चंद्र-नलोपाख्यान ह्या दुसऱ्या ग्रंथात श्लेषाच्या आधारे एकाच वेळी हरिश्चंद्र आणि नल यांच्या कथा सांगितल्या आहेत. ते द्वयर्थी वा श्लिष्ट काव्य असूनही त्यात दुर्बोधता कुठेही आलेली नाही. तेलुगूतील हे दुसरे द्वयर्थी काव्य आहे. अशा काव्यांत भावनाविष्कारापेक्षा पांडित्यप्रदर्शनाचाच उद्देश प्रमुख असतो. हे काव्य कवीने प्रभू रामचंद्रास अर्पण केले आहे. वृद्धापकाळी त्याने ते रचले असावे. वसुचरित्रमु हे त्याचे महाभारतातील एका लहानशा प्रसंगावर आधारित सर्वोत्कृष्ट प्रबंध वा महाकाव्य होय. यात कोलाहल पर्वत आणि शुक्तिमती नदी यांची कन्या गिरिका आणि वसुराज यांच्या विवाहाची कथा सहा सर्गांत (आश्वासांत) वर्णिली आहे. यात कवीने नायक-नायिकेचे मानुषीकरण मोठ्या कौशल्याने केले आहे. पेद्दनाकृत ⇨मनुचरित्राहूनही वसुचरित्रमु एका बाबतीत श्रेष्ठतर आहे. वसुचरित्रमुतील केवळ पद्यातच नव्हे, तर गद्यातही संपन्न सांगीतिक लय आहे. त्यातील गद्य – पद्ये वाद्य-संगीताच्या साथीवर गाता येतात. यामुळे तेलुगू छंद गेयही आहेत हे सिद्ध होते. कवीला नृत्य व संगीताचेही उत्तम ज्ञान असल्याचे त्यात दिसून येते. काव्य, संगीत व नृत्य यांचा सुंदर मिलाफ ह्या काव्यात झालेला दिसतो. मार्मिक शब्दयोजना, नाट्यमयता, अलंकार, रसपरिपोष, शैली, संगीतानुकूल लय इ. दृष्टींनी हे काव्य अनुपम मानले जाते. तेलुगूतील ‘पंचमहाकाव्यां’त त्याची गणना केली जाते. सोमनाथ कवीने (सतरावे शतक) ह्या महाकाव्यावर विद्वानमनोरंजनी नावाची उत्कृष्ट टीका लिहिली असून ती महत्त्वाची मानली जाते.

वसुचरित्रमुचे नंतरच्या कवींनी अनुकरणही केले. त्यांच्या प्रबंधांना ‘पिल्ला वसुचरित्रमुलु’ म्हणजे वसुचरित्रमुची बालके असे नाव मिळाले. वसुचरित्रमुचे संस्कृत व तमिळ या भाषांत अनुवाद झाले आहेत.

टिळक, व्यं. द.