मोल्ल: (सु. सोळावे शतक). आद्य तेलुगू संत कवयित्री. कृष्ण देवरायाच्या ती समकालीन होती असे काही अभ्यासक मानतात, तर काहींच्या मते ती सु. तेराव्या शतकात होऊन गेली असावी. ‘मोल्लांबा’, ‘कुम्मरी मोल्ल’ अशीही तिची नावे रूढ आहेत. तिची अधिकृत चरित्रपर माहिती उपलब्ध नाही. काही आख्यायिका व दंतकथा मात्र प्रचलित आहेत. नेल्लोर जिल्ह्यातील गोपवरम् येथे एका कुंभार जातीच्या कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचा पिता केशना हाही साधुवृत्तीचा शिवभक्त कवी होता. आंध्र प्रदेशात मोल्लविरचित रामायण आबालवृद्धांचे फारच आवडते आहे. मोल्लांबेच्या उत्कट भक्तीशीलतेमुळे तिची संत मीराबाईशी तुलना केली जाते. तिने प्रसिद्ध भक्तकवी पोतना यास आपला आदर्श मानले होते.

तिने लिहिलेले रामायण प्रबंध काव्यप्रकारातील असून ते सहा कांडांत आहे. त्याचा आरंभच अयोध्या वर्णनाने होतो. ब्राम्हणादी चारी वर्णांच्या पौरजनांचे वर्णन केल्यानंतर केवळ ९०० पद्यांत तिने सुगम आणि सुंदर रामकथा सांगितली आहे. तत्त्वचर्चा आणि अनावश्यक प्रसंग तिने गाळले आहेत. घटना आणि दृश्ये यांची वर्णने आणि व्यक्तिचित्रे ही अगदी ठळक व आटोपशीर आहेत. अयोध्याकांडाच्या आरंभीचे निसर्गवर्णन फारच बहारीचे आहे. युद्धकांडाचा विस्तार बराच झाला आहे. सीताहरणानंतरचा रामविलाप व परित्यक्त सीतेच्या हालअपेष्टा यांचे वर्णन हृदयास पाझर फोडणारे आहे. काही ठिकाणी विरोधाभास, श्लेष या अलंकारांचा फारच मनोहर प्रयोग तिने केला आहे.

मोल्लांबा स्वतःबद्दल फारच विनयाने लिहिते. आपला शब्दसंग्रह तोकडा, व्याकरणाचे ज्ञान अपुरे आणि साहित्यशास्त्राचे तर अज्ञानच, असे ती म्हणते. गोपरवरम्‌च्या श्रीकंठ मल्लेश्वराच्या अनुग्रहाने आपणास काव्यप्रेरणा झाल्याचेही तिने म्हटले आहे. स्वतःच्या सहजसुंदर काव्य रचनेमध्ये तिने मधूनमधून म्हणींचा बहारदार वापर केला आहे. तेलगू कवयित्रींमध्ये तिचे स्थान आद्य व सर्वोच्च मानले जाते.

टिळक. व्यं. द.