अडिवि बापिराजू

बापिराजु, अडिवि : (८ ऑक्टोबर १८९५ – २२ सप्टेंबर १९५२). तेलुगू कादंबरीकार, कवी व अष्टपैलू लेखक. भीमावरम् (पश्चिम गोदावरी जिल्हा) येथे जन्म व आरंभीचे शिक्षण. राजमहेंद्री येथून ते बी.ए. व मद्रास येथून ते बी.एल्. झाले. १९२१-२२ च्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला. त्यांनी जीवनाच्या व साहित्याच्या कित्येक क्षेत्रांत आपल्या प्रतिमेची चमक दाखविली. कविता करण्याचा व चित्रे काढण्याचा त्यांना लहानपणापासून नाद होता. त्यांनी काही दिवस वकिली केली. १९३४ – ३८ अशी चार वर्षे मच्छलीपटनम् च्या आंध्र जातीय कलाशाळेत ते प्राचार्यही होते. काही वर्षे त्यांनी चित्रपटव्यवसायातही घालविली. अनसूया, ध्रुवविजयम,, मीराबाई इ. तेलुगू चित्रपटांचे कलादिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले. १९४४ ते ४७ अशी तीन वर्षे ते हैदराबादच्या मीजान या दैनिकाचे संपादक होते. विविध क्षेत्रांत त्यांनी मिळविलेला अनुभव व ज्ञान यांचे प्रत्यक्ष निदर्शन म्हणजे त्यांच्या कविता व कांदबऱ्या होत. इंग्रजी वाङ्मयाचा त्यांच्या लेखनावर प्रभाव पडला. सुरुवातीच्या काळी त्यांनी ‘शशिबाला’या कल्पित ललनेस उद्देशून अनेक भावगीते लिहिली. ती १९५४ मध्ये शशिकला या नावाने त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाली. त्यांच्या भावगीतांतील आत्मनिष्ठा आणि माधुर्य रवींद्रनाथ टागोरांच्या रचनेची आठवण करून देते. ते आपल्या कविता मधुर चालीवर गाऊन दाखवत तसेच त्यांना अनुरूप सुंदर चित्रेही काढत. त्यांची भावकविता स्वच्छंदतावादी वळणाची आहे.

अडिवी बापिराजू हे त्यांच्या कादंबऱ्यांमुळे विख्यात झाले. त्यांच्या कादंबऱ्यातून विषयांची विविधता आढळते. हिमबिंदु     (१९४६) या प्रसिद्ध बृहत् कादंबरीत त्यांनी आंध्र सातवाहनांच्या काळातील सामाजिक व धार्मिक स्थितीचे वर्णन केले आहे. आर्यधर्म व बौद्ध धर्म यांच्या समन्वयाची भूमिका त्यांनी हिमबिंदू व स्वर्णश्री यांच्या प्रणयकथेतून मांडली आहे. तूफान (१९४१),नारायणराव (१९५२) या त्यांच्या कादंबऱ्या म्हणजे ज्ञानकोश आहेत. त्यांची नारायणराव ही वर्तमान आंध्र प्रदेशाच्या सामाजिक जीवनावरील कादंबरी विशेष महत्त्वाची मानली जाते. त्यातील नारायणराव ह्या नायकाचे पात्र सदगुणी व उदार अशा आंध्र माणसाचे प्रतिनिधित्व करते. गोनगन्नारेड्डि (१९४६) या कादंबरीत काकतीय सम्राज्ञी रुद्रम्माने केलेल्या यादवांच्या पराभवाचे वर्णन आहे. जाजिमल्लि (१९५१) आणि नरुडु या कादंबऱ्या तून आंध्रांच्या प्राचीन वैभवाचे, गौरवाचे चित्रण तसेच इतर अनेक विषय त्यांनी कलात्मकतेने हाताळले आहेत. कोणंगीत स्वातंत्र्य आंदोलनाचे चित्रण आहे. बौद्धसिद्धांताबरोबर वेधक प्रणयकथांचे गुंफन करून बापिराजूंनी इतिहासास मनोरंजनाच्या कोंदणात बसविले. त्यांनी जे कथालेखन केले ते अंजलि, रागमालिका व तरंगिणी ह्या नावांनी संगृहीत आहे. मद्रास येथे ते निधन पावले.

लाळे, प्र. ग.