सुब्बराव, रायप्रोलू : (१८९२–१९८४ ). तेलुगू कवी. त्यांचा जन्म गार्लपाडु (जि. गुंतूर) येथे एका पंडित घराण्यात झाला. त्यांचे वडील अप्पावधानी हे संस्कृत पंडित होते तर त्यांचे मामा अव्वारी सुब्रह्मण्यशास्त्री हे नावाजलेले विद्वान व कवी होते. त्यांनी सुब्बरावांना घरीच संस्कृत व तेलुगू शिकविले. सुब्बराव १९०८ पासूनच कविता करु लागले व आपल्या मामांबरोबर उत्स्फूर्त काव्याचे जाहीर कार्यक्रम त्यांनी १९११ पर्यंत केले. त्यांचे औपचारिक शिक्षण गुंतूर, काकिनाडा, राजमहेंद्री या ठिकाणी झाले. चिलुकुरी वीरभद्रराव आणि अत्तिली सूर्यनारायण ह्यांच्या सहवासात त्यांची वाङ्‌मयीन जडण-घडण झाली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या निकट सहवासात शांतिनिकेतन येथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले व त्यांचा गाढ प्रभाव त्यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वावर पडला. सुब्बराव यांनी मल्लमपल्ली सोमशेखर शर्मा यांच्यासह कोमर्‌राजु लक्ष्मणराव पंतुलू यांनी सिद्घ केलेल्या आंध्र विज्ञान सर्वस्वमु या ग्रंथाच्या निर्मितीत साहाय्य केले. त्यांनी उस्मानिया विद्यापीठात (हैदराबाद) तेलुगूचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून अध्यापन केले (१९२१–४७). संस्कृत, इंग्रजी, बंगाली, उर्दू भाषांतील साहित्याच्या व्यासंगाने त्यांची काव्यप्रतिभा अधिक परिपक्व व संपन्न झाली. गोल्डस्मिथच्या हर्मिट या काव्याच्या आधारे त्यांनी ललिता (१९०९) हे नितांत मधुर खंडकाव्य लिहिले. निसर्गवर्णनांवर भर देणारे हे पहिलेच तेलुगू काव्य अतिशय लोकप्रिय झाले. त्यानंतरच्या तृणकंकण (१९१३) ह्या दुसऱ्या काव्यसंग्रहात त्यांची शैली अधिक भारदस्त झाली. त्यात त्यांनी दिव्य, अशरीरी, उदात्त प्रेमाची कल्पना मांडली. राष्ट्रीय आंदोलनातून स्फुरलेल्या आंध्रावली (१९१४) या काव्यात दास्याचा कलंक धुवून टाकण्याचे आवाहन त्यांनी देशबांधवांना केले, तर जडकुच्चलु (१९१५) व तेलुगुतोट ह्या काव्यांत आंध्रप्रशस्ती वर्णिली. कष्टकमलास्नेहलतादेवी ही त्यांनी लिहिलेली शोकान्त कथाकाव्ये असून, स्नेहलतादेवी मध्ये त्यांनी हुंड्याचे दुष्परिणाम वर्णिले आहेत. कवी व काव्यकलातत्त्वे ह्यांविषयीचे त्यांचे स्वतंत्र विचार माधुरीदर्शनमुरम्यालोकमु ह्या काव्यांतून त्यांनी व्यक्त केले आहेत. प्राचीनावरील श्रद्घेचा अव्हेर न करता नवी काव्यतत्त्वे त्यांनी स्वीकारलेली आहेत. स्वप्नकुमारमु मध्ये त्यागमय मंगल प्रेमाचे श्रेष्ठत्व व त्यातील सुखदुःखांतील समभाव त्यांनी वर्णिला आहे. तृणकंकण या प्रमेय प्रधान कवितेतील प्रतीकवादाला प्रथम विरोध झाला पण तिनेच तेलुगू भावकवितेचा पाया घातला. जडकुच्चलु ह्या भावगीत संग्रहाचेही रसिकांनी मनोभावे स्वागत केले. त्यांची ‘ जन्मभूमी’ व ‘आंध्र प्रबोध’ ही गीतेही अतिशय लोकप्रिय झाली.

सुब्बराव हे ‘अभिनव नन्नय’ या नावानेही प्रसिद्घ होते. आद्य तेलुगू महाकवी ⇨ नन्नय (अकरावे शतक) ह्याचा आधुनिक वारस या अर्थी त्यांना ही उपाधी देण्यात आली. तेलुगू कवींच्या ‘ भावकविता संप्रदाय ‘ ह्या नव्या संप्रदायाचे ते आद्य प्रवर्तक मानले जातात. रवींद्रनाथ टागोरांच्या काव्याने प्रभावित झालेला हा संप्रदाय तेलुगू साहित्यात १९२० च्या सुमारास उदयाला आला. सुब्बराव यांनी तेलुगू साहित्यात ‘ अमलिन (शुद्घ वा निष्कलंक) शृंगार तत्त्वमु’ ही संकल्पना दृढमूल केली. ही संकल्पना प्लेटॉनिक प्रेमाशी मिळतीजुळती असून प्रेम ही समाजाची जीवनप्रेरणा असल्याचे आग्रही प्रतिपादन त्यात आढळते. ते रवींद्रनाथ टागोरांचे शिष्य व सौंदर्यप्रेमी होते आणि इंग्लिश भावकाव्यांचाही त्यांच्यावर ठळक प्रभाव होता. ह्या सर्व संस्कारांतून त्यांनी स्वतःची अशी खास शैली घडविली. त्यात वास्तववाद व आदर्शवाद यांचा समन्वय साधला. त्यांची भाषाशैली सुबोध, रसाळ व भावपूर्ण होती.

सुब्बराव यांचे अनुवादित साहित्यही महत्त्वाचे आहे. त्यांनी शंकराचार्यांच्या सौंदर्यलहरी चे तेलुगूमध्ये भाषांतर केले. उमर खय्यामच्या रुबायांचे मधुकलशमु हे तेलुगू रूपांतर त्यांनी केले. कालिदासाच्या मेघदूताचे तेलुगू भाषांतर त्यांनी ‘मत्तेभ’ छंदात केले. वाल्मीकिरामायणाच्या ‘सुंदर कांडा’चे त्यांनी तेलुगू भाषांतर केले, तसेच भवभूतीचे उत्तररामचरित ही त्यांनी तेलुगूमध्ये आणले.

सुब्बराव यांना मिश्रमंजरी या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला (१९६५). हैदराबादच्या तेलुगू अकादेमीने प्रकाशित केलेल्या आंध्र महाभागवतम् चे संपादन त्यांनी केले.

इनामदार, श्री. दे.