ताळ्ळपाक अन्नमाचार्य : (सु. १४०८–१५०३). प्रख्यात कीर्तनरचनाकार तेलुगू कवी. त्याचा जन्म कडप्पा जिल्ह्यातील ताळ्ळपाक या गावी झाला. ‘गीतसाहित्य–पितामह’, ‘वाग्गेयकार’, ‘संकीर्तनाचार्य’ इ. सार्थ बिरूदे त्याला लावली जातात. त्याचे शिक्षण घरीच झाले. वयाच्या सोळाव्या वर्षापासून देहावसानापर्यंत त्याने श्रीक्षेत्र तिरुपती येथेच आयुष्य व्यतीत केले. संस्कृत व तेलुगू भाषांचा तो प्रकांड पंडित होता. संगीतशास्त्राचाही त्याचा सखोल अभ्यास होता. त्याची प्रायः सर्व रचना भक्तिप्रधान आहे. तेलुगू भाषेत दररोज एक नवे कीर्तनपद रचून आणि ते गाऊन तो वेंकटेश्वराची वा बालाजीची आर्तस्वराने व अनन्यभावाने आळवणी करीत असे. अशी ३२,६०० कीर्तनपदे त्याने रचिली असे म्हणतात तथापि ती सर्व आज तरी उपलब्ध नाहीत. ताम्रपत्रांवर कोरलेली त्यांतील १३,००० कीर्तने मात्र आजही तिरुपतिक्षेत्री संकीर्तन भांडारात सुरक्षित आहेत.

संकीर्तनलक्षण हा त्याचा संस्कृत ग्रंथ होय. याशिवाय द्विपद–रामायणमु, वेंकटाचल माहात्ममु, शृंगारमंजरी आणि सर्वेश्वर शतक हे त्याचे इतर तेलुगू ग्रंथ होत.

त्याची तेलुगू कीर्तने म्हणजे उत्कृष्ट भक्तिगीतेच होत. कीर्तनात शब्द कमी महत्त्वाचे असतात. शब्द स्वरांत मिसळून जातात आणि स्वरच अर्थवाही बनतात. या कामी तालाचे साहाय्य होते. मुळात तेलुगूचे स्वरान्त शब्द गेय काव्यास अत्यंत पोषक आहेत. त्यात अन्नमाचार्यांची आर्त भावना आणि संगीताच्या राग, ताल, स्वर इ. अंगोपांगाचे सखोल ज्ञान यांची जोड मिळाल्यामुळे, त्याची कीर्तने अत्यंत लोकप्रिय झाली. कर्नाटक संगीतात त्याला आद्य आणि अमर स्थान प्राप्त झाले. त्याची ४,००० कीर्तने वेदान्तपर आणि ८,००० कीर्तने सगुणभक्तिपर आहेत. भगवान वेंकटेश्वर आणि मंगम्मा या दांपत्यातील प्रेमभावावर त्याची अनेक भावपूर्ण कीर्तने आहेत. त्यांतील शृंगारयुक्त शांत रसाचा परिपोष विलोभनीय आहे. विशुद्ध, सुबोध आणि शिष्टमान्य भाषेत मधुर, अर्थगंभीर व काव्यगुणाने युक्त कीर्तने लिहिणाऱ्यात अन्नमाचार्यांचे स्थान अद्वितीय आहे. भाषा व काव्यगुणाच्या दृष्टीनेही त्याची कीर्तने उत्कृष्ट आहेत.

त्याचा संप्रदाय ‘ताळ्ळपाक’ किंवा ‘ताळ्ळपाक्कम्’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे  अनुकरण पुढे अनेकांनी केले. त्याची पहिली पत्नी ताळ्ळापाक तिम्मक हिनेही सुभद्राकल्याण वा सुभद्रार्जुनीयमु नावाचे द्विपद छंदात एक काव्य लिहिले. त्याच्या इतर वंशजांनीही भक्तिप्रधान गीतांची रचना केली.

टिळक, व्यं. द.