तिक्कन्न : (सु. १२२०–सु. १२९०). आंध्र महाभारताची रचना करणारा प्रख्यात तेलुगू कवी. आंध्र महाभारताची चार ते अठरा ही पंधरा पर्वे रचून ⇨ नन्नयाचे अपूर्ण महाभारत तिक्कन्नाने पूर्ण केले. आंध्र महाभारतातील पंधरा पर्वे याची असल्यामुळे या ग्रंथकर्तृत्वाचे बहुतांश श्रेय तिक्कन्नाकडेच जाते. त्यामुळे त्याला ‘आंध्रव्यास’ म्हणतात. ‘कविब्रम्ह’ व ‘उभयकविमित्र’ अशाही उपाधी त्याला आहेत. त्याने एकदा सोमयाग केल्यामुळे ‘तिक्कन्न सोमयाजी’ म्हणूनही तो ओळखला जातो. त्याची चरित्रपरमाहिती केतनाकृत दशकुमारचरित्रमु ह्या ग्रंथात मिळते. केतनाने आपला हा ग्रंथही तिक्कन्नासच अर्पण केला आहे. आद्य तेलुगू महाकवी नन्नयानंतर सु. १५० वर्षांनी तिक्कन्न होऊन गेला. नेल्लोर येथील मनुमसिद्धी (१२००–५८) राजाचा तो मंत्री, सेनापती व राजकवी होता. तिक्कन्नाचे घराणे चांगले व्युत्पन्न पंडित व कवी म्हणून प्रसिद्ध होते. त्याचे मातापिता अन्नांबा व कोग्मन्न पितामह भास्कर. हे कुटुंब शिक्षण, राजनीती, अर्थशास्त्र, वेदवेदांगे इत्यादींत पारंगत होते. तिक्कन्न संस्कृत व तेलुगू भाषांचा प्रकांड पंजित तर होताच पण विनयी, न्यायशील आणि चारित्र्यसंपन्नही होता. काकतीय राजा गणपतिदेव याच्या दरबारात त्याने बौद्ध आचार्याचा शास्त्रार्थात पराजय केला. त्यामुळे राजाने त्याला आठ गावे आणि नऊ लाख रुपये बक्षीस देऊन त्याचा गौरव केला, असे सोमदेवराजीय  ग्रंथात म्हटले आहे.

तिक्कन्न हा तेलुगूचा दुसरा प्रख्यात महाकवी होय. मार्गी व देशी ह्या दोन्ही शैलींचा आपल्या रचनेत समन्वय घडवून आणणाऱ्या कवींत त्याला अग्रपूजेचा मान आहे. शैव, वैष्णवादी धर्मपंथांच्या बाबतीतही तो समन्वयवादीच होता.

निर्वचनोत्तर रामायण ही त्याची पहिली रचना मानली जाते. त्याच्या नंतरच्या रचनेतील प्रौढ शैलीचा ह्या रचनेत अभाव जाणवत असला, तरी ह्या रचनेतील ‘सीताचरित्र’ ह्या भागात त्याच्या असामान्य कवित्वगुणाची बीजे स्पष्ट दिसतात. महाभारताची शेवटची पंधरा पर्वे हीच त्याची मुख्य महत्त्वपूर्ण रचना आहे. कविसार्वभौम छंद किंवा कविवाग्बंध, विजयसेन आणि कृष्णशतक ही त्याची इतर ग्रंथरचना आहे.

मनुमसिद्धी राजाला नन्नयाच्या अपूर्ण महाभारताची कल्पना होती. त्याने तिक्कन्नाला हा ग्रंथ पूर्ण करण्यास सांगितले. तिक्कन्न हा नेल्लोर येथील हरिहरनाथांचा उपासक होता व त्याचे वास्तव्यही हरिहरनाथमंदिराच्या आसपासच होते. त्याने शैव–वैष्णवांच्या ऐक्याचा पुरस्कार केला व आपल्या विराटपर्वाची सुरुवातच ‘विष्णुरूपाय नमःशिवाय’ या शब्दांनी केली. हा ग्रंथही त्याने हरिहरनाथास अर्पण केला आहे. नेल्लोरवर परचक्र आले असता, तिक्कन्नाने काकतीय नृपती गणपतिदेव यास आपले काव्य ऐकवून आपल्या आश्रयदात्यावर आलेले संकट निवारण्यास त्याचे सैनिकी साहाय्य मिळविले. त्यामुळे आंध्राप्रमाणेच तेव्हाच्या तेलंगणातही त्याच्या महाभारतास प्रसिद्धी मिळाली.

त्याचा महाभारतग्रंथ हा व्यासांच्या महाभारताचा केवळ तेलुगू अनुवाद नाही, तर ती त्याची अधिक मुक्त व स्वतंत्र रचना असून त्याने कलात्मक रचनेकडे तीत अधिक लक्ष पुरविलेले दिसते. तेलुगू भाषेची क्षमता त्याच्या काळी पुष्कळच विकसित होऊन स्थिरावलीही होती. साहजिकच त्याने आपल्या रचनेत जास्तीत जास्त तेलुगू शब्दांचा वापर केला, पण आवश्यक तेथे संस्कृत शब्दही वापरले. त्यामुळे तेलुगूतील अनेक व्यावहारिक व बोलभाषेतील शब्दांना साहित्यात प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्याने आपल्या रचनेत प्रामुख्याने देशी छंदांचाच उपयोग केला आहे. केवळ अनुवादापेक्षा मौलिक काव्यरचनेचे गुणविशेष त्याच्या महाभारता त विशेषतः दिसून येतात. मूळ ग्रंथातील सामान्य उपाख्याने त्याने वगळली तसेच वेदान्तविवेचनही अत्यंत संक्षेपाने केले. अठरा अध्यायांत असलेली गीता केवळ तीनच पद्यांत त्याने संपविली आणि काव्यदृष्ट्या रोचक ठरणारे प्रसंग विस्ताराने वर्णन केले. द्रोणाचे पांडवप्रेम, कर्णाची राजभक्ती, शकुनीचा कावेबाजपणा, अर्जुनाचा पराक्रम, अभिमन्यूचा व्यूहभेद इ. भाग या दृष्टीने विशेष उल्लेखनीय होत. ते ते प्रसंग साक्षात समोर उभे करण्याचे सामर्थ्य त्याच्या लेखणीत आहे. मंत्रिपदाचा व शिष्टाईचा अनुभव पदरी असल्यामुळे तिक्कन्नाने कृष्णशिष्टाईचे वर्णन प्रभावीपणे केले आहे. कीचक आणि अभिमन्यू यांच्या वधाचे प्रसंग विशेष नाट्यपूर्ण उतरले आहेत, वीर आणि शृंगार रसांचा उत्कृष्ट परिपोष त्याच्या रचनेत आढळतो. कित्येक ठिकाणी मूळ ग्रंथाहूनही अधिक सरस रचना असल्यामुळे तिक्कन्नाच्या महाभारतास तेलुगू साहित्यात चिरंतर स्थान लाभले आहे. त्याच्या महाभारतात तीन विशेष प्रकर्षाने जाणवतात : (१) रचनेतील नाट्य, (२) मानवी स्वभावाचे सूक्ष्म ज्ञान आणि (३) भाषेवरील असामान्य प्रभुत्व.

समकालीन व नंतरच्या कवींवर तिक्कन्नाचा खूपच प्रभाव पडलेला दिसतो. नंतरच्या कवींनी त्याला गुरुस्थानी मानून त्याचे ऋण आदरयुक्त शब्दांत मान्य केले. तेलुगू साहित्याचा उद्धारक महाकवी म्हणूनही कवींनी त्याच्याबाबत गौरवोद्‌गार काढले. नन्नयाचे अपूर्ण वनपर्व तिकन्नानंतर सु. शंभर वर्षांनी ⇨ एर्राप्रेगडाने पूर्ण केले. अशा प्रकारे सु. तीनशे वर्षांच्या कालावधीत आंध्र महाभारतग्रंथ तीन महाकवींचा हातभार लागून पूर्ण झाला. यांतील पंधरा पर्वांचा वाटा एकट्या तिक्कन्नाचाच आहे.

नन्नयाप्रमाणेच तिक्कन्नाच्या महाभारतावरही त्याची हस्तलिखिते, सटीक आवृत्या, भाष्ये, विवरणे इ. प्रकारचे विपुल साहित्य उपलब्ध आहे. के. व्ही. रामकोटीशास्त्री, बी. लक्ष्मीनारायणराव, सी. वीरभद्रराव, के. व्यासमूर्तीप्रभृतींचे तिक्कन्नावरील अभ्यासक्रम ग्रंथ विशेष उल्लेखनीय होत.

टिळक व्यं. द.