सू दुंग फो : (१९ डिसेंबर १०३६–२८ जुलै ११०१). चिनी कवी. मूळ नाव सूशिर सू दुंग फो या टोपणनावाने लेखन. सध्याच्या सेच्वान प्रांतातील मी शान येथे एका नामांकित वाङ्‌मयप्रेमी कुटुंबात जन्म. त्याचे वडील, त्याचा धाकटा भाऊ आणि धाकटी बहीण हे सर्वकवी होते.

सरकारी अधिकारपदांसाठी चीनमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये त्याने नेहमीच उत्तम यश मिळविले आणि अनेक अधिकारपदे भूषविली. अधिकारी म्हणून तो लोकप्रिय होता परंतु सरकारमध्ये सत्तापदी असलेल्या निरनिराळ्या राजकारण्यांशी त्याचे फारसे कधी जमले नाही. उदा., वांग आनशिर हा चिनी मुत्सद्दी आणि सुधारक सुंग सम्राट शेन झूंग ह्याच्या कारकीर्दीत प्रधानमंत्री असताना (१०६८–८५) त्याने केलेल्या आर्थिक सुधारणांना सू दुंग फो ह्याने विरोध केल्यामुळे सूदुंग फोला पदावनती, राजधानीबाहेर बदली असा त्रास सहन करावा लागला पण आयुष्यात असे कडवट प्रसंग येऊनही जीवनाविषयीचा त्याचा आशावाद ढळला नाही.

त्याची प्रतिभा चतुरस्र होती कवितेबरोबर त्याने गद्यलेखनही विपुल केले. त्याची लेखनशैली विविध रुपे धारण करणारी होती. कुठल्याही सर्वसाधारण साच्यात ती बसणारी नव्हती. चिनी कवितेचे रुप आणि आशय ह्यांच्या भोवतीची सांकेतिक चौकट सैल करुन तिला नवी उंची प्राप्त करुन देण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याच्या व्यक्तिगत जीवनात त्याने जो आशावाद जोपासला, तो त्याच्या कवितेतूनही सहजपणे प्रकटलेला दिसतो. माझी कविता ही माझे प्रवक्तेपण करणारी असली पाहिजे, अशी त्याची भूमिका होती. प्रभावी प्रतिमांचा वापर हे त्याच्या कवितेचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होते.

राजकारण्यांच्या रोषाला बळी पडल्यामुळे आयुष्यात अनेकदा अवमानित झालेल्या सू दुंग फोला त्याच्या मृत्युपूर्वी सन्मानाचे जिणे पुन्हा प्राप्त झाले होते.

विद्यमान जीआंग सू प्रांतात असलेल्या चान जो येथे तो निधन पावला.

ताग चुंग (इं.), कुलकर्णी, अ. र. (म.)