रासायनी चिकित्सा : ज्या चिकित्सेत रासायनिक पदार्थांचा रोगोपचाराकरिता उपयोग करतात, तिला ‘रासायनी चिकित्सा’ म्हणतात. प्रामुख्याने संसर्गजन्य रोग व अलीकडेच कर्क रोगासारख्या मारक रोगावर केलेल्या औषधी उपचारांचा तीत समावेश होतो. सूक्ष्मजंतू, व्हायरस, प्रोटोझोआ (आदिजीव), कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती), कृमी व इतर अनेक परजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणारे सजीव) मानवी शरीरामध्ये रोग उत्पन्न करू शकतात. या सर्वांचा नाश करावयाचा परंतु प्रत्यक्ष शरीरकोशिकांना (पेशींना) अत्यल्पही हानी पोहोचणार नाही असेच रासायनिक पदार्थ (औषध) वापरावयाचे, हा या चिकित्सेचा मुख्य उद्देश असतो. तसेच कर्करोगावरील उपचारात अपसामान्य कोशिकांचा नाश करावयाचा परंतु प्राकृतिक (सर्वसाधारण) शरीर-कोशिका सुरक्षित ठेवावयाचा उद्देश असतो.

इतिहास : प्राचीन काळापासून आनुभविक रासायनी चिकित्सा वापरात होती. प्राचीन ग्रीक लोक मेल फर्न अथवा ॲस्पिडीयम [⟶ नेचे] या वनस्पतीचा आणि अमेरिकेतील ॲझेटेक इंडियन लोक चिनोपोडियम तेलाचा उपयोग कृमींच्या नाशाकरिता करित. आजही मेल फर्नचा कृमीनाशक म्हणून उपयोग केला जातो. प्राचीन हिंदू लोक कुष्ठरोगावर चौलमुग्रा तेलाचा मर्दानाकरिता उपयोग करित. भारताशिवाय ब्रह्मदेश, थायलंड व मलायातही हे तेल वापरात होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. सोळाव्या शतकात पार्यातचा उपदंशाकरिता आणि सिंकोना नावाच्या वनस्पतीच्या सालीचा (सिंकोनाबार्कचा) सतराव्या शतकापासून हिवतापावर उपयोग केला जात होता. अनेक शतके सिंकोना बार्क हे जेझुइटांचा बार्क म्हणून औषधी गुणधर्माकरिता ओळखले जात होते. जिला आधुनिक रासायनी चिकित्सा म्हणता येईल त्या शास्त्राची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी झाली.    

रासायनी चिकित्सेच्या इतिहासात तीन स्पष्ट टप्पे ओळखता येतात : (१) १८२१ पूर्वीचा किंवा ⇨पॉल अर्लिक यांच्या पूर्वीचा काळ (२) पॉल अर्लिक यांचा काळ आणि (३) १९३५ नंतरचा सल्फॉनामाइडे व ⇨प्रतीजैव पदार्थांच्या शोधानंतरचा काळ.

प्रबोधन काळात (चौदाव्या ते सोळाव्या शतकांत) रसायनशास्त्र व सूक्ष्मजीवविज्ञान यांमध्ये बरीच प्रगती झाली. अनेक संसर्गोत्पादक जीवांचा शोध लागला. 

जर्मन सूक्ष्मजंतुवैज्ञानिक व विकृतीवैज्ञानिक पॉल अर्लिक (१८५४−१९२५) यांना प्रयोग करते वेळी मिथिलीन ब्ल्यू हा रंजक काही विशिष्ट सूक्ष्मजंतूंनाच अभिरंजक व मारक असल्याचे लक्षात आले. त्यावरून त्यांना सूक्ष्मजंतूंना मारक ठरणारे पण पोषकाच्या (मानवी शरीरातील) कोशिकांना हानी न करणारे पदार्थ तयार करणे शक्य असल्याची कल्पना सुचली. अशा पदार्थांना त्यांनी ‘जादूच्या बंदूक गोळ्या’ असे यथार्थ नावही दिले. १८९१ मध्ये मिथिलीन ब्ल्यूचा मानवी हिवतापाच्या उपचारातील प्रभावी उपयोग त्यांनी सिद्ध केला. आर्सेनिक (सोमल) संयुगांचा उपदंश व इतर स्पायरोकीटाजन्य (सर्पिल सूक्ष्मजंतुजन्य) रोगांवरील गुणकारी उपयोगही सिद्ध केला. आर्स्फि नामाइन अथवा ‘अर्लिक ६०६’ किंवा ‘सालव्हरसान’ या नावाच्या संश्लेषित (कृत्रिम रीतीने बनविलेल्या) औषधाचा शोध १९०७ मध्ये लागल्यावर आणि त्याचा औषधी उपयोग १९०९ मध्ये सिद्ध झाल्यानंतर रासायनी चिकित्साही सिद्ध झाली. या नव्या औषधांच्या चिकित्सात्मक उपयोगाच्या दृष्टीने त्यांनी ‘रासायनी चिकित्सा निर्देशांक’ अशी संज्ञाही वापरली. सर्वाधिक सह्य मात्रा व लघुतम परिणामकारक मात्रा गुणोत्तरावरून हा निर्देशांक ठरविता येतो. आज याची जागा चिकित्सा निर्देशांकाने घेतली आहे. [⟶ औषधिक्रियाविज्ञान].

अर्लिक यांच्या सिद्धांताप्रमाणे परजीवींच्या कोशीकाभित्तीमध्ये विशिष्ट रासायनिक गट अथवा ‘ग्राहक’ असतात. औषधातील रासायनिक गट या ग्राहकाशी संयोजित होऊन औषधी परिणाम मिळतात. औषधाचे गुणकारी परिणाम किंवा विषारी परिणाम त्याच्या रोगोत्पादक परजीवीच्या किंवा पोषकाच्या कोशिकांच्या आसक्तीच्या प्रमाणावर अवलंबून असतात. जे औषध अंगप्रेरक अथवा अंगरागी (पोषकाच्या कोशिकांची आसतक्ती असणारे) असेल, ते विषारी आणि जे परजीवी-प्रेरक (परजीवीच्या कोशिकांची आसक्ती असणारे) असेल ते गुणकारी ठरते. अर्लिक यांना या संशोधनाबद्दल १९०८ च्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. ते आधुनिक रासायनी चिकित्साशास्त्राचे जनक मानले जातात. त्यांच्या संशोधनामुळे औषधी परिमाणातील कोशिकीय रसायनशास्त्राकडे लक्ष वेधले जाऊन नवीन संश्लेषित सूक्ष्मजंतुनाशकांचा शोध लागला.

रासायनी चिकित्सेच्या पुढील प्रगतीमध्ये ⇨गेरहार्ट डोमाक (१८९५−१९६४) व त्यांचे सहकारी यांचा मोठा वाटा आहे. हे जर्मन शास्त्रज्ञ १९३८ मध्ये ॲझो रंजकावर प्रयोग करीत असताना त्यांना ‘प्रॉन्टोसील’ या पहिल्या सल्फॉनामाइडचा शोध लागला. या रंजकाची प्रयोगशाळेत आणि रोगी शरीरातील मालगोलाणूंची (स्ट्रेप्टोकॉकसांची) वाढ रोखण्याची शक्ती त्यांनी सिद्ध करून दाखविली. त्यांच्या या संशोधनावबद्दल त्यांना वैद्यकाचे १९३९ चे नोबेल पारितोषिक मिळाले.

एफ्. नीत्ती, दान्येल बोव्हे व जे. त्रेफोएल या शास्त्रज्ञांनी प्रॉन्टोसिलाचा चिकित्सत्मक गुणधर्म शरिरात त्याचे सल्फानिलामाइडात रूपांतर होण्यामुळे निर्माण होतो हे दाखवून दिल्यानंतर अनेक सल्फॉनामाइडे [⟶ सल्फा औषधे] संश्लेषित करण्यात आली. वस्तुतः पी. गेल्मो या शास्त्रज्ञांना १९०८ मध्ये सल्फानिलामाइडाचा शोध लागला होता परंतु त्याचा औषधी गुणधर्म समजण्यास तीस वर्षांचा दीर्घ कालावधी लागला.

एका सूक्ष्मजंतूचा दुसऱ्या सूक्ष्मजंतूमुळे झालेल्या रोगोपचाराकरिता उपयोग करण्याची कल्पना अठराव्या शतकात सुचली होती. १८७७ मध्ये लूई पाश्चर व जे. झूबेअर या शास्त्रज्ञांनी सांसर्गिक काळपुळी या रोगाचे मूत्रातील सूक्ष्मजंतू इतर सूक्ष्मजीवांच्या सान्निध्यात वाढत नाहीत, हे दाखविले होते. १८८५ मध्ये व्हिक्तॉर बाबेश या रूमेनियन शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत संवर्धन माध्यमे वापरून एक प्रकारचे सूक्ष्मजंतू दुसऱ्या प्रकारच्या सूक्ष्मजंतूच्या वाढीस प्रतिरोध करतात, हे दाखविले होते. १८९९ मध्ये आर्. एमरिख व ओ. लो. यांनी स्यूडोमोनस एरूजिनोझा (निळ्या रंगाचा पू तयार करणारे सूक्ष्मजंतू) या सूक्ष्मजंतूंबद्दल संशोधन करताना, त्यांचा अर्क गोलाणूंचा तसेच घटसर्प, पटकी, आंत्रज्वर (टायफॉइड) व प्लेग या रोगांस कारणीभूत असणाऱ्यार सूक्ष्मजंतूंचा अत्यल्प सांद्रतेतही (विद्रावातील प्रमाण अत्यल्प असतानाही) नाश करतो, हे दाखविले होते.

यानंतर जवळ जवळ पाव शतकानंतर १९२८ मध्ये ⇨सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना पेनिसिलिनाचा शोध लागला [⟶ प्रतिजैव पदार्थ]. या औषधाची परिणामकारकता ⇨सर एर्न्स्ट बोरिस चेन व ⇨सर हॉवर्ड वॉल्टर फ्लोरी यांनी ते दुसऱ्या जागतिक महायुद्धात मोठ्या प्रमाणात वापरून सिद्ध केली. या संशोधनाद्दल या तिघांना १९४५ चे वैद्यकाचे नोबेल पारितोषिक मिळाले.


    इ. स. १९४४ मध्ये ⇨सेल्मन आब्राहम वेक्समन व त्यांच्या सहकाऱ्यांनी हजारो सूक्ष्मजंतूंच्या अभ्यासानंतर स्ट्रेप्टोमायसीज ग्रिशीअस या सूक्ष्मजंतूंपासून स्ट्रेप्टोमायसीन हे क्षयरोगावरील गुणकारी प्रतिजैव औषध शोधून काढले. याबद्दल त्यांना १९५२ चे वैद्यकाचे नोबेल पारितोषिक मिळाले. वेक्समन यांनी प्रतिजैव पदार्थाची व्याख्या अशी केली आहे : ‘सूक्ष्मजंतूंनी उत्पन्न केलेला असा रासायनिक पदार्थ की, ज्यामध्ये अत्यल्प सांद्रतावस्थेतही इतर सूक्ष्मजंतूंची वाढ रोखण्याचा किंवा त्यांचा नाश करण्याचा गुणधर्म आहे.’

रासायनी चिकित्सेत वापरण्यात येणाऱ्या रसायनांमध्ये संश्लेषित पदार्थांचा (उदा.सल्फॉनामाइडे) आणि नैसर्गिक पदार्थांचा (उदा., सेफीलिस इपेकॅक्युन्हा या वनस्पतीच्या मुळापासून बनवलेले व अमीबाजन्य विकारावर उपयोगात असलेले एमेटीन हे औषध) समावेश होतो. १९३९ नंतर कवके, ॲक्टिनोमायसीटीज व इतर सूक्ष्मजंतू यांपासून प्रतिजैव पदार्थाच्या निर्मितीसंबंधी मोठ्या प्रमाणावर सतत संशोधन सुरू झाले. स्ट्रेप्टोमायसिनाच्या पाठोपाठ टेट्रासायक्लिने, एरिथ्रोमायसीन इत्यादींचा शोध लागला. हिवताप, कुष्ठरोग व अमीबाजन्य विकारांवरील नव्या रासायनिक पदार्थांचा गुणकारी प्रभाव माहीत झाला. अर्जेंटिनी मुंगीच्या (इरिडोमिर्मेक्स ह्युमिलिस ग्रंथीच्या स्त्रावाचा सूक्ष्मजंतुरोधी गुणधर्म व ब्लो-फ्लाय (कॅलिफोरा व्हिसिना) या माशीच्या अळ्यांच्या विष्ठेतील सूक्ष्मजंतुरोधक पदार्थही शास्त्रज्ञांच्या लक्षात आले.

मूलतत्त्वे : रासायनी चिकित्सेतील औषधांची गुणकारिकता ही नैसर्गिक शरीर-संरक्षक यंत्रणेचे अस्तित्व व विशिष्ट औषधाबद्दल प्रतिरोध निर्माण करण्याची सूक्ष्मजंतूंची क्षमता यांवर अवलंबून असते. सर्वच औषदी उपचाराच्या यशामध्ये रोगी शरीराचे महत्त्वाचे कार्यही असते. औषध सूक्ष्मजंतुनाशक किंवा सूक्ष्मजंतु-वाढरोधी असू शकते. विशिष्ट औषधाची विशिष्ट सूक्ष्मजंतु-विरोधी क्रिया त्या औषधाच्या गुणकारिकतेचे प्रमुख कारण असते. चिकित्सेच्या प्रमुख तत्त्वांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. 

(१) विशिष्टता : वर उल्लेखिल्याप्रमाणे या गटातील औषधे विशिष्ट सूक्ष्मजंतूंवरच परिणाम करित असल्यामुळे त्यांचा उल्लेख ‘विशिष्ट औषध’ अथवा नुसता ‘विशिष्ट (स्पेसिफिक)’ असाही करतात. १९०७ मध्ये अर्लिक यांनी आपल्या लेखनात ‘केमोथिरॅपिका स्पेसिफिका’ असाच उल्लेख केला आहे. त्यांच्या सालव्हरसाननंतर ‘जादूची गोळी’ हे नाव सार्थ करणारे औषध म्हणजे पेनिसिलिन व ते चाळीस वर्षानंतर मिळाले. सूक्ष्मजंतूंच्या कोशिकाभित्तीवर परिणाम करून रोगी शरीराच्या कोशिकांवर यत्किचिंतही दुष्परिणाम न करणारे हे औषध विशिष्टतेचे उत्तम उदाहरम आहे. म्हणजेच हे औषध शरीर-कोशिका व सूक्ष्मजंतू यांमधील जीवरासायनिक संरचनेतील फरक स्पष्टपणे ओळखते. काही प्रतिजैव औषध अनेक सुक्ष्मजंतूंवर परिणाम करू शकतात म्हणून त्यांना ‘बहुजीवरोधी’ म्हणतात, तर पेनिसिलिनासारख्या औषधांना ‘अल्पजीवरोधी’ म्हणतात.

(२) बंधन : रासायनी चिकित्सेतील औषधांचा दुसरा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ती कोशिकाभित्तीशी बद्ध झाल्याशिवाय कार्यान्वित होत नाहीत. अर्लिक यांच्या ट्रिपॅनोसोमा प्रजातीतील सूक्ष्मजंतूंच्या अभ्यासातून हे लक्षात आले व ‘रासायनी ग्राहक’ ही संज्ञा त्यांनी वापरली. त्यांचा ‘पार्श्व-शृंखला’ सिद्धांत याच अनुभवावर आधारलेला होता. या सिद्धांताप्रमाणे सूक्ष्मजीव-कोशिकांच्या पृष्ठभागावर पार्श्व-शृंखला अथवा रासायनिक गट असतात व या गटांबद्दल ठराविक औषधाला आसक्ती असल्यामुळे ते बद्ध होते आणि नंतर नाशक्रियेस प्रारंभ होतो. आजही या सिद्धांतात नवी भर पडली नसून पार्श्व-शृंखलेऐवजी ‘ग्राहक’ ही संज्ञा वापरात आहे.

(३) परिणामकारक वितरण : अर्लिक यांचे या चिकित्सेतील तिसरे महत्त्वाचे तत्त्व म्हणजे वापरलेले औषध रोगी शरीरात संसर्गाच्या स्थानी योग्य सांद्रतेत वितररित झाले पाहिजे. हा निकष बद्धतेपूर्वीच अमलात यावयास हवा. आधुनिक रासायनी चिकित्सेत संसर्गस्थान अदृश्य असूनही औषध तोंडी सेवनाद्वारे किंवा अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) रक्तप्रवाहातून संसर्ग-स्थानी पोहोचू शकते. कधीकधी विशिष्ट जागी औषध पोहोचण्यात अडचणी येतात, उदा., मेंदूतील रक्त-मेंदू अवरोध [⟶ मेंदू] किंवा अस्थीमधील कमी रक्त पुरवठ्याची स्थाने. यामुळे रक्तप्रवाहातील सूक्ष्मजंतूवर या औषधांची गुणकारिकता अधिक प्रभावी असते कारण त्यांचा सरळ संपर्क येतो.

औषधे, शरीर-कोशिका व परजीवी यांचे परसपरसंबंध. रोगी शरीर, परजीवी व औषध यांचे परस्परसंबंध : रासायनी चिकित्सेकरिता जेव्हा एखादे औषध वापरतात तेव्हा रोगी शरीकोशिका, परजीवी व औषध यांमध्ये परस्परसंबंध प्रस्थापित होतात. औषध परजीवीवर परिणाम करू लागते तेव्हाच ते शरीर-कोशिकांवरही परिणाम करू लागते. परजीवीही काही एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणारी प्रथिने) उत्पन्न करतात आणि ती औषधाचा नाश करू शकतात. उदा., पेनिसिलिनेज हे एंझाइम पेनिसिलिनाचा नाश करू शकते. काही परजीवी औषध-रोधी असतात. याशिवाय रोगी शरीर आपली ⇨रोगप्रतिकारक्षमता यंत्रणाही उपयोगात आणीत असते.              

कर्करोगावरील रासायनी चिकित्सा : कर्करोगावरील औषधी उपचारांची सुरुवात आपत्तिक घटनेतून झाली. पहिल्या व दुसऱ्या जागतिक महायुद्धांत मस्टर्ड वायू त्याच्या विषारी परिणामाकरिता वापरला असताना त्याचा शरीरातील लसीका कोशिकांवरील [⟶ लसीका तंत्र] मारक परिणाम लक्षात आला होता. १९४० मध्ये नायट्रोजन मस्टर्ड नावाचे त्याचे अनुजात (त्यापासून बनविलेली संयुगे) लसीका मांसार्बुद (लसीका कोशिका-समूहाचे मारक अर्बुद म्हणजे कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेली गाठ) या विकृतीवर वापरून पाहण्यात आले. सुरुवातीस यशस्वी वाटलेले हे औषध हॉजकिन रोगावरही (लसीका ग्रंथी, पानथरी व यकृत यांची वाढ होणाऱ्या आणि टॉमस हॉजकिन या इंग्रज वैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या रोगावरही) वापरून पाहण्यात आले परंतु दोन्ही रोग पुनरावर्तित झाल्यामुळे निराशा वाटू लागली होती. नंतर मेथोट्रेक्सेट हे औषध बालवयीन रक्तार्बुद अथवा श्वेतकोशिकार्बुद या रोगावर यशस्वी ठरल्यासारखे वाटले परंतु पुनरावर्तित झालेली विकृती कायमची व असाध्य ठरल्यानंतर निराशाच उत्पन्न झाली १९५० नंतर कर्करोगरोधी औषधांच्या शोधाकरिता जोरात प्रयत्न सुरू झाले. अनेक संश्लेषित औषधे, किण्वनजन्य (आंबण्याच्या क्रियेत निर्माण होणारी) किंवा वनस्पतीजन्य औषधे कृंतक (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या‍) प्राण्यांवरील प्रयोगांत अर्बुदरोधी असल्याचे आढळले. अधिक संशोधनानंतर अनेक औषधे मानवी रोगांवरही थोडाफार परिणाम करतात, असे आढळले.


       सूक्ष्मजीवजन्य विकृतींवर रासायनी चिकित्सा जेवढी यशस्वी झाली तेवढे यश तिला मारक अर्बुदांवरील उपचारात मिळालेले नाही. १९८८ सालापावेतो मारक अर्बुदांवर एकही सुरक्षित औषध सापडलेले नव्हते. संसर्गजन्य रोग व मारक अर्बुद यांमध्ये मुळातच पुढील काही फर्क आहेत : (१) रोगोत्पादक सूक्ष्मजीव हा नेहमीच बाह्य पदार्थ असतो व त्याची चयापचयात्मक (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमध्ये उद्‌भवणारी) क्रिया शरीरकोशिकांच्या याच क्रियेपेक्षा अतिशय भिन्न असते. यामुळे औषध सूक्ष्मजीव-कोशिका सहज निवडून तीवर परिणाम करते. अर्बुदातील कोशिकांचा चयापचय व शरीर-कोशिकांचा चयापचय जवळजवळ सारखाच असल्यामुळे औषधाला निवड करणे कठीण होते व म्हणून त्याची सुरक्षितता कमी होते. (२) संसर्गजन्य विकृतीच्या बाबतीत रासायनी चिकित्सेत वापरलेल्या औषधाला, शरीर ⇨प्रतिपिंड उत्पादन (हानिकारक बाह्य पदार्थाची विल्हेवाट लावण्यासाठी रक्तद्रवात विशिष्ट प्रथिने उत्पन्न करणे), भक्षीकोशिकांचे कार्य (बाह्य पदार्थांचे भक्षण करून त्याचा नाश करणाऱ्या कोशिकांचे कार्य) इ. क्रियांनी मदत करते. याउलट कर्ककोशिकांच्या विरूद्ध दिल्या जाणार्या औषधांना अशी मदत मिळत नाही. यामुळे त्यांचा संपुर्ण नाश साधणे कठीण असून रोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. (३) कर्ककोशिका औषधरोघी बनू शकतात.

मारक अर्बुदांवरील रसायनी चिकित्सा अजूनही उपशामकच आहे. फक्त काही विकृतींतच दीर्घकालीन रोगांचा जोर कमी असणारी अवस्था या औषधांमुळे प्राप्त होऊ शकते. ती वापरण्यापूर्वी निदानाची आवश्यकता असते, कारण ही औषधे जेवढी अर्बुद-कोशिकांना विषारी आहेत तेवढीच प्राकृतीक कोशिकांचा नाश करणारी आहेत.

ही औषधे पुढील निरनिराळ्या पद्धतींनी वापरात येतात : (१) तोंडाने, (२) अंतर्स्नायू अंतःक्षेपणाने, (३) अंतर्नीला अंतःक्षेपणाने, (४) अंतर्रोहिणी अंतःक्षेपणाने आणि (५) स्थानिक (रोग झालेल्या जागी) लावून वापरणे. यांपैकी अंतर्रोहिणी अंतःक्षेपणामध्ये अर्बुदाला पुरवठा करणाऱ्या रोहिणीतूनच औषध टोचले जाऊन योग्य व सुरक्षित सांद्रण मिळू शकते.

मारक अर्बुदांवरील रासायनी चिकित्सेकरिता वैद्यास योग्य अनुभवाची नितांत गरज असते. कोष्टक क्र. १. मध्ये काही मारक अर्बुद रोग व त्यांवरील औषधे तसेच त्यांचे परिणाम दर्शविले आहेत. 

कोष्टक क्र. १. काही मारक अर्बुद रोगांवरील रासायनी चिकित्सा (१९८४). 

रोग 

औषध 

परिणाम 

(अ) उत्तम प्रतिसाद मिळणारी अर्बुदे 

(१) गर्भवेष्ट-कर्क 

मेथोट्रेक्सेट,व्हिंका अल्कलॉइडे 

८० % पेक्षा जास्त प्रतिसाद कधी-कधी पूर्ण अपकर्ष व तोही टिकाऊ. 

(२) अष्ठीला ग्रंथी कर्करोग 

स्त्रीमदजने (इस्ट्रोजेन्स) 

८० % प्रतिसाद जीवनकालात वाढ. 

(३) यूइंग मांसकर्क 

सायक्लोफॉस्फामाइड, ॲड्रियामायसीन 

५० टक्के पेक्षा जास्त प्रतिसाद सोबत ⇨ प्रारण चिकित्सा असल्यास जीवनकालात वाढ.

(४) विल्मअर्बुद 

ॲक्टिनोमायसीन-डी, न्हिनक्रिस्टाइन 

८० %, २ वर्षे जीवनकालात वाढ,शस्त्रक्रिया, प्रारण व रासायनी अशी मिश्र चिकित्सा असल्यास. 

(५) स्तनकर्क 

स्त्रिमदजने, पौरूषजने (अँड्रोजेन्स) वगैरे 

२५-७५ % प्रतिसाद, जीवनकालात वाढ. 

(६) वृषण कर्क

व्हिनब्‍लास्टाइन, ब्‍लिओमायसीन

दीर्घकालीन, पूर्ण उपशम ८० %.

(आ) साधारण प्रतिसाद मिळणारी अर्बुदे

(१) प्रौढातील अस्थि-मांसकर्क

ॲक्टिनोमायसीन-डी, ॲड्रियामायसीन

१५−५० % दृश्य प्रतिसाद

(२) अंडाशय कर्क

अल्किलीकरण करणारी औषधे उदा.,   ब्यूसल्फान, मेलफालान वगैरे.

३०−५० % सुधारणा

(३) गर्भाशयांतर कर्क

प्रोजेस्टिने

२५ % सुधारणा

(इ) अत्यल्प प्रतिसाद मिळणारी अर्बुदे 

(१) यकृत व अग्निपिंडाची अर्बुदे

५− फ्ल्यु ओ रोयुरॅसिल

१० % सुधारणा

(२) फुफ्पुस कर्क

अल्किलीकरण करणारी औषधे, ॲड्रिमायसीन, ५− फ्ल्युओरोयुरॅसिल इत्यादी.

५−१० % दृश्य सुधारणा

(३) गर्भाशय ग्रीवा कर्क

अल्किलीकरण करणारी औषधे.

५ % दृश्य सुधारणा

(४) कृष्ण कर्क

इमिडॅझोल कार्बाक्सामाइड.

अल्पकालीन, २० % पेक्षा प्रतिसाद.

[⟶ अर्बुदाविज्ञान कर्करोग].


 कोष्टक क्र. २ मध्ये काही प्रमुख रोग आणि त्यांवर रासायनी चिकित्सेत वापरली जाणारी औषधे दिली आहेत. 

कोष्टक क्र. २ मध्ये काही प्रमुख रोग आणि त्यांवर रासायनी चिकित्सेत वापरली जाणारी औषधे

रोग 

रासायनिक औषध 

अमीबाजन्य विकार 

एमेटीन, एंटोबेक्स, मेट्रोनिडाझोल (फ्लॅजिल). 

उपदंश 

पेनिसिलीन 

कुष्ठरोग 

सल्फॉने (डीडीएस, डॅप्सोन), रिफँपिसीन. 

कृमीविकार 

(१) अँकिलोस्टोमायसीस 

बफेनियम 

(२) खंडितकायी अथवा शिस्टोसोमा 

निरिडॅझोल 

(३) जंत

पायपरेझीन

(४) ड्रॅकॉन्टिॲसिस (नारू)

मेट्रोनिडाझोल

कोष्टक क्र. २. (पुढे चालू) 

रोग 

रासायनिक औषध 

(५) पट्टकृमी अथवा फीतकृमी 

क्लोरसॅलिसिलामाइड, मेपॅक्रिन. 

(६) हत्तीरोग 

डाय-थिल कार्बामेझीन (हेड्राझान) 

खुपरी 

सल्फाडायझीन (तोंडाने), सल्फासेटामाइड (स्थानिक). 

परिमस्तिष्क ज्वर 

सल्फाडायझीन 

प्रमेह 

पेनिसिलीन 

प्लेग

स्ट्रेप्टोमायसीन

मूत्रमार्ग संसर्गजन्य रोग

नायट्रोफ्यूरांटॉइन

वंक्षण कणार्बुद

सल्फॉनामाइडे

व्हायरसजन्य विकार

आयडोक्सयुरिडीन

स्ट्रेप्टोकोकाय, स्टॅफिलोकोकाय, न्यूमोकोकाय, ट्रिपोनेमा, रिकेट्‌सिया

पेनिसिलिने, एरिथ्रोमायसीन.

हिवताप

क्किनीन, क्लोरोक्किन, पामक्किन, मेपॅक्रिन, मेफ्लोक्किन.

क्षयरोग

स्ट्रेप्टोमायसीन, रिफँपिसीन, पॅराॲमिनो सॅलिसिलिक अम्‍ल (पास), आयसोनिकोटिनिक अम्‍ल हायड्राझाइड (आयएनएच).

पहा : प्रतिजैव पदार्थ सल्फा औषधे.

संदर्भ : 1. Braunwald, E. and others, Ed., Harrison’s Principles of Internal Medicine, Vol. I, New York, 1987.

            2. Laurance, D. R. Bennett, P. N. Clinical Pharmacology, Edinburgh, 1973.

           3. Satoskar, R. S. Bhandarkar, S. D. Pharmacology and Pharmacotherapeutics, Bombay, 1983.

भालेराव, य. त्र्यं.