आर्किऑप्टेरिक्स : जुरासिक (१३ ते १५ कोटी वर्षांपूर्वीच्या ) कालात राहणारे पण त्या कालानंतर निर्वंश झालेले पक्षी. आपणास माहीत असलेल्या पक्ष्यांपैकी हे सर्वांत प्राचीन होत. त्यांचे चारच जीवाश्म (अवशेष) आतापर्यंत सापडलेले आहेत व ते सर्व जर्मनीच्या बव्हेरिया प्रांतातल्या झोलेनहोफेन या गावाच्या भोवताली असलेल्या उत्तर जुरासिक कालातल्या खडकांत सापडलेले आहेत. शिलामुद्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या

आर्किऑप्टेरिक्स

 चुनखडकाच्या उत्कृष्ट फरशांसाठी झोलेनहोफेनच्या खाणी प्रसिद्ध आहेत. पक्ष्यांची शरीरे एकंदरीत लहान व सापेक्षतः नाजूक पदार्थांची बनलेली असतात, त्यामुळे त्यांचे अवशेष जीवाश्मरूपाने सुरक्षित राहणे ही अत्यंत विरळाच घडणारी घटना आहे व ती झोलेनहोफेनच्या खडकांत घडलेली आहे. उथळ समुद्रात किंवा जमिनीवर राहणाऱ्या इतर कित्येक प्रकारच्या प्राण्यांचे शेकडो जीवाश्मही या खडकांत आढळतात. १८६१ साली खाणकाम चालू असताना सापडलेला एका पिसाचा स्पष्ट ठसा हा या खाणीत सापडलेला पहिला पक्षिजीवाश्म होय. त्यानंतर सुमारे वर्षाने दुसरा जीवाश्म सापडला. त्याच्यात डोक्याच्या कवटीखेरीज शरीराच्या इतर सर्व भागांचा म्हणजे पंख, पाय व शेपूट यांचा सांगाडा सुरक्षित अवस्थेत असून पंखांच्या व शेपटीच्या पिसांचे स्पष्ट ठसेही आहेत. हा जीवाश्म ब्रिटनच्या निसर्गविज्ञान संग्रहालयाने विकत घेतला. १८७७ साली आणखी एक सांगाडा सापडला व तो बर्लिनच्या निसर्गविज्ञान संग्रहालयाने मिळविला. हा नमुना पूर्वीच्या नमुन्यापेक्षा अधिक सरस असून त्याच्यात कवटीसकट सर्व सांगाडा आहे व तो अधिक चांगल्या स्थितीत राहिलेला आहे. दुसरा सांगाडा पहिल्या सांगाड्या-सारखाच आहे असे प्राथमिक परीक्षणात दिसून आल्यावरून दोन्ही सांगाडे एकाच जातीच्या पक्ष्याचे आहेत अशी कल्पना झालेली होती. सूक्ष्म परीक्षणानंतर त्यांच्यात काही भेद आढळून आले व ते निरनिराळ्या जातींच्या एवढेच नव्हे तर निरनिराळ्या गोत्रांच्या पक्ष्यांचे आहेत अशी मते व्यक्त केली गेली. पण अलीकडील काही वैज्ञानिकांचे असे मत आहे की, या दोन्ही जीवाश्मांचे मूळ पक्षी एकाच जातीचे असावेत व मूळ पक्ष्यांची वये भिन्न असणे किंवा त्यांचे लिंग भिन्न असणे ही त्यांच्या सांगाड्यांमधील भेदांची कारणे असावीत. त्यानंतर पुष्कळ वर्षांनी, १९५६ साली, आणखी एक जीवाश्म सापडला, पण त्याच्यातला सांगाडा अपुरा आहे. वर उल्लेख केलेले जीवाश्म ज्यांचे आहेत ते पक्षी आकारमानाने सुमारे कबूतराएवढे असत. त्यांच्या शरीराचे काही भाग आजच्या पक्ष्यांपेक्षा भिन्न असत. आजच्या पक्ष्यांना व अंडावस्थेतील वाढ पूर्ण होऊन अंड्याबाहेर पडलेल्या कोणत्याच पक्ष्याला दात नसतात व चोच असते. आर्किऑप्टेरिक्सादी पक्ष्यांना चोच नसे. त्यांचा जबडा आखूड असे व त्याच्यात दात असत. ते एखाद्या पालीच्या दाताप्रमाणे शंकूच्या आकाराचे असत व प्रत्येक दात स्वतंत्र खाचेत बसविलेला असे.

या पक्ष्यांच्या शेपटाची रचना आजच्या पक्ष्यांच्या शेपटाच्या रचनेहून अगदी भिन्न असे. त्यांचे शेपूट त्यांच्या धडापेक्षा लांब व चाबकाच्या दोरीप्रमाणे लोंबकळणारे असे व त्याचा सांगाडा सुमारे वीस वेगवेगळे लांबट मणके एकत्र जुळून तयार झालेला असे. शेपटाच्या शेवटच्या मणक्याखेरीज इतर प्रत्येक मणक्याला उजव्या व डाव्या बाजूस एकेक पीस बसविलेले असे. आजच्या पक्ष्यांच्या शेपटाचा सांगाडा अल्पविकसित असतो व त्याच्या शेवटाशी असलेल्या एका त्रिकोणाकार अस्थिमय पट्टीपासून शेपटाची पिसे निघालेली असतात.

या जुरासिक पक्ष्यांचे पंख जरा आखूड असत व त्यांना आजच्या पक्ष्यांच्या पंखांना असतात तशी मुख्य व गौण पिसे असत पण पंखांच्या सांगाड्याची हाडे आजच्या पक्ष्यांच्या पंखांच्या हाडांइतकी विशेषित नसत. त्यांच्या करभास्थी (तळव्याची हाडे) सुट्या व स्वतंत्र असत व पंखांच्या सांगाड्याच्या टोकाशी बळकट नखर असणारी तीन बोटे असत. हे पक्षी आजच्या सामान्य पक्ष्यांप्रमाणे उड्डाणक्षम नसावेत असे त्यांच्या पंखांच्या सांगाड्यांच्या एकूण रचनेवरून दिसून येते. पंख व शेपूट यांची पिसे ज्या पातळीत बसविलेली असत तिच्यावरून ते पक्षी हवेवर घसरत उडत असावेत असे दिसते. पंखाचे व पायाचे बळकट नखर लक्षात घेतले म्हणजे हे पक्षी त्यांच्या चारही अवयवांनी चढू शकत असावेत किंवा कदाचित चालूही शकत असावेत असे दिसते.

आर्किऑप्टेरिक्सांच्या शरीराचे काही भाग पक्ष्यांच्या शरीरासारखे तर काही सरीसृपांसारखे (सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे) असल्यामुळे त्यांचा समावेश पक्ष्यांत करावा का सरीसृपांत करावा याविषयी मतभेद आहेत. कवटीचा आकार, चोच नसणे, दात असणे, इ. सरीसृपांची वैशिष्ट्ये त्यांच्यात होती व पिसांशिवाय असलेले अवशेषच सापडले असते तर त्यांची गणना सरीसृपात केली गेली असती. पण त्यांना पिसे होती म्हणून त्यांचा समावेश पक्ष्यात केला जातो ते आजच्या पक्ष्यांचे, प्राचीन व आद्य पूर्वज होत असे सामान्यतः मानले जाते व त्यांचा आर्किऑर्नीथीस या नावाचा एक वेगळा उपवर्ग केला जातो. पक्षी व सरीसृप यांना जोडणारा दुवा असे या पक्ष्यांचे सार्थ वर्णन करता येईल. केवळ कर्मधर्मसंयोगाने आर्किऑप्टेरिक्साचे जीवाश्म उपलब्ध होऊ शकले म्हणून पक्षी व सरीसृप यांसारख्या भिन्न प्रकारच्या प्राण्यांच्या मध्यम प्रकारचे प्राणी एके काळी अस्तित्वात होते हे सिद्ध झाले व इतर प्रकारच्या प्राणिप्रकारांना जोडणारे दुव्यासारखे संयोगी प्राणी पूर्वी अस्तित्वात असणे असंभवनीय नाही हेही कळून चुकले.

पहा : जुरासिक पक्षि वर्ग सरीसृप.

संदर्भ :  1. Davies, A. M. Stubblefield, C. J. An Introduction to Palaeontology, London, 1961.

             2. Parker, T. J. Haswell, W. A. A Textbook of Zoology, Vol. II, London, 1963.

केळकर, क. वा.