बर्क, एडमंड : (१२ जानेवारी १७२९ ? -९ जुलै १७९७). अठराव्या शतकातील थोर राजकीय विचारवंत आणि तत्कालीन ब्रिटिश पार्लमेंटमधील व्हिग पक्षाचा विख्यात मुत्सद्दी. बर्कचा जन्म आयर्लंडमधील डब्लिन या गावी सुस्थितीतील कुटुंबात झाला. त्याचे वडील प्रॉटेस्टंट असून ते कायदा अधिकारी होते. आई कट्टर कॅथलिक होती. बर्कने वडिलांकडे कायद्याचा अभ्यास केला, तर आई-कडून सखोल धार्मिक संस्कार घेतले. त्याचे महत्वाचे शिक्षण डब्लिनच्या ट्रिनिटी महाविद्यालयात झाले. १७५६ मध्ये त्याची पहिली दोन पुस्तके प्रकाशित झाली व त्याच वर्षी त्याचा जेन न्यूजेंटशी विवाह झाला. त्याला दोन पुत्र झाले.१७५८ मध्ये वार्षिक नोंदणी-ग्रंथ करण्याचे काम त्याला मिळाले, ते त्याने पुढे ३० वर्षे सांभाळले. १७५९ मध्ये तो विल्यम हॅमिल्टनचा सचिव झाल्यापासून खऱ्या अर्थाने राजकारणात उतरला. पुढे तो दुसऱ्या मार्क्विस ऑफ रॉकिंगॲमचा सचिव झाला. याच सुमारास डॉ. सॅम्युएल जॉन्सन, नटश्रेष्ठ डेव्हिड गॅरिक, चित्रकार जॉश्युआ रेनल्ड्झ यांच्याशी त्याचा स्नेह जमला. तो १७६६ व १७७४ या दोन्ही निवडणुकांत पार्लमेंटमध्ये निवडून गेला होता. १७८० नंतर तो राखीव सदस्य म्हणून तेथे होता. पिटच्या कारकीर्दीत वॉरन हेस्टिंग्जच्या खटल्यात हेस्टिंग्जविरोधी भूमिका घेऊन १७८६ मध्ये त्याने पार्लमेंट चांगलेच गाजवले. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जेव्हा त्याने राज्यक्रांतीविरोधी खंबीर भूमिका मांडली, तेव्हा तर तो साऱ्या यूरोपभर आणि अमेरिकेत प्रसिद्ध झाला. आयर्लंडला स्वायत्ततेचे हक्क द्यावे, असे त्याचे मतही त्याला प्रसिद्धी देऊन गेले. तो वीकन्झफील्ड येथे मृत्यू पावला. त्या घटनेचे वर्णन ‘साऱ्या जगाने दखल घ्यावी अशी घटना’ या शब्दांत जॉर्ज कॅनिंगने केले आहे.

एडमंड बर्क

ॲरिस्टॉटल आणि सेंट टॉमस यांच्या परंपरेतील थोर राजकीय विचारवंत म्हणून बर्कचे स्थान पक्के आहे परंतू रिचर्ड हूकरप्रमाणे तो ख्रिस्ती धर्मचिंतक नव्हता. हेगेलने बर्कचेच विचार घेऊन ते अत्यंत पद्धतशीर स्वरूपात मांडलेले दिसतात. निसर्गाच्या भव्यतेशी आणि सौंदर्याशी एकतानता साधेल. असे मानवी जीवन हवे आणि अशा जीवनाला साधनमात्र ठरेल असे राजकारण करावे, तसेच स्थिर आणि समृद्ध जीवन उद्ध्वस्त होईल, नैतिक अधःपतन घडवून आणेल असे राजकारण त्याज्य ठरवावे हे बर्कच्या विचारसरणीचे मुख्य सूत्र आहे. राज्यघटनेने घालून दिलेल्या रूढ्या, पार्लमेंटचा सदस्य हा राष्ट्राची काळजी (पक्षाची नव्हे) वाहणारा स्वतंत्र प्रतिनिधी असण्याची आवश्यकता, अधिकार आणि सामाजिक श्रेणी, समाजाचे नैतिक व धार्मिक शिरस्ते राजकारण्याने पाळण्याची आवश्यकता या साऱ्यांचाच त्याने त्याच्या ऐटबाज आणि अभिजात शैलीत वारंवार पुरस्कार केला आहे परंतु कुठल्याही समस्येचा चौफेर विचार करूनच तिची उकल केली पाहिजे, विचारसरणीपेक्षा प्रत्यक्ष पेचप्रसंगाचा गुंता सुटला पाहिजे, यांवर तो भर देतो.

अमेरिकन राज्यक्रांतीचे स्वागत करणाऱ्या आणि व्हिग पक्षात असणाऱ्या बर्कने फ्रेंच राज्यक्रांतीला विरोध केला, त्या वेळी यूरोपात रूसो-व्हाल्तेअरच्या क्रांतिकारी तत्वज्ञानांतील कच्चे दुवे उमजू लागले होते. बर्कने क्रांतिविषयक विचाराला योग्य दिशा दिली. अमूर्त मानवी हक्कांचे मर्यादित महत्व ओळखून बर्कने त्यांच्या जागी राष्ट्रभावना, परंपरा आणि इतिहास यांची प्रतिष्ठापना केली. व्यक्तिमहात्म्याची जागा समाजहित आणि संस्थांची थोरवी यांना दिली. राज्यघटनेची महती सांगताना त्याने राजा, उमराव आणि जनतेने निवडलेले प्रतिनिधी यांच्यातील सत्तासमतोलाचा महत्वाचा सिद्धांत मांडला. इंग्लंडच्या राज्यघटनेचे परंपरानुसारी मार्गदर्शक (प्रीस्किप्टिव्ह) स्वरूप विशद केले आणि ती घटना अनेक पिढ्यांच्या शहाणपणाचे संचित असल्याचे पटवून दिले, तिसऱ्या जॉर्जची सत्ता वाढविणे किंवा पार्लमेंटची पुनर्रचना करणे, हे त्याला अमान्य होते. पार्लमेंटमध्ये कायद्याचा तपशील ठरविणे हे देखील त्याला पूर्णतः नापसंत होते.


मानवी समाज संघटित असतो, त्याला विशिष्ट इतिहास असतो, त्यातील संस्थांची विशिष्ट जडणघडण असते. समाजाची आदरस्थाने, चालीरीती यांची खास घाटणी असते. या साऱ्यांचा विचार करूनच स्वातंत्र्य, समता यांसारख्या अमूर्त कल्पनांचा पाठपुरावा केला पाहिजे, एरवी घृणास्पद हत्याकांड आणि विध्वंसक मूर्खपणा यांच्याशिवाय काही मिळायचे नाही, समाजऐक्य भंगून अराजक मात्र उत्पन्न होईल, हा विचार त्याने मांडला. राजकीय विचारांच्या क्षेत्रात खरेखुरे राजकीय व्यक्तिमत्व (ए ट्रू पॉलिटिक पर्सनॅलिटी) म्हणजे काय, या संबंधीचा विचार त्याने पुरस्कारिला. बर्कची आणखी महत्वाची कामगिरी म्हणजे त्याने भ्रामक बुद्धिवाद हाणून पाडला. समाज आणि सामाजिक परंपरा एखाद्या देशाने निर्माण केलेली संस्कृती कशी टिकवितात विज्ञान, कला आणि विद्वत्ता यांच्या वाढीस कशी मदत करतात, हे ठासून सांगितले. दैवी योजना इतिहासातून प्रकटते असेही त्याला वाटे. राज्य या कल्पनेविषयी त्याला कमालीचे आकर्षण होते परंतु संस्कृती आणि धर्म यांविषयी त्याची आदरभावना ठाम होती.

एकोणिसाव्या शतकातील काँझर्व्हेटिव्ह आणि लिबरल पक्ष, यूरोपातील नेपोलियनविरोधी राजकारण, विसाव्या शतकातील उजव्या विचारसरणी आणि घटनात्मक लोकशाही मानणारे अनेक विचारवंत यांच्यावर बर्कचा विलक्षण प्रभाव पडलेला दिसतो. अमेरिकन परराष्ट्रीय धोरणावरही बर्कचा ठसा उमटलेला आहेच. राजकीय सनातनीपणाचा जनक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. सनातनीपणा-काँझर्व्हेटिझम पूर्वी नव्हता असे नाही परंतु बर्कचे स्थान त्याने त्यांचे तत्त्वज्ञान मांडले, ह्यात आहे.

आयुष्यभर बर्कने राजकारणाबरोबर लिखाणही केले. त्याच्या लिखाणात ए व्हिडिकेशन ऑफ नॅचरल सोसायटी (१७५६), ए फिलॉसॉफिकल इन्क्वायरी इन टू द ऑरिजिन ऑफ आवर आयडीयाज ऑफ द सब्लाइम अँड द ब्यूटिफुल (१७५६), ऑब्झर्व्हेशन्स ऑन ए लेट पब्लिकेशन एन्‌टायटल्ड द प्रेझेंट स्टेट ऑफ द नेशन्स (१७६९), थॉट्स ऑन द कॉज ऑफ द प्रेझेंट डिसकन्टेट्स (१७७०), ऑन अमेरिकन टॅक्सेशन (१७७४) हे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. त्याचा रिफ्लेक्शन्स ऑन द रेव्हूलेशन इन फ्रान्स (१७९०) हा ग्रंथ तर जगविख्यात असून त्यात बर्कची सनातनी विचारसरणी, स्वभाव आणि शैली यांचा प्रभावी समन्वय साधला आहे.

बर्कने केलेली उदात्त आणि सुंदर यांची मीमांसादेखील साहित्यसमीक्षेत  महत्वाची आहे. दीद्रो, कांट आणि लेसिंग यांनी तिची प्रशंसा केली आहे. बर्कची शैली सिसरोच्या धर्तीची आहे.  त्याच्या प्रभावी वक्तृत्वाचा शैलीवर परिणाम झालेला आहे. ढंगदार वक्रोक्ती, शब्दांची विशेषतः लॅटिन शब्दांची फेक, चढत चढत जाणारी वाक्ये, गंभीर आणि सडेतोड विधाने यांत बर्क डॉ. जॉन्सनपेक्षा कमी नाही. इंग्लिश राजकारणाची नस आणि त्याचे उत्तम गद्य ज्याला समजावून घ्यायचे आहे, त्याने (चर्चिलप्रमाणेच) रात्रंदिवस बर्क वाचला पाहिजे, असे म्हणतात हे काही अवास्तव नाही.

संदर्भ :   1. Cauvan, F. P. Durham, N. C. The political Reason of E. Burke, New York, 1960.

             2. Cone, C. B. Lexington, K. Y. Burke and Nature of Politics, London. 1957.

             3. Magnus-AllCroft, P. M. E. Burke : a Life, New York, 1973.

             4. Murray, R. H. Edmund Burke : a Biography, London. 1931.

             5. Parkin, C.W. The Moral Basis of Burke’s Political Thought, Cambridge, 1968.

             6. Stanlis, P. J. Edmund Burke and the National Law, London,1965.

 

कुलकर्णी, अनिरुद्ध