औंस : मार्जार कुलातला आणि चित्त्याचा नातेवाईक असणारा हा प्राणी बिबळ्यापेक्षा काहीसा लहान असतो. याचे शास्त्रीय नाव फेलिस उन्सिया असे आहे. त्याची लांबी सु.२१५ सेंमी. असते व शेपूट १९ सेंमी. असते. अंगावरचे केस लांब, दाट आणि मऊ असतात. रंग पांढुरका करडा असून त्यावर गुच्छासारखे मोठे काळे ठिपके असतात.  रंग पांढुरका करडा असून त्यावर गुच्छासारखे मोठे काळे ठिपके असतात.  चित्त्याच्या अंगावरील ठिपक्यांपेक्षा हे मोठे पण थोडे असतात. याचे डोके लहान असते पाय जाड, मजबूत व केसाळ असतात.

भारतात कश्मीरपासून सिक्कीमपर्यंतच्या हिमालयाच्या भागात हा आढळतो. उत्तरेकडे तिबेट, मध्य आशिया आणि दक्षिण सायबीरियात तो सापडतो. हिमालयात ३,६५० — ३,९५० मीटर उंचीवरील दुर्गम खडकाळ प्रदेशात तो राहत असल्यामुळे त्याच्या सवयींविषयी फारच थोडी माहिती मिळते.

दिवसा तो सहसा बाहेर पडत नाही पण रात्री रानमेंढ्या, बकऱ्या, कस्तुरीमृग, ससे इ. प्राण्यांची शिकार करण्याकरिता बाहेर पडतो. उन्हाळ्यात वरची कुरणे पाळीव जनावरांना चरण्याकरिता जेव्हा मोकळी होतात तेव्हा तो पाळीव जनावरेदेखील मारतो. चित्ते आणि वाघ यांच्याप्रमाणेच मनुष्यवस्तीच्या आसपास घोटाळत राहून संधी मिळेल तेव्हा पाळीव जनावरांची तो शिकार करतो. हिवाळा सुरू होताच इतर प्राण्यांप्रमाणे हादेखील खाली उतरून १,८३० मी.उंचीवरील प्रदेशात येतो. इतर शिकारी पशूंप्रमाणेच औंसच्या हालचालीदेखील त्याच्या नेहमीच्या भक्ष्यांच्या हालचालींवर अवलंबून असतात.

कर्वे, ज. नी.