राहुकेतु : पृथ्वीभोवती चंद्र फिरतो व सूर्याभोवती चंद्रासह पृथ्वी फिरत असते. पृथ्वी व चंद्र यांच्या कक्षा भिन्न पातळ्यांत असून दोन्ही पातळ्यांत सु. ५ २’ चा कोन आहे म्हणून चंद्राची कक्षा पृथ्वी कक्षेच्या म्हणजे आयनिक वृत्ताच्या पातळीत दोन बिंदूंत छेदते, या बिंदूंना पात असे म्हणतात. ज्या पातापाशी चंद्र आयनिक वृत्ताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो, त्या बिंदूला आरोही पात किंवा राहू आणि ज्या पातापाशी तो उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो त्या पाताला अवरोही पात किंवा केतू असे म्हणतात. हे दोन्ही पात पृथ्वीच्या विरूद्ध अंगास असतात. पृथ्वीखेरीज सूर्याच्या व इतर ग्रहांच्या आकर्षणामुळे चंद्राची कक्षा सावकाश बदलते आणि यामुळे राहू व केतू यांना उलट (विलोम) गती मिळते व ती चंद्राच्या एका प्रदक्षिणेत पूर्वेकडून पश्चिमेकडे सु. १·५ इतकी आहे. राहू व केतू यांना जोडणाऱ्या रेषेची एक प्रदक्षिणा १८·६ वर्षांत पूर्ण होते.

राहूची (किंवा केतूची) दैनिक वक्री गती ३’ १०”·६४ आहे व सूर्याची दैनिक मार्गी गती मध्यम मानाने ५९’ ८”·३३ आहे. यामुळे सूर्यसापेक्ष राहूची (किंवा केतूची) दैनिक गती ६२’ १९” इतकी होते. या गतीने सूर्यसापेक्ष एक प्रदक्षिणा करण्यास राहूला ३४६·६२ दिवस लागतात म्हणजेच राहू व सूर्य यांची एकदा युती झाल्यानंतर पुढची युती ३४६·६२ दिवसांनी होते. या कालावधीस पाताचे (राहूचे) नाक्षत्र वर्ष वा ग्रहण वर्ष असे म्हणतात. राहूच्या एका प्रदक्षिणेच्या कालात सूर्य−राहूच्या १९ युत्या होतात. हा काल २२३ चांद्रमास किंवा १८ वर्षे ११ दिवस (५ लीप वर्ष आल्यास १८ वर्षे १० दिवस) इतका होतो. राहूची सूर्याशी युती होताना राहूत किंवा राहूनजीक चंद्र आल्यास ग्रहण होते. एकदा झालेल्या चंद्र किंवा सूर्यग्रहणासारखे पुढचे ग्रहण १८ वर्षे ११ दिवसांनी (१८·६ चांद्रवर्षांनी) होते. यासच ‘ग्रहण चक्र’ किंवा ‘सारोस’ असे म्हणतात.

ग्रहण वर्षाचा निम्मा काळ १७३ दिवसांइतका म्हणजे सहा महिन्यांना थोडा कमी असतो. या काळात राहूपासून निघून सूर्य केतूत येतो. यामुळे एकदा ग्रहणे झाल्यावर पुन्हा सहा महिन्यांनी ग्रहणे होतात. चंद्र व सूर्य एकाच पातात (किंवा नजीक) आले, तर सूर्यग्रहण व भिन्न पातात (किंवा शेजारी) आले, तर चंद्रग्रहण होते.

राहू व केतू हे राक्षस असून ते सूर्यचंद्रांना गिळतात, असा समज होता. यासंबंधी पुराणांत असलेली कथा अशी : मुळात हा एकच पुरूष. तो विप्रचिती आणि सिंहिका यांचा मुलगा होता. कश्यप व दनू यांचा हा मुलगा असाही उल्लेख भागवतात आहे. मोहिनी-रूप घेतलेले विष्णू देवांना अमृताचे वाटप करीत असताना हा देवांच्या पंगतीत बसला होता. त्याची ही लबाडी सूर्यचंद्रानी विष्णूंच्या निदर्शनास आणली. त्याबरोबर विष्णूंनी त्याचे डोके उडविले म्हणून हे दोन झाले : धडाचा भाग तो राहू व राहिलेला (डोक्याचा भाग) तो केतू. यामुळे सूर्यचंद्रावर राग धरून राहू व केतू त्यांना गिळतात, अशी पौराणिक कथा आहे.

फलज्योतीषात राहू हा नवग्रहांपैकी आठवा ग्रह मानला असून हा तमोगुणी, पुरूष प्रकृतीचा व नेर्ऋत्य दिशेचा स्वामी मानतात. त्याचे वाहन काळा सिंह किंवा घोडा मानला आहे. याला गती असल्याने ज्योतीषांनी याला ग्रह मानला असावा. मंगळादी ग्रहांप्रमाणे राहू व केतू हे प्रत्यक्ष दिसणारे ग्रह नाहीत. राहू जन्मलग्न कुंडलीत अनिष्ट स्थानी असेल, तर त्या व्यक्तीला पिशाच्च बाधा होते, असा समज आहे. संततिनाशही संभवतो. एरव्ही तो गुरुशुक्राप्रमाणे भाग्यवृध्दी करणारा व शुभफलदायी आहे. राहूच्या उच्च, नीच व स्वक्षेत्र यांसंबंधात एकवाक्यता नाही. काहींच्या मते वृषभ राशी ही त्याची उच्च राशी व कन्या स्वगृह राशी आहे.

इतर ग्रहांच्या कक्षांच्या पातळ्यासुध्दा आयनिक वृत्ताच्या पातळीसापेक्ष कललेल्या असून त्यांच्याबाबतींतही असे पातबिंदू आहेत. त्यांनाही गती असून ती फारच कमी असते. उदा., बुधाच्या पाताचा प्रदक्षिणा काल १,६६,००० वर्षे आहे.

ठाकूर, अ. ना.