खासी भाषा : खासी जमातीची भाषा. ती ⇨ ऑस्ट्रोआशियाई भाषासमूहातील आहे. तिच्या महत्त्वाच्या बोली खासी, लिंग्नाम, सिंतेङ् अथवा प्नार, वार आणि जिरांग या असून, त्यांतील चेरापुंजीची खासी बोली सर्वश्रेष्ठ मानली जाते. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे खासी भाषिकांची संख्या २,८९,६५० होती आणि त्यांतले जवळजवळ एक हजार लोक भारताच्या इतर राज्यांत होते.

खासीला स्वतःची अशी परंपरागत लिपी नाही. ज्या ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी तिचा सर्वांत आधी अभ्यास केला, त्यांनी रोमन लिपी वापरून तिची व्याकरणे लिहिली.

ध्वनिविचार : खासीची ध्वनिव्यवस्था पुढीलप्रमाणे आहे :

स्वर : आ, इ, उ, ए, ओ (ऱ्हस्व व दीर्घ).

व्यंजने : स्फोटक– क, ख, त, थ, द, प, फ, ब, भ, ?.

            अर्धस्फोटक– ज

            अनुनासिक– ङ, न, म, ञ.

            कंपक– र

            पार्श्विक– ल

            घर्षक– फ, श, स, ह.

            अर्धस्वर– य, व.

(खुलासा : ? हे चिन्ह कंठस्थ स्फोटकासाठी आहे).

रूपविचार : खासी रूपघटक एकावयवी आहेत. रूपांचे वर्गीकरण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद असे करता येते. यांशिवाय क्रियाविशेषणे, शब्दयोगी अव्यये, उभयान्वयी, उपसर्ग इ. वर्गही आहेत.

नाम : नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहेत. लिंगवाचक निर्गुण विशेषण नामाआधी येते. त्याची रूपे अशी : एकवचन पु.उ, स्त्री.का, आपुलकी किंवा न्यूनत्वदर्शक इ अनेकवचन (सर्वांसाठी) कि. नामाचे कार्यदर्शक रूप नामापूर्वी उपसर्ग जोडून होतेः उदा., उ ब्रीव ‘पुरुष’, इआउब्रीव (कर्मवाचक), दा उ ब्रीव ‘पुरुषाने’–अ. व. कि ब्रीव ‘पुरुष’, इआ कि ब्रीव (कर्मवाचक), दा कि ब्रीव ‘पुरुषांनी’ इत्यादी.

विशेषण : गुणवाचक नामाला हा उपसर्ग जोडून विशेषण बनते:  भा ‘चांगुलपणा’–बभा ‘चांगला’. स्नीव ‘वाईटपणा’–बस्नीव ‘वाईट’. विशेषण नामानंतर येते : उ ब्रीव बभा ‘चांगला माणूस’ पण संख्यावाचक विशेषण नामापूर्वी यते : आर-डु.त ‘दोन माणसे’.

सर्वनाम : पुरुषवाचक सर्वनामे पुढीलप्रमाणे आहेत :

ए.व.

अ.व.

प्र.पु.

ङा ‘मी’

ङा ‘आम्ही’

द्वि.पु.

मे (पु.) ‘तू’

फी ‘तुम्ही’

फा (स्त्री.)

तृ.पु.

उ (पु,) ‘तो’

की ‘ते, त्या’

का (स्त्री.) ‘ती’

दर्शक सर्वनामे तृ. पु. सर्वनामांना जवळ, दूर इ. अर्थांचे प्रत्यय लावून संबंधदर्शक सर्वनामे व हा प्रत्यय लावून आणि प्रश्नार्थक सर्वनामे नो किंवा एइ हा प्रत्य लावून होतात. स्ववाचक सर्वत्र हे आहे.

क्रियापद : धातूला पन् हा उपसर्ग जोडून प्रयोजक, इअइ जोडून पौनः– पुन्यदर्शक, मन् जोडून प्रारंभवाचक, इअ जोडून परस्परवाचक आणि कन्, लन्, सन्, तन्, हे जोडून तीव्रतावाचक रूपे मिळतात.

क्रियापदाचे एकच रूप असते. काळ व अर्थ उपसर्गावरून आणि वचन व पुरुष कर्त्यावरून ओळखता येतात.

वाक्यात सामान्यतः आधी कर्ता, मग क्रियापद व शेवटी कर्म असा क्रम असतो पण तो अपरिहार्य नाही.

संदर्भ : 1. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol.II, Delhi, 1966.

     2. Rable, Lili, Khasi: A Language of Assam, Louisiana, 1961.

कालेलकर, ना. गो.