संथाळी भाषा : भारताच्या पूर्वेकडील प्रदेशांमध्ये वसलेल्या संथाळ ( संथाल किंवा सोंथाल ) या आदिवासी लोकांच्या बोलींचा समूह. या बोली बोलणाऱ्यांची संख्या सु. सहा दशलक्ष आहे (२००१). इंडो-यूरोपीय व द्रविड या भाषाकुलांपेक्षा भिन्न अशा ⇨ ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहात मुंडा हे उपभाषाकुल आढळते यातील उत्तर मुंडा वा खेर-वारी या उपशाखेमध्ये संथाळी हा मुख्य बोली-समूह आहे. होर, हार, सतार, संदाल, संगताल, संथाली, सेंथाली, संथैली, सोंथाल, सौंथाल या नावांनीही या बोली ओळखल्या जातात. भारताबरोबरच बांगला देश, भूतान व नेपाळ येथेही संथाळांच्या वस्त्या आहेत व तेथेही या बोली वापरल्या जातात.

भारतामध्ये आसाम, बिहार, ओरिसा, त्रिपुरा, प. बंगाल आणि मिझोराम या राज्यांमध्ये संथाळांच्या वस्त्या आहेत. विशेषत: आसनसोल येथील कोळशाच्या खाणी आणि जमशेदपूर येथील पोलाद कारखाने, या ठिकाणी संथाळांच्या मोठया वस्त्या आहेत तेथे ह्या बोली विशेषत्वाने बोलल्या जातात. अन्न, घरबांधणी, वस्त्रे, आभूषणे आणि धार्मिक विधी यांच्याबाबतीत संथाळ लोकांमधील विधिनिषेध अत्यंत कडक आहेत कदाचित या कर्मठपणामुळेच भाषिक पातळीवरसुद्धा संथाळी बोली एकमेकींच्या खूप जवळ असलेल्या आढळतात. त्याचप्रमाणे त्यांच्यात फार ऐतिहासिक परिवर्तने झालेली आढळत नाहीत.

सर जॉर्ज एबाहॅम गीअर्सन याने लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या (१९ खंड १८९४–१९२७) चौथ्या खंडात संथाळी बोलींविषयी तप-शीलवार माहिती दिलेली आहे. त्याच्या मते मुंडा भाषाकुलातील ५७% बोली संथाळीच्या उपबोली मानल्या जातात. बिहारी या इंडो-आर्यन ( म्हणजे संस्कृतोद्‌भव) भाषेचा प्रभाव संथाळी बोलींवर प्रामुख्याने झालेला आहे त्याचप्रमाणे पूर्वेकडील प्रांतांमध्ये बंगालीचा प्रभाव, तर दक्षिण प्रदेशांमध्ये ओडिया भाषेचा थोडा प्रभाव जाणवतो. हा प्रभाव मुख्यत: शब्दांच्या पातळीवरचा आहे. वाक्यरचनेच्या पातळीवरील प्रभाव नगण्य आहे. संथाळी बोलींमध्ये उच्चरांच्या पातळीवर स्वरांचे वैपुल्य आढळते मात्र स्वरांचे ऱ्हस्व-दीर्घत्व स्वनिमिक असलेले आढळत नाही. व्यंजनांची संख्या सु. वीस आहे. प्रत्ययांच्या दृष्टीने विचार करता पूर्व-प्रत्यय, मध्य-प्रत्यय आणि उत्तर-प्रत्यय या तिहींचा आढळ संथाळी बोलींमध्ये होतो. गीअर्सनच्या मते संथाळी बोलींमध्ये शब्दजातींच्या पातळीवर नाम आणि क्रियापद असा भेद करता येत नाही. कोणताही शब्द क्रियापद म्हणून वापरला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे कोणतेही धातुरूप नाम, विशेषण किंवा क्रियापदरूप म्हणून वापरले जाऊ शकते. त्यामुळे वेगळी अशी विभक्तिव्यवस्था दाखविता येत नाही. काळांची व्यवस्था गुंता-गुंतीची असून काळांची रूपे वेगवेगळ्या प्रत्ययांनी नियमितपणे घडविली जातात. वचनांची एकवचन, व्दिवचन आणि बहुवचन अशी तिहेरी व्यवस्था नामांसाठी व सर्वनामांसाठी आढळते. सर्वनामांमध्ये प्रथमपुरूषामध्ये उद्देशित व्यक्तीचा अंतर्भाव करणारे रूप आणि न करणारे रूप, अशी दोन रूपे व्दिवचन आणि बहुवचनामध्ये ( मराठीमधील ‘आम्ही ’ आणि ‘आपण ’ या रूपांप्रमाणे ) आढळतात. वाक्यरचनेमध्ये कर्ता-क्रियापद-कर्म असा कम होकारार्थी वाक्यात आढळतो. संथाळी बोलींना स्वत:ची अशी स्वतंत्र लिपी नाही. एकोणिसाव्या शतकामध्ये यूरोपियन मिशनऱ्यांनी संथाळी बोलीं- मधील वाङ्मय रोमनमध्ये लिपिबद्ध करायला प्रारंभ केला. बायबल ची भाषांतरे रोमन लिपीमध्ये लिहिलेल्या संथाळी बोलींमध्ये प्रसिद्घ केली, त्याचप्रमाणे संथाळी बोलींची व्याकरणे आणि शब्दकोशही तयार केले. क्रिस्ती मिशनऱ्यांनी संथाळांमध्ये धर्मप्रसाराच्या उद्देशाने विधायक कार्य केले. त्यांनी संथाळी बोलीभाषेकरिता स्वतंत्र लिपी तयार केली. तसेच त्यांच्यासाठी शाळा सुरू केल्या. संथाळी भाषेचे पहिले व्याकरण इ. स. १८५२ मध्ये प्रकाशित झाले. एका मिशनने संथाळी भाषेत पेरा हर नामक नियतकालिक काढले. ते अद्यापही चालू आहे. बहुतेक सर्व संथाळ घरी संथाळी भाषा बोलतात, पण बाहेर व्यवहारात प्रदेशपरत्वे हिंदी, बंगाली वा ओडिया या भाषांत संवाद साधतात. ओडिया, बंगाली, देवनागरी व ओल्चिकी या लिप्यांचा ते लेखनासाठी उपयोग करतात. भारतीय संविधानाच्या ब्याण्णवाव्या घटना दुरूस्तीनुसार चार भाषांचा राष्ट्रीय भाषांमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यात बोडो, मैथिली, डोंग्री यांबरोबरच संथाळी भाषेचा समावेश करण्यात आला आहे (२००३– परिशिष्ट ८).

संदर्भ : 1. Mitra, Parimal Chandra, Santhali: The Base of World Languages, Calcutta, 1988.

2. Skrefsrud, L. O. A Grammar of the Santhal Language, Benares, 1873.

मालशे, मिलिंद