असमिया भाषा : भारतीय संविधानात नमूद केलेल्या आधुनिक भारतीय भाषांपैकी एक भाषा. आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात असमिया भाषा बोलली जाते. इंडो-आर्यन भाषासमुहातील ही भाषा आहे. मागधी अपभ्रंशापासून बंगाली, उडिया व मैथिली यांबरोबरच असमिया भाषाही उत्क्रांत झाली. तिच्या परिसरातील डोंगराळ प्रदेशात तिबेटो-ब्रह्मी व ऑस्ट्रो-आशियाई कुळातील भाषा प्रचलित आहेत. ‘आसामी’ ही संज्ञा इंग्रजीतील होय. या भाषेचे खरे नाव ‘असमिया’ आहे. १९६१च्या खानेसुमारीप्रमाणे असमिया भाषिकांची संख्या ६८,०३,४६५ आहे. ही संख्या आसाम राज्याच्या एकदंर लोकसंख्येच्या ५७ टक्के भरते. खुद्द आसामात ६७,९४,२७१ असमिया भाषिक असून, बाकीचे भारतातील अन्य राज्यांत आहेत. त्यांपैकी सर्वांत अधिक असमिया भाषिक (८,२७९) पश्चिम बंगालमध्ये आहेत.

पोटभाषा : या भाषेच्या पूर्व असमिया व पश्चिम असमिया अशा दोन पोटभाषा आहेत : पूर्व असमिया पोटभाषा सदिया ते गौहाती यांमधील सु. ६५० किमी. लांब व सु. १६० किमी. रुंद प्रदेशात आढळते. प्रमाण असमिया याच पोटभाषेवर आधारलेली आहे. कामरूप व गोआलपाडा भागात पश्चिमी असमिया ही पोटभाषा प्रचलित आहे. तिच्यात भिन्न बोलीभाषा अंतर्भूत होतात. गोआलपाडा जिल्ह्यातील भाषेवर कुचबिहार व त्याच्या आसपासच्या राजवंशीय बोलींचा प्रभाव दिसतो. तरीही पश्चिमी असमियात पुष्कळ सारखेपणा व एकवाक्यता आढळते.

ऐतिहासिक विकास : पूर्वेकडील मागधी अपभ्रंशाचे राढ, वरेंद्र, कामरूप व वंग असे चार गट असून, त्यांपैकी कामरूप गटात असमिया व उत्तर बंगाली बोलींचा समावेश होतो. असमियाच्या ऐतिहासिक विकासाच्या तीन अवस्था आहेत : प्राचीन अवस्था, मधली अवस्था व आधुनिक अवस्था. नवव्या ते बाराव्या शतकांच्या कालावधीतील सहजयान बौद्धांची ‘चर्यापद’ नावाची गूढ पद्ये उपलब्ध आहेत. असमिया, बंगाली व ओडिया (उडिया) यांसारख्या पूर्वभारतीय भाषांची अतिप्राचीन व संकीर्ण अवस्था त्या पद्यांतील भाषेत आढळते. त्या भाषेसंबंधी मतभिन्नता असली, तरी उपर्युक्त भाषा स्वतंत्र होण्यापूर्वी विद्यमान असलेल्या भाषेची वैशिष्ट्ये चर्यापदांत होती असे समजण्यात येते.

चर्यापदांतील काही ध्वनिविशेष व शब्दविषयक वैशिष्ट्ये जुन्यानव्या असमियात आढळतात : शब्दात मागून येणाऱ्या अवयवातील ‘आ’ पूर्वी, आधीच्या अवयवातील आ ऱ्हस्व होणे (उदा., चर्यापदे : परवा बंगाली : पारवा असमिया : परवा) लै, र आणि त हे अनुक्रमे चतुर्थी, षष्ठी व सप्तमी यांचे प्रत्यय अंत हे वर्तमानकालवाचक धातुसाधित आणि इ व इले ही उभयान्वयी अव्यये अशी ती वैशिष्ट्ये होत.

चौदाव्या शतकापासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत प्राचीन असमियाचा कालखंड आहे. या कालखंडात वैष्णवपूर्व साहित्य व वैष्णव साहित्य असे दोन कालविभाग पाडता येतात. वैष्णवपूर्व कालविभागात माधव कंदली, हरिहर विप्र, हेमसरस्वती व इतर लेखकांच्या लेखनाचा समावेश होतो. चर्यापदांतील भाषेहून भिन्न व स्वतंत्र असे असमिया भाषेचे स्वरूप त्या लेखनात आढळते. ध्वनी, शब्दरूपे व वाक्यविचार यांसंबंधीची असमियाची पृथगात्म वैशिष्ट्ये त्या लेखनात दिसतात. नातेवाचक नामांचे पुरुषवाचक प्रत्यय प्रचलित झाले ते अजूनही रूढ आहेत. इब व इल या धातुसाधितांनंतर येणाऱ्या पुरुषवाचक प्रत्ययांचे प्रमाण या आरंभीच्या लेखनात बरेच आढळते. इब लागून तयार होणारे भूतकालवाचक धातुसाधितही त्यात सापडते.

वैष्णव साहित्यात काव्य, नाटक, संतचरित्रे व वैष्णव ग्रंथांची गद्यमय भाषांतरे यांचा समावेश होतो. या कालविभागात पूर्वकालीन एरे व एरा (उदा., हानिएरे= खुपसतो) या चमत्कारिक कालदर्शक संयोजकांचा उपयोग बंद झाला. धातुसाधितांना लागणारे पुरुषवाचक प्रत्यय पूर्णपणे प्रस्थापित झाले. बो (उदा., करिबो, खाबो) या भविष्यकालाच्या रूढ प्रत्ययाबरोबरच, म् (उदा., करिम्, खाम्) हा नवीन पुरुषवाचक प्रत्यय गद्य भाषांतरात योजिलेला दिसतो. वैष्णव लेखनात सर्वनामांच्या जोड्या आढळतात. त्यांपैकी एक बोलण्यात व दुसरी बहुधा लेखनात येत असावी (उदा., तोमार, तोम्हार किंवा तोमासार).

असमिया भाषेच्या मधल्या अवस्थेचा कालखंड सतराव्या शतकाच्या मध्यापासून एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मानला जातो. या कालखंडात ऐतिहासिक गद्यलेखन विपुल प्रमाणात झाले. त्यातील भाषा पूर्व आसामच्या बोलींवर आधारलेली असल्याने ती आधुनिक वाटते. तिच्यात बोर, बिलाक् व हंत् हे अनेकवचनी प्रत्यय मोठ्या प्रमाणात आढळतात. आधुनिक असमियाचे वैशिष्ट्य दाखविणारे गै, क चोन व देखोन इ. पुनरुक्तिवाचक प्रत्ययही तत्कालीन लेखनात दिसून येतात. तसेच हंक्‌सारख्या अनेकवचनी प्रत्ययांचे स्थलांतरही त्यात आढळते (उदा., खाओ हंक्‌ = आपण खाऊ या).

असमिया वर्णमाला

असमियाची तिसरी व आधुनिक अवस्था एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी सुरू होते. या सुमारास ब्रिटिश लोक आसामात आले. बायबल व इतर ख्रिस्ती धर्मसाहित्याचे असमिया गद्यात भाषांतर होऊ लागले. पूर्व आसामातील शिवसागर येथे ख्रिस्ती धर्मप्रचाराचे केंद्र असल्याने, ख्रिस्ती लेखनात शिवसागरच्याच बोलीभाषेचा वापर करण्यात आला. १८४६ मध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी (अमेरिकन बॅप्टिस्ट मिशनने) अरुणोदय नावाचे मासिक सुरू केले. १८४८ मध्ये एन्. ब्राउन याने पहिले असमिया भाषेचे व्याकरण लिहिले. १८६७ मध्ये एम्. ब्रोन्सोनने पहिला असमिया शब्दकोश तयार केला. अशा रीतीने ख्रिस्ती लोकांनी पूर्व आसामच्या बोलीवर आधारलेल्या असमिया साहित्यिक भाषेचा पाया घातला.

असमिया भाषा व बंगाली भाषा यांतील साम्यभेद : असमिया व बंगाली या भाषा मागधी अपभ्रंशाच्या कामरूप गटातील असल्याने त्यांची तुलना उद्बोधक ठरते. या दोन भाषांतील साम्य पुढीलप्रमाणे आहे : (१) दोन्ही भाषांत भूतकालदर्शक इल् व भविष्यकालदर्शक इब् आहेत. (२) दोहोंतील व्यक्तिवाचक सर्वनामे जवळजवळ सारखीच आहेत. (३) शब्दभांडार व ध्वनिविकास यांबाबतीतही दोहोंत अनेक साम्यस्थळे आढळतात. या दोन भाषांतील फरक पुढीलप्रमाणे आहे : (१) असमियातील स्वराघात उपांत्य अवयवावर असतो, बंगालीत तो आद्य अवयवावर असतो. (२) षष्ठी व सप्तमी यांचे विभक्तिप्रत्यय असमियात अनुक्रमे र आणि त आणि बंगालीत अनुक्रमे एर व ते असे आहेत.              (३) असमियात वर्तमानकालवाचक धातुसाधित ओंत् असे आहे बंगालीत इत् असे आहे. (४) भूतकाळाच्या रूपाला हेतेन् हा अनुसर्ग जोडून असमियात संकेतभूत तयार होतो. बंगालीत तो इत्-प्रत्ययान्त वर्तमानकालवाचक धातुसाधिताला पुरुषवाचक प्रत्यय लावून होतो. (५) हेतुवाचक रूपाचे प्रत्यय असमियात इब् व इबलै व बंगालीत इत् व इते असे आहेत. (६) असमियात धातुपूर्वी नकारवाचक जोडले जाते आणि होकारवाचकाच्या जोडीची नकारवाचक क्रियापदमालिका आढळते. बंगालीत क्रियापदाला न किंवा ना प्रत्यय लागून नकारवाचक क्रियापद बनते. (७) या दोन भाषांतील अनेकवचनाचे प्रत्यय भिन्न आहेत. एतिया, तेतिया व अत इ. स्थलवाचक सर्वनामांच्या साधित रूपांसारखी रूपेही बंगालीत नाहीत. (८) शब्दात पुढे येणाऱ्या ‘आ’च्या प्रभावाने पूर्वगामी ‘आ’चे ऱ्हसवीकरण घडवून आणणारा असमियातील स्वरसंवाद बंगालीत नाही. या महत्त्वाच्या भेदांप्रमाणे इतरही अनेक भेद या दोन भाषांत आहेत.

लिपी : ब्राह्मी लिपीमधूनच असमिया लिपीचा उदय झाला. चौथ्या शतकातील तिचे रूप ‘गुप्त लिपी’ म्हणून ओळखले जाई. या गुप्त लिपीच्याच पूर्वप्रदेशातील ‘कुटिल’ नावाच्या रूपभेदापासून असमिया व बंगाली लिपी निर्माण झाल्या. गौहातीजवळील १२०६च्या एका शिलालेखात आधुनिक असमिया लिपीचा नमुना सापडतो. असमियात र हे अक्षर ‘ब’च्या चिन्हात तिरपी रेघ काढून लिहिले जाते. बंगालीत ‘व’ला चिन्ह नाही असमियात ते अगदी पहिल्यापासून आहे

उच्चारविशेष : संस्कृत भाषेतील सर्व स्वरव्यंजने असमियात असली, तरी त्यांपैकी काही ठराविक वर्णच पूर्णपणे उच्चारले जातात. इ, ई, उ, ऊ असा ऱ्हस्वदीर्घभेद असमियात नाही. त्यांचा उच्चार कसाही केला, तरी त्याचा परिणाम अर्थावर होत नाही. तत्सम व तद्भव शब्दांच्या लेखनात मात्र ऱ्हस्वदीर्घभेद पाळला जातो. शब्दाची लांबी व त्यातील स्वराचे स्थान यांवर उच्चारातील ऱ्हस्वदीर्घत्व अवलंबून असते. असमियात ऱ्हस्व व दीर्घ ऋ पूर्णपणे नष्ट झाले आहेत. ऋणचे रूप रिण असे होते. असमियात मूर्धन्य उच्चार नाहीत. दंत्य उच्चारही शुद्ध नाहीत. या दोहोंची लेखनचिन्हे वापरात असली, तरी त्यांचे उच्चार मात्र दंतमूलीय असतात. तसेच च आणि छ यांतील उच्चारभेद नाहीसा झाला असून दोहोंचाही उच्चार आता स असा होतो (उदा., काछ = कास, चीन = सीन). संस्कृतातील तीनही ऊष्ण वर्ण लेखनात येतात, पण बोलण्यात मात्र फक्त एकच आहे. त्या सर्वांचे अघोष कंठ्य घर्षकात रूपांतर झाले आहे. संस्कृतातील सार व शर यांची असमिया रूपांतरे अनुक्रमे हार व हर अशी होतात. तत्सम शब्दांतील संयुक्त व्यंजनात मात्र स आढळतो (उदा., संस्कृत प्रश्न = असमिया प्रस्न).

रूपविचार : आधुनिक भारतीय भाषांप्रमाणे असमियातही नामाचे द्विवचन नष्ट झाले आहे. असमियात कोणत्याही क्रियापदाला न हा पूर्वसर्ग जोडून, त्याचे नकारार्थी रूप बनते उदा., नकरिबि (करू नको). लिंग व वचन यांचा क्रियापदाच्या रूपावर परिणाम होत नाही. स्त्रीलिंगी व वचनदर्शक प्रत्यय फक्त नामांपुरतेच मर्यादित आहेत. बोर्, बिलाक व हंत् यांसारखे अनेकवचनी प्रत्यय या भाषेत आढळतात. जुन्या असमियात अनेकवचन दाखविण्यासाठी गण व समूह यांसारखे शब्द नामानंतर वापरले जात. विभक्तिसंबंध दोन प्रकारे दाखविला जातो : स्वतंत्र अनुसर्ग वापरून आणि तृतीया व सप्तमी यांच्या जुन्या प्रत्ययांशी एकजीव झालेली नामरूपे वापरून. ‘मानू’ (माणूस) या नामाची एकवचनी किंवा अनेकवचनी विभक्तिरूपे पुढीलप्रमाणे होतात : प्रथमा : मानुइ (एकवचन), मानुहे (अनेकवचन) द्वितीया : मानुक तृतीया : मानुहेरे, मानुहेदि चतुर्थी : मानुइक, मानुहलै पंचमी : मानुइर्परा षष्ठी : मानुहर सप्तमी : मानुहत.

असमियातील क्रियापद पुढील काळ व आज्ञार्थ दर्शविते : अतीत भूतकाळ, सामान्य भूतकाळ, सामान्य वर्तमानकाळ, चालू वर्तमानकाळ व भविष्यकाळ. या सहा प्रकारांची तीन पुरुषांनुसार एकूण अठरा रूपे होतात. त्यांतील एकवचनी व अनेकवचनी रूपांत भेद नाहीत. वर्तमानकाळ, भूतकाळ व भविष्यकाळ यांची रूपे पुढीलप्रमाणे होतात :

एकवचन अनेकवचन
वर्तमानकाळ :
मइ करों (मी करतो) आमि करों
तुमि करा (तू करतोस) तोमालोके करा
सि करे (तो करतो) सिंहते करें
भूतकाळ :
मइ करिलो आमि करिलो
तुमि करिला तो मा लोके करिला
सि करिले सिंहते करे
भविष्यकाळ :
मइ करिम आमि करिम
तुमि करिबा तोमालोके करिबा
सि करिब सिंहते करिब

पदान्वय : असमिया भाषा पृथक्करणाकडे झुकलेली आहे. त्यामुळे वाक्यातील पदान्वय कमी-अधिक प्रमाणात निश्चित आहे. विद्यमान साहित्यिक असमिया भाषा इंग्रजी भाषेने प्रभावित झालेली आहे. इंग्रजी विरामचिन्हांच्या स्वीकारामुळे तिच्यात इंग्रजी वळणाची वाक्यरचना दिसू लागली आहे.

शब्दभांडार : असमिया शब्दसंपत्तीचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल : (१) तत्सम किंवा अर्धतत्सम शब्द, (२) तद्भव शब्द, (३) मूळचे प्रादेशिक शब्द. एकंदर चाळीस हजार असमिया शब्दांपैकी, काही बोडो, खासी, संथाळी व मलयन या डोंगरी भाषांतील आहेत. आसाममध्ये सहा शतके राज्य करणाऱ्या शान जमातीच्या आहोम भाषेतील अनेक शब्दही असमिवात आढळतात. अन्य भारतीय भाषा, अरबी, फार्सी, इंग्रजी व पोर्तुगीज यांसारख्या भाषांतील दहा टक्के शब्द तिच्यात आहेत. सर्वांत अधिक म्हणजे सत्तर टक्के शब्द तद्भव स्वरूपाचे आहेत.

असमिया लिपीचा नमुना :

नागरी लिप्यंतर : कोनो एजन मानुहर दुटा पुतेक आछिल।. तारे सरुटोवे बापिकक क’ले–“बोपाइ, आपोनार संपत्तिर जि भाग माइ पाओ, ताक मोक दियक।” ताते तेओ र संपत्ति दुयो पुतेकर मितरत बाटि दिले।

मराठी अनुवाद : एका वृद्ध माणसास दोन पुत्र होते. दोघांतला लहान एके दिवशी आपल्या बापास म्हणाला–“बाबा, माझ्या वाट्याची संपत्ती मला द्या.” तेव्हा त्याने आपली संपत्ती मुलांना वाटून दिली.

संदर्भ : 1. Bharali, D. An Introduction to Assamese Phonology, 1959.

2. Kakati, Banikanta, Assamese, Its Formation and Development, Gauhati, 1941.

3. Sarma, Mukund-Madhav, Assamese for All, Jorhat, 1964.

4. Sarma, Nirmaleswar, Assamese Self-Taught, Gauhati, 1949.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इ.) कालेलकर, ना. गो. (म.)