फूकन, नीलमणि : (३० जून १८८० – ) आधुनिक असमियातील एक श्रेष्ठ कवी, लेखक व देशभक्त. जन्म दिब्रुगड येथे. त्यांचे आजोबा घनश्याम फूकन यांनी संपूर्ण कल्किपुराणाचे असमियात वृत्तबद्ध भाषांतर केले होते. नीलमणींचे शालेय शिक्षण दिब्रुगड येथे व महाविद्यालयीन शिक्षण कॉटन महाविद्यालय गौहाती तसेच कुचबिहार (प. बंगाल) येथील महाविद्यालयात झाले. १९०८ मध्ये ते बी.ए. झाले. नंतर त्यांनी दिब्रुगड येथे एक माध्यमिक विद्यालय स्थापन केले. या विद्यालयाचे ते सु. २० वर्षे मुख्याध्यापक होते. १९२१ ते २६ या काळात ते आसामच्या विधिमंडळाचेही सदस्य होते. १९३७ ते ५७ ह्या काळात ते आसामच्या विधानसभेवरही निवडून गेले. १९४२ च्या आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला व कारावासही भोगला. सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यावर समाजकल्याणाचे कार्य करणाऱ्या अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. अलीकडेच त्यांनी सिबसागर जिल्ह्यातील नागबत गावी आदिवासी व नागर लोकांत बंधुभाव, सामंजस्य व शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने एक आश्रम केला आहे. बर्लिन येथे भरलेल्या जागतिक शांतता परिषदेसाठी ते प्रतिनिधी म्हणून गेले होते. बातरी ह्या दैनिकाचे तसेच इतर काही नियतकालिकांचेही ते वेळोवेळी संपादक होते.

नीलमणी

नीलमणी फूकन यांचे सु. १२ काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांची कविता प्रामुख्याने सुनीत व भावगीतांच्या स्वरूपाची आहे. तिच्यातून त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा आध्यात्मिक व गूढवादी दृष्टिकोन तसेच त्यांची सौंदयदृष्टी, सत्याचा शोध घेण्याची वृत्ती व आशावाद व्यक्त झालेला दिसतो. मानसी (१९४२), ज्योतिकणा ( म. शी. प्रकाशझोत-१९४९), गुटिमालि (मोगरा-१९५०), जिंजिरि (बेड्या-१९५१), अमित्रा (१९५२) आणि संधानी (साधक-१९५२) हे त्यांचे उल्लेखनीय काव्यसंग्रह होत. त्यांच्या मानसीमध्ये सौंदर्याभिलाषा आणि संधानीमध्ये सत्याचा शोध घेण्याची त्यांची वृत्ती प्रकर्षाने जाणवते. गुटिमालीमध्ये गरिबांच्या जीवनाचे आणि निसर्गाचे हृद्य चित्रण आढळते. जिंजिरीमध्ये त्यांचे कारावासातील अनुभव, प्रखर आशावाद व राष्ट्रप्रेम व्यक्त झाले आहे. त्यांच्या कवितेतील विचार व चिंतन हे त्यांच्या कवितेचे सामर्थ्य व मर्यादाही ठरतात. अतिरेकी वैचारिकतेच्या पगड्यामुळे पुष्कळदा त्यांच्या काव्यातील उत्स्फूर्त भावनाविष्कार अवरूद्ध होतो.

अतिशय प्रभावी गद्यलेखक म्हणून ते असमियात ओळखले जातात. साहित्यकला (१९३९), जया-तीर्थ (१९४१), चिंतामणि (१९४२), महापुरुषीया धर्म (१९५२) हे त्यांचे गद्यग्रंथ होत. त्यांचे गद्य ओजस्वी व आलंकारिक आहे पण संयमाच्या अभावामुळे हे विकारवशतेकडे झुकलेले दिसते.

ते उत्कृष्ट वक्तेही होते. म. गांधींच्या प्रभावामुळे त्यांनी पूर्ण स्वराज्याचा आणि अहिंसेचा पुरस्कार केला. अस्पृश्यतानिवारणासाठी व मागास वर्गांच्या उद्धारासाठी त्यांनी कार्य केले. कवी, प्रभावी गद्यलेखक, समाजसुधारक, देशभक्त इ. नात्यांनी त्यांना आसाममध्ये आदराचे स्थान आहे.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) कर्णे, निशा (म.)