चौधरी, रघुनाथ : (२० जानेवारी १८७९—१८  नोव्हेंबर १९६७). असमियातील प्रसिद्ध निसर्गकवी. जन्म कामरूप जिल्ह्यातील लाओपारा गावी एका सुसंस्कृत कुटुंबात. लहानपणीच खेळताना पडून ते पंगू बनले व आईवडिलांच्या मृत्यूमूळे पोरके झाले. जीवनात दुःख व वैफल्य वाट्याला आल्यामुळे ते मनःशांतीसाठी निसर्गाकडे वळले असावेत. निसर्गातील पक्ष्यांचे रघुनाथ चौधरींना (चौधुरींना) विशेष वेड असल्याने ‘विहंगकवी’ म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या दोन काव्यग्रंथांची नावेही पक्ष्यांचीच आहेत. १९२१ मध्ये ते असहकारितेच्या चळवळीत पडल्याने त्यांना कारावास भोगावा लागला. शिक्षकाच्या छळामुळे त्यांना माध्यमिक शिक्षण अर्धवटच सोडावे लागले तथापि त्यांनी स्वतंत्रपणे असमिया, बंगाली व संस्कृत साहित्याचा सखोल अभ्यास केला.

रघुनाथ चौधरी

सादरी  (१९१०), केतेकी (कोकीळ – १९१८), कारबाला (‘करबला’ हे मोहरमवरील खंडकाव्य – १९२३) व दहिकतरा (दयाळ पक्षी – १९३१) हे त्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह होत. सादरीत अठ्ठावीस भावकविता असून त्या पक्ष्यांवरच आहेत. केतेकी  ह्या खंडकाव्यात १९० कडवी असून ती पाच तरंगात (विभागांत) विभागली आहेत. त्यांना कोकिळ पक्षी प्रेमाचा व सहानुभूतीचा संदेश देतो. कोकिळकूजनाचे कविमनावर उमटलेले प्रतिसाद त्यात कलात्मकतेने चित्रित केले आहेत. दहिकतरा  ह्या काव्यसंग्रहातील भाषा अधिक संस्कृतप्रचुर आहे. या दोन्हीही काव्यग्रंथांतील प्रतिमासृष्टी चित्तवेधक आहे.

त्यांच्या काव्यात संपन्न निसर्ग आणि त्यात ओसंडून वाहणारे सौंदर्य व आनंद यांचा प्रत्यय येतो. निसर्गात ओतप्रोत भरून राहिलेल्या चैतन्याचा आणि त्याच्या स्पर्शाने प्रत्येक वस्तूस लाभलेल्या सौंदर्यपूर्ण, आनंदमय व परिपूर्ण अशा अस्तित्वाचा त्यांना साक्षात्कार घडतो. झुळझुळ वाहणाऱ्या ओढ्यांच्या प्रवाहातील आणि पक्ष्यांच्या मधुर किलबिलीतील आनंदाची चाहूल त्यांना लागते तथापि ह्या आनंदमयतेसोबतच त्यांना स्वतःच्या अभागीपणाची आणि एकाकीपणाची जाणीवही होते. आपल्या पायांत पडलेल्या जगरहाटीच्या शृंखलांमुळे निसर्गाच्या आनंदमय नर्तनात आपण सहभागी होऊ शकत नाही, अशी खंतही त्यांना वाटते. त्यांच्या काव्यावर इंग्रजी काव्याचा प्रभाव नाही तथापि संस्कृत काव्याचा – विशेषतः कालिदासाचा – मात्र सखोल प्रभाव दिसून येतो.

जोनाकि (१९०४—०६), जयंती  (१९४०—४५) आणि सुरभी  (१९४५—४९) ह्या असमियातील साहित्यिक नियतकालिकांचे ते काही काळ संपादक होते. नवमल्लिका  (१९५८) हा प्रसन्न शैलीत लिहिलेल्या त्यांच्या ललित निबंधाचा संग्रह होय.

जागतिक शांतता मंडळाने प्रवर्तित केलेल्या शांतता चळवळीचा आसाममध्ये प्रसार करण्यासाठी व संघटना उभारण्यासाठी १९४५ मध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला. १९५२ मध्ये कलकत्त्यास भरलेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक परिषदेचे ते अध्यक्ष होते. १९५२ मध्येच भारत सरकारने त्यांना साहित्यिक–निवृत्तीवेतन देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला.

आयुष्याच्या अखेरीअखेरीस त्यांची दृष्टीही गेली व ते बरेच दिवस अंथरुणाला खिळून होते. त्यातच त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • शर्मा, परेशचंद्र भराली, लोकनाथ, संपा. कविश्री माला रघुनाथ चौधुरी, वर्धा, १९६२.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.); सुर्वे, भा. ग. (म.)