कविराज चक्रवर्ती : (अठरावे शतक). एक प्रसिद्ध असमिया कवी. मूळ नाव रामनारायण चक्रवर्ती. आहोम वंशीय राजे रुद्रसिंह (कार. १६९६-१७१४) आणि शिवसिंह (कार. १७१४-१७४०) यांच्या दरबारात तो राजकवी होता. त्याला ‘कविराज’ हा किताब होता. त्याने आपल्या आश्रयदात्यांवर प्रशंसापर काव्यही लिहिले आहे.

शकुंतलाकाव्य, गीतगोविंद, माधव-सुलोचना-काव्य, शंखासुरवध हे त्याचे प्रसिद्ध काव्यग्रंथ होत. त्याने ब्रह्मवैवर्त पुराणाचे असमियात भाषांतर केले, तसेच भास्वती हा ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथही लिहिला.

कविराज चक्रवर्ती शृंगारिक प्रकारची रचना करणारा कवी म्हणून ओळखला जातो. उत्तार शृंगार वर्णन करण्याकडे त्याचा विशेष कल दिसतो. प्रणयाच्या सर्व छटांचे त्यांतील बारकाव्यांसह वर्णन त्याने आपल्या काव्यांत केले आहे. विविध ऋतूंचा मानवी मनावर, विशेषत: प्रेमिकांवर होणारा परिणाम आणि त्यांच्या तदनुरूप भावभावना यांचे बहारदार चित्रण त्याने आपल्या काव्यात केले आहे.

  

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) शिरोडकर, द.स. (म.)