बर्दोलोई, रजनीकांत :(२४ नोव्हेंबर १८६७-? १९३९). प्रसिद्ध असमिया कादंबरीकार. १९४० पर्यंत असमियातील सर्वश्रेष्ठ कादंबरीकार म्हणून गणना होत होती. प्रख्यात बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र चतर्जीबरोबरही त्यांची नेहमी तुलना केली जाई. गौहातीत एखा सुसंस्कृत कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कलकत्ता विद्यापीठातून १८८९ मध्ये बी. ए. झाल्यावर ते सरकारी नोकरीत शिरले. जनगणना खात्यात प्रथम ते लिपिक म्हणून लागले आणि नंतर उपजिल्हाधिकारी व शेवटी अतिरिक्त सहायक आयुक्तपदापर्यंत ते चढत जाऊन १९१८ मध्ये निवृत्त झाले. वैयक्ति क जीवनात ते दुःखी होते. वडील, दोन धाकटे बंधू, ऐन उमेदीतील मुलगा यांच्या निधनांचे आघात त्यांच्यावर लागोपाठ झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी चहाच्या मळ्यात जवळचे सर्व भांडवल गुंतवले पण त्यातही त्यांना तोटा आला व विपत्तीत अखेरचे जीवन व्यतीत कराव लागले. गौहाती येथे त्यांचे अर्धांगवायूच्या विकाराने निधन झाले.

नोकरीच्या निमित्ताने त्यांना आसामी लोकजीवनाचा जवळून परिचय झाला आणि अभ्यासही करता आला. कादंबरीलेखनासाठी ह्या अनुभवसामग्रीचा त्यांना खूपट उपयोग झाला. ⇨पद्मनाथ गोहाइन-बरूआ (१८७१-१९४६) आणि रजनीकांत यांच्यापासून आधुनिक असमिया कादंबरीची सुरूवात मानली जाते. रजनीकांतांनी आसामचा इतिहास आपल्या कादंबऱ्यांतून चित्रित करून लोकप्रिय केला. सर वॉल्टर  स्कॉट आणि बंकिमचंद्र चतर्जी यांच्यापासून आपण कादंबरी लेखनाची प्रेरणा घेतल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या डंडुआ द्रोह ह्या कादंबरीत केला आहे. भिरि-जिथारी १८९४) ही त्यांची आसाम मधील मिरी ह्या आदिवासी जमातीच्या जीवनावरील कादंबरी. आदिवासी जीवनावरील असमियातील ती आद्य कादंबरी होय. तीत त्यांनी एका  मिरी युगुलाची दुःखद प्रेमकथा चित्रित केली आहे. त्यांच्या इतर सर्व कादंबऱ्या ऐतिहासिक स्वरूपाच्या आहेत.

आसामच्या भूतकाळाची पुनर्निर्मिती चित्रित करून त्याचं दर्शन घडविण्यात त्यांना विशेष रुची होती. आसामच्या राजकीय-सामाजिक इतिहासाच्या सर्व अंगोपांगांचे त्यांना चांगले ज्ञान होते. ऐतिहासिक कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी ‘भोलाई शर्मा’ ह्या टोपणनावाने जे दर्जेदार विनोदी लेखन केले आहे ते भोलाई शर्मा (मरणोत्तर प्रकाशित, १९५०) ह्या नावानेच संगृहीत असून लोकप्रिय आहे. भोलाई शर्मा ह्या व्यक्तिरेखेत त्यांचे स्वतःचेच प्रतिबिंब पडले आहे.

त्यांच्या साहित्यसेवेचे दोन कालखंड कल्पिता येतील : पहिला कालखंड १८९० ते १९०१ हा असून त्यात त्यांनी भिरि-जियारी व मनोमती (१९००) ह्या दोन श्रेष्ठ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या नंतरच्या कादंबऱ्यांतून आढळणाऱ्या दोषांपासून त्यांच्या ह्या कादंबऱ्या मुक्त आहेत. १९१८ ते ३० पर्यंतच्या दुसऱ्या कालखंडात त्यांनी ऐतिहासिक घटनांची पार्शवभूमी असलेल्या सहा कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची कथानके काल्पनिक असली, तरी वातावरण मात्र ऐतिहासिक आहे. मनोमती, रंगिली (१९२५), निर्मल भकत् (१९२५) व रहडइ लिगिरि (१९३०) ह्या त्यांच्या चार ऐतिहासिक कादंबऱ्या आसामवरील ब्रह्मी आक्रमणाच्या प्रसंगांवर आधारित आहेत. त्यांच्या चार कादंबऱ्यांची ही मालिका एका अर्थी एकाच बृहत्‌कादंबरीचे चार भाग म्हणता येतील. डंडुआ द्रोह (१९०९), राधा-रुक्मिणिर रण (१९२५) व ताम्रेश्वरी मंदिर (१९२६) ह्याही आसामच्या इतिहासावर आधारित असलेल्या इतर ऐतिहासिक कादंबऱ्या होत.

सर्वसामान्य माणसाविषयी अपार सहानुभूती, उत्कट संवेदनशीलता व सर्व आसाम प्रदेशाचा जवळून घेतलेला प्रदीर्घ अनुभव यांचे प्रतिबिंब त्यांच्या ह्या कादंबऱ्यांत पडलेले दिसते. त्यांच्या कादंबरीलेखनाची मुळे आसामच्या इतिहास-संस्कृतीत घट्ट रुजलेली आहेत. आपल्या कादंबऱ्यांतून केवळ इतिहास जिवंत करण्यातच ते रमले नाहीत, तर त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून दालिमी, मनोमती, पानेई, रंगिली, रहडई इ. चिरंतन व्यक्तिरेखाही निर्माण केल्या.

सर्वसामान्यपणे असमिया कादंबरीचे व विशेषतः असमियातील ऐतिहासिक कादंबरीचे ते जनक मानले जातात. जुन्या वळणाची कथनशैली, वाचकांना अनुलक्षून येणारे आणि कथाप्रवाहास अवरूद्ध करणारे विपुल उल्लेख, उपदेशपरता इ. दोष त्यांच्या कादंबऱ्यांत आढळतात.

भिरि-जियारीतील दालिमी ही व्यक्तिरेखा व मनोमतीतील मनोमती उभी करण्यात त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा जो प्रत्यय येतो, तसा तो त्यांच्या इतर कादंबऱ्यांतून येत नाही. या मर्यादा असूनही एक श्रेष्ठ असमिया कादंबरीकार म्हणून रजनीकांतांना असमियात महत्वपूर्ण स्थान आहे. त्यांच्या मनोमती ह्या नितान्तसुंदर कादंबरीचे नाट्य रूपांतर झाले असून, तीवर मनोमती ह्याच नावाने १९४१ मध्ये असमिया चित्रपटही निघाला आहे.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं), सुर्वे, भा. ग (म.)