सर्मा, दुर्गेश्वर : (१८ फेबुवारी १८८२-१९६१). लोकप्रिय असमिया भावकवी व नाटककार. जोरहाट येथे जन्म. कलकत्ता विदयापीठातून बी.ए., बी.एल्. ह्या पदव्या घेतल्या. प्रारंभी जोरहाट येथे त्यांनी वकिली व्यवसाय केला (१९०७-११). नंतर शासकीय अधिकारी म्हणून निरनिराळ्या पदांवर काम करून ते निवृत्त झाले (१९४०). शासकीय सेवेत असताना त्यांनी विपुल लेखन केले. जोनाकीरामधेनु ह्या त्या काळातील आघाडीच्या असमिया नियतकालिकांतून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत होते, त्यामुळे त्यांना लोकप्रियता व प्रतिष्ठा लाभली. अंजली (१९१०) व निवेदन (१९२०) हे त्यांचे दोन महत्त्वाचे काव्यसंग्रह होत. उपासनाहा त्यांचा तिसरा काव्यसंग्रह त्यांच्या समग साहित्याचा एक भाग म्हणून ‘ आसाम साहित्य सभे ’ने त्यांच्या पश्चात १९७८ मध्ये प्रकाशित केला. उपासनामध्ये एकूण २५ कविता असून, त्यांत निरनिराळ्या नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या कवितांबरोबरच काही अप्रकाशित, हस्तलिखितरूपातील कवितांचाही समावेश आहे. अंजलीया काव्यसंग्रहात एकूण ७८ कविता आहेत. त्यात शेक्सपियरियन धर्तीच्या १० सुनीतांचा अंतर्भाव आहे. कवीच्या ऐन तारूण्यातील कोवळ्या भावभावनांचा उत्स्फूर्त आवेग त्यांत आढळतो तर निवेदन ह्या काव्यसंग्रहात एकूण ८५ कविता असून, त्यांत कवीच्या प्रगल्भ, समृद्ध भावजीवनाचे दर्शन घडते. दुर्गेश्वर सर्मांचे सुनीतकार म्हणून असमिया साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या काव्यावर वर्डस्वर्थचा दाट प्रभाव आढळतो. वर्डस्वर्थच्या ‘ल्यूसी ’च्या कवितांचे त्यांनी असमिया भाषेत अनुवाद केले. दुर्गेश्वर यांच्या काव्यात प्रेम, निसर्ग हे विषय येतात, तसेच आध्यात्मिक, नैतिक जाणिवांचे प्रभावी चित्रण आढळते. मानवी जीवनात व निसर्गात जे दैवी चैतन्य प्रत्ययास येते, त्याचा साक्षात्कारी, गूढवादी तत्त्वचिंतनाच्या पातळीवरचा अनुभव त्यातून प्रकट होतो. त्यांच्या काव्यात वन्य तरूण-तरूणींच्या स्वच्छंदी जीवनाची व बाह्य निसर्गाची वर्णने, तसेच इंद्रियोद्दीपक भाव-भावनांचे चित्रणही येते. चित्रदर्शी आशय, नादमधुर शब्दसंहती, तसेच वर्ण व ध्वनी यांच्या स्वरमेळातून निर्माण होणारी सांगीतिक गुणवत्ता ही त्यांच्या काव्यरचनेची काही ठळक वैशिष्टये होत. दुर्गेश्वर हे असमियातील लोकप्रिय नाटककार आहेत. त्यांच्या एकूण चार नाटकांपैकी दोन पौराणिक, तर दोन शेक्सपिअरच्या नाटकांची रूपांतरे आहेत. पौराणिक नाटकांपैकी पार्थ पराजय (१९०९) हे महाभारता तील कथानकावर, तर बालिबध (१९१२) हे रामायणा तील कथानकावर आधारलेले आहे. चंद्रावली (१९१०) हे शेक्सपिअरच्या ॲज यू लाइक इट चे तर पद्मावती हे सिंबेलाइन चे असमिया रूपांतर आहे. ह्या नाटकांतील पात्रांना आसामी नावरूपे दिलेली आहेत. संवादांमध्ये पदयमय, निर्यमक रचनेचा सर्रास वापर केला आहे. नाटयगुण व काव्यगुण यांचा मनोज्ञ संगम या नाटकांत आढळतो. असमिया रंगभूमीवर पौराणिक नाटके लोकप्रिय करण्याचे श्रेय बव्हंशी दुर्गेश्वर सर्मांना दिले जाते.

संदर्भ : Bora, Mahendra, Ed. Durgeswar Sarma Rachanavali, Jorhat, 1978.

इनामदार, श्री. दे.