काकति, बाणीकांत: (१८९३-१५ नोव्हेंबर १९५२). प्रसिद्ध असमिया साहित्यसमीक्षक व विव्दान. जन्म बरपेटा (कामरुप जिल्हा) येथे एका गरीब कुटुंबात. १९१८ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून इंग्रजी घेऊन ते एम्‌.ए. व पुढे १९३५ मध्ये पीएच्‌.डी. झाले. कॉटन कॉलेजात ते इंग्रजीचे प्राध्यापक व पुढे १९४७ मध्ये प्राचार्य झाले. नंतर गौहाती विद्यापीठात ते असमिया विभागाचे प्रमुख होते.

इंग्रजी, संस्कृत व असमिया भाषा-साहित्यांत त्यांची चांगली गती होती. असमीज : इट्‌स फॉमेंशन अँड डेव्हलपमेंट (१९४१) हा त्यांचा संशोधनपर ग्रंथ विद्वन्मान्य आहे. साहित्याचे मूल्यमापन करणाऱ्या त्यांच्या विविध निबंधांतून तौलनिक समीक्षा दिसून येते. प्राचीन तसेच आधुनिक साहित्यावरील त्यांच्या समीक्षेत कुशाग्र बुध्दीचा, चौफेर व्यासंगाचा आणि समतोल विवेचनाचा प्रत्यय येतो. `भावनानंद पाठक’ ह्या टोपणनावानेही त्यांनी एका मासिकातून लेखमाला लिहिली होती. आधुनिक असमिया साहित्यसमीक्षकांत त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. रेहबारी, गौहाती येथे त्यांचे निधन झाले.

त्यांचे महत्वाचे असमिया व इंग्रजी ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : पुरणी असमिया साहित्य (१९४०), साहित्य आरु प्रेम (१९४८), पुरणी कामरुपर धर्मर धारा (१९५२), मदर गॉडेस कामाख्या, लाइफ ऍंड टिचिंग ऑफ शंकरदेव, स्टडीज फॉम असमीज हिस्टरी वैष्णषाइट मिथ्स ऍंड लीजंड्‌स.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) शिरोडकर, द. स. (म.)