भट्टदेव : (१५५८-१६३८). असमिया गद्याचे जनक व वैष्णव भक्त, जन्म कामरूप जिल्ह्यात एक ब्राहण कुटूंबात झाला. वडील चंद्रभारती हे प्रसिद्ध पंडित होते. भट्टदेवांचे मूळ नाव वैकुंठनाथ कविरत्न भागवत भट्टचार्य. वैष्णव धर्माची दिक्षा घेण्यापुर्वी भट्टदेव शाक्त होते, असे काही अभ्यासक मानतात. गुरू दामोदरदेव (१४८८-१५९८) यांचा भट्टदेवांवर बराच प्रभाव होता. त्यांच्याच प्रेरणेने भट्टदेवांनी भागवतपुराण व गीता यांचे असमियामध्ये भांषातर केले.

भट्टदेवांनी अनेक ग्रंथ लिहिले असले, तरी ते त्यांच्या कथा-भागवत आणि कथा-गीता या भाषांतरासाठीच विशेष प्रसिद्ध आहेत. वैष्णव साहित्यासाठी ब्रजबुलीचा वापर न करता असमियाचाच कटाक्षाने वापर करणारे ते आद्य लेखक होत. सोळाव्या शतकात सर्वच भारतीय भाषांत साहित्याचे माध्यम म्हणुन सर्वत्र पद्याचा वापर होत असताना भागवरपुराण व गीता यांचे गद्य भाषांतर करण्याचे धाडस भट्टाचार्यांनी केले त्यांचा संस्कृत व्याकरण व साहित्याचा गाढा व्यांसग होता. त्यामुळे त्यांना ‘भागवत भट्टाचार्य’ ही उपाधी लाभली. त्यामुळे संस्कृत भाषेचा विशेषतः त्यातील वाक्यरचनेचा, प्रभाव या दोन्ही कलाकृतीवर प्रकर्षाने जाणवतो. त्यांची भाषा प्रगल्भ, काटेकोर पण सुगम आहे. आधात्मिक आणि तात्विक विचार व्यक्त करण्यासाठी आवश्यक तेथे संस्कृत शब्दाचां वापर त्यांनी केलेला आहे. हे दोन्ही ग्रंथ केवळ भाषांतर नसुन भट्टदेवांनी स्वतःच्या दृष्टिकोनातून मूळ विषयाचे स्वतंत्रपणे विवरण केल्याचे आढळते. त्यांपैकी गद्यलेखन शैली पुढील लेखकांसाठी आदर्शभुत ठरली त्यांच्या कथा भागवतातील प्रासादिक व हलक्या-फुलक्या शैलीचा प्रभाव नंतरच्या ‘चरित-पुथी’ म्हणजे संतचरित्रलेखन करणाऱ्या लेखकांवर प्रकर्षाने पडलेला दिसतो.

त्यांच्या गद्यलेखनात संवादररूप शैली, तर्कशुद्ध मांडणी व साधी सरळ भाषा ही वैशिष्टये आढळतात. त्यांनी काही संस्कृत ग्रंथरचनाही केली आहे. त्यातील भक्तिविवेक हा ग्रंथ महत्तवपूर्ण आहे. भट्टदेवकृत कथा-गीता हा प्रख्यात ग्रंथ ⇨ हेमचंद्र गोस्वामी (१८७२-१९२८) हयांनी शास्त्रीय रीतीने संपादून प्रकाशित केला आहे.(१९१८).

सर्मा,सत्येंद्रनाथ (इं)ब्रम्हो, माधुरी(म.)