फूकन, आनंदराम ढेकिआल : (२४ सप्टेंबर १८२९-१६ जून १८५९). आधुनिक असमिया गद्याचे जनक व निबंधकार. जन्म गौहाती येथे. त्यांचे वडील हलिराम हे विद्वान व लेखक होते. असमिया साहित्याच्या आधुनिक युगाचा प्रारंभ आनंदराम यांच्या जन्मवर्षापासून मानला जातो. अल्पवयातच त्यांनी पारंपरिक पद्धतीने संस्कृत आणि असमिया भाषासाहित्याच्या अभ्यासास प्रारंभ केला. सिबसागर येथील बॅप्टिस्ट मिशनच्या शाळेत त्यांचे सुरूवातीचे शिक्षण झाले आणि १८४१-४४ पर्यंत कलकत्ता येथील हिंदू कॉलेजमध्ये त्यांचे नंतरचे शिक्षण झाले. इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभूत्व होते.
त्यांनी १८३० नंतरच्या दशकामध्ये अरूणोदय या मासिकातून लेखन करण्यास सुरूवात केली. पुढे असमिया लरार मित्र (म. शी. असमिया बालमित्र-२ भाग, १८४९) नावाची असमिया वाचनमाला त्यांनी तयार केली. अ फ्यू रिमार्क्स ऑन द असमीज लँग्वेज (१८५५) हे त्यांचे ‘अ नेटिव्ह’ ह्या टोपण नावाने प्रसिद्ध केलेले इंग्रजी पुस्तक होय. त्यात असमियातील सु. ६२ धार्मिक ग्रंथांचे आणि ४० नाट्यकृतींचे सूक्ष्म विश्लेषण केलेले आहे. असमिया साहित्यातील समृद्ध ज्ञानभांडार ह्या पुस्तकाद्वारे त्यांनी लोकांच्या निदर्शनास आणले बंगालीऐवजी असमिया भाषेला शिक्षणाचे माध्यम म्हणून दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी त्यात मोठ्या प्रभावीपणे असमिया भाषेची बाजू मांडली आहे.
आनंदराम यांनी आधुनिक असमिया निबंधलेखनाचा पाया घातला. त्यांच्या निबंधांतून प्रत्ययास येणाऱ्या स्वदेशाभिमानाचे व स्वतंत्र लेखनशैलीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अरूणोदय मासिकातून प्रसिद्ध झालेला त्यांचा ‘इंग्लंडर विवरण’ हा निबंध होय. वयाच्या केवळ अठराव्या वर्षी त्यांनी हा निबंध लिहिला.
बंगाली भाषेविरूद्ध लढा देण्यास ख्रिस्ती मिशनऱ्यांना त्यांनी सहकार्य दिले. असमिया भाषेला तिचे हक्काचे न्याय्य स्थान मिळवून देण्यात त्यांचा वाटा फार मोठा आहे. त्यांनी असमिया-इंग्रजी व इंग्रजी-असमिया शब्दकोशरचनेचे कार्यही सुरू केले होते तथापि त्यांच्या अकाली निधनाने ते अपूर्णच राहिले. आधुनिक असमिया गद्याचे शिल्पकार म्हणून त्यांचे स्थान विशेष महत्त्वाचे आहे. ⇨ गुणभिराम बरुआंनी त्यांचे आनंदराम ढेकिआल फूकनर जीवन चरित (१८८०) हे चरित्र लिहिले आहे.
सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) कर्णे, निशा (म.)
“