बरकाकती, रत्नकांत : (२० जून १८९७-? १९६३). प्रसिद्ध असमिया कवी. जन्म मध्य आसाममधील नौगाँग तालुक्यातील अथगांव नावाच्या गावी. शालेय शिक्षण नौगाँग येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता येथे. कलकत्ता येथे सुरेंद्रनाथ बॅनर्जी व बिपीनपाल दास ह्या राजकीय पुढाऱ्यांशी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्याशी त्यांचा संबंध आला. रवींद्रनाथांच्या काव्याने ते अतिशय प्रभावित झाले. त्यांच्या काव्यावर रवींद्रनाथांची शब्दकळा व छंद यांचा सखोल प्रभाव पडला. १९६३ मध्ये असमिया साहित्य सभेचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमानही त्यांना प्राप्त झाला.

बरकाकतींचे फारच थोडे वाङ्‌मय ग्रंतरूपाने किंवा अन्य रीतीने प्रकाशित झाले आहे. शेषालि (१९३२) आणि तर्पण (१९५३) हे त्यांचे काव्यसंग्रह होत. काव्य आरु अभिव्यंजना (१९४१) हा त्यांचा साहित्यसमीक्षापर ग्रंथ आहे. असमिया कथा साहित्य (१९५०) हा प्राचीन असमिया गद्याचा परामर्श घेणारा त्यांचा ग्रंथ होय. गांधीजीच्या इंडियन होम रूल ह्या पुस्तकाचे त्यांनी महात्मा गांधीर स्वराज्य (१९२३) ह्या नावाने असमियात भाषांतर केले आहे. त्यांनी काही गद्यलेखन केले असले, तरी कवी म्हणूनच ते विशेष प्रसिद्ध आहेत.

त्यांच्या काव्याचा मुख्य विषय प्रेम. शेवालीतील बहुतेक कवितांची मध्यवर्ती कल्पना स्त्री-पुरूषांतील ऐहिक प्रेम हीच आहे. ह्यातील स्त्री अतिशय सुंदर. सौंदर्याच्या सर्व कल्पनांनी परिपूर्ण, तिलोत्तमेप्रमाणे अद्वितीय लावण्यमयी आहे. ऐहिक प्रेमाच्या आणि स्त्री-सौंदर्याच्या ह्या वर्णनाबरोबरच त्या प्रेमातील दुःख, वेदना, विरह, निराशा इ. भावभावनांचेही सुंदर चित्रण त्यांनी आपल्या कवितांतून केले आहे.

मानवी अस्तित्व, जीवन व त्यातील सुसंगती-विसंगती इ. तत्वत्ज्ञानपर विषयही त्यांनी आपल्या कवितेतून हाताळलेले दिसतात. माणूस हा निसर्गाच्या तुलनेत गौण, अपूर्ण, स्खलनशील असला, तरी तो त्याच्या ठायी असलेल्या सर्जनशीलतेने यशस्वी होतो. ‘किजानी नहई भूल’ ह्या कवितेत त्यांचा मानवाच्या सर्जनशक्तीबद्दलचा आदर आणि त्याच्या स्खलनशीलतेबद्दलची सहानुभूती व्यक्त झाली आहे. त्यांच्या इतर काही कवितांत कवी आणि कविता यांतील संबंधाचे विश्लेषण आहे. त्यांच्या मते कवी हा सामान्य माणसापेक्षा अतिशय संवेदनाक्षम असल्यामुळे इतरांना न दिसणारे सौंदर्यही तो पाहू शकतो व आपल्या काव्यात व्यक्त करू शकतो.

त्यांच्या काव्यातील ह्या विषयांपेक्षा लक्षात राहते ती त्यांची संगीतानुकूल, नादमधुर काव्यशैली. त्यांच्या काव्यात स्वच्छंदतावादी काव्यातील अवास्तवता आढळत नाही. आशयापेक्षा रूपाला, अभिव्यक्तिला ते जास्त महत्व देताना आढळतात. उत्स्फूर्तता, सहजता, झपाटणारी नादपूर्ण लय, स्वच्छ दृष्टि, सुस्पष्ट प्रतिमा, सूचक व संयत भाषा ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये होत. ह्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळेच ते समकालीन असमिया कवींपेक्षा वेगळे व महत्वपूर्ण कवी मानले जातात.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं) ब्रह्मे, माधुरी (म.)