सूर्यकुमार भूयन

भूयन, सूर्यकुमार : (१८९४ – १९६४). आधुनिक असमिया कवी, कथालेखक, चरित्रकार व इतिहाससंशोधक जन्म नौगाँग येथे झाला व शालेय शिक्षणही तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षण गौहाती व कलकत्ता येथे. इंग्रजी घेऊन ते एम्. ए. झाले आणि सरकारी नोकरीत शिरले. शिक्षण खात्यात शिक्षण संचालकपदापर्यंत चढत जाऊन ते निवृत्त झाले. काही काळ ते गौहाती विद्यापीठाचे कुलगुरू होते तसेच साहित्य अकादेमीचेही सदस्य होते. एम्. ए., बी. एल्., पीएच्. डी. व डी. लिट्. ह्या पदव्या त्यांनी संपादन केल्या. आसामच्या इतिहासाबाबत संशोधन करून त्यांनी लंडन विद्यापीठातून पीएच्. डी. व डी. लिट्. ह्या पदव्या संपादन केल्या.

प्रेमगीते व देशभक्तिपर गीते रचणारे स्वच्छंदतावादी कवी म्हणून त्यांनी काव्यलेखनास सुरुवात केली. सुरुवातीच्या त्यांच्या कविता निर्माली (१९२७) ह्या संग्रहात समाविष्ट आहेत. जयमती उपाख्यान (१९२०) आणि बरफूकनर गीत (३ री आवृ. १९५१) ही त्यांची दोन ऐतिहासिक दीर्घकाव्ये होत. याच काळात त्यांनी अनेक लघुकथाही लिहिल्या. पंचमी (१९२७) हा त्यांच्या कथांचा उल्लेखनीय संग्रह होय. नंतर ते चरित्रलेखनाकडे वळले. रविंद्रनाथ (१९२०), महात्मा गोपाल कृष्ण गोखले (१९१६), स्वर्गीय आनंदराम बरुआ (१९४०) ही त्यांनी लिहिलेली विस्तृत व दर्जेदार चरित्रे होत. १९४७ नंतर ते इतिहाससंशोधनाकडे वळले. आसामच्या इतिहासाचे सखोल संशोधन करून त्यांनी असमियात व इंग्रजीत इतिहासावर विपुल लेखन केले. त्यांच्या इतिहाससंशोधनात चिकित्सक दृष्टी, वस्तुनिष्ठता, समतोलपणा हे गुणविशेष दिसून येतात. त्यांनी गद्यशैली काटेकोर व प्रौढ आहे. आहोमोर दिन (१९१८), असम-जीयारी (१९३५), कोंवर बिद्रोह (१९४८), बुरंजीर बाणी (१९५१), रमणी गाभरू (१९५१), मिरजुमलार असोम आक्रमण (१९५६) हे त्यांचे असमियातील आणि अर्ली ब्रिटिश रिलेशन्स विथ आसाम (१९२८), लचित बरफूकन अँड हिज टाइम्स (१९४७), अँग्लो-आसामीज रिलेशन्स, १७७१-१८५६ (१९४९) हे त्यांचे इंग्रीजीतील उल्लेखनीय इतिहाससंशोधनपर ग्रंथ होत. काही प्राचीन ग्रंथांचे त्यांनी उत्कृष्ट संपादनही केले आहे.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)