दुआरा, जतींद्रनाथ : (१८९२–१९६४). असमिया साहित्यातील सर्वश्रेष्ठ स्वच्छंदतावादी कवी म्हणून जतींद्रनाथांची ख्याती आहे. सिबसागर (आसाम) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कलकत्ता येथे त्यांचे बी. ए. पर्यंत शिक्षण झाले. नंतर प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. साहित्य अकादेमीचेही ते सदस्य होते.

कलकत्ता येथे शिकत असतानाच त्यांचा ⇨ लक्ष्मीनाथ बेझबरुआंशी  (१८६८–१९३८) परिचय झाला. बेझबरुआंचा जतींद्रनाथांच्या साहित्यिक जीवनावर खोल ठसा उमटला. इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवी जतींद्रनाथांचे आवडीचे हाते. त्यांतही शेली त्यांचा सर्वांत आवडता कवी होता. शेलीच्या प्रभावाच्या काही खुणा त्यांच्या काव्यात आढळतात.

बन्ही (१९०९–३३) ह्या नियतकालिकातून ते कवी म्हणून प्रथम प्रसिद्धीस आहे. सुरुवातीस त्यांनी ‘जदु’ ह्या टोपण नावाने काव्यलेखन केले. साहसाचे आकर्षण व सौंदर्याच्या भावनिक आशयाचा शोध ह्या दोन प्रमुख स्वच्छंदतावादी वैशिष्ट्यांचा जतींद्रनाथांच्या काव्यात ठळकपणे प्रत्यय येतो. नदी, नाव व नावाडी ह्या तीन प्रतीकांद्वारे जीवनाचा आध्यात्मिक अर्थही विशद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या मते प्रेम व सौंदर्य ह्या एकाच वस्तूच्या दोन बाजू आहेत. जेथे प्रेम आहे, तेथे दैवी सौंदर्यही आहेच. त्यांची कविता वैविध्याने संपन्न आहे. दु:ख, वेदना, विरह, निराशा या मार्गानेच प्रेमिकाला आपला मार्ग चोखाळावा लागतो. निसर्गात ते आपल्या अतृप्त प्रेमाची तृप्ती शोधतात. तेथे त्यांना प्रेमसाफल्याचा विशुद्ध आनंदही प्राप्त होतो. इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्यातील संगीतगुण, सरलता आणि प्रवाहिता यांकडे ते विशेष आकृष्ट झाले. छंदांवरही त्यांचे प्रभुत्व होते. सु. पन्नास वर्षे त्यांच्या भावकवितेचा आदर्श असमिया काव्यात टिकून आहे.

आपोन सूर (१९३८), बनफूल (१९५२), मीलनार सूर (१९६०) हे त्यांच्या भावकवितेचे रसिकमान्य संग्रह होत. बनफूलला  १९५५ मध्ये साहित्य अकादेमीचा पुरस्कारही मिळाला. उमर खय्यामच्या रुबायांचा त्यांनी केलेला असमिया पद्यानुवाद ओमरतीर्थ  (१९२५) नावाने प्रसिद्ध आहे. कथा-कविता  (१९३३) ह्यातील कविता त्यांनी टुर्ग्येन्येव्हच्या काव्यात्मक गद्याच्या धर्तीवर लिहिल्या असून त्यांतील सूचकात लक्षणीय आहे. तयांच्या ह्या गद्यलेखनातही भावकवितेसारखाच प्रत्यय येतो. त्यांची कविता त्यातील भावनेपेक्षा मधुर लयीसाठी अधिक वाचली जाते. शब्दमाधुर्य, नादमधुर छंद, सर्वत्र भरून राहणारा एक उदासखिन्न भाव व एकाकीपणाची तीव्र जाणीव ही त्यांच्या कवितेची काही वैशिष्ट्ये होत. आधुनिक असमिया काव्यात त्यांच्या काव्याला उच्च स्थान आहे.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)

Close Menu
Skip to content