हरिवर विप्र : (सु. तेरावे शतक). हरिहर विप्र. असमिया साहित्यातील एक श्रेष्ठ कवी. पश्चिम आसाममध्ये कामत (कामरूप) नावाचे प्राचीन राज्य होते. तेथील दुर्लभनारायण राजाच्या पदरी अनेक विद्वानमंडळी होती. त्याने वैष्णव पंथाला उत्तेजन दिले होते. असमिया भाषेत वाङ्मयनिर्मिती व्हावी म्हणून त्याने अनेक कवी व विद्वानांना राजाश्रयदिला होता. या कवींपैकी हरिवर विप्र याने बब्रुबाहनर युद्ध व लवकुशरयुद्ध हे दोन काव्यग्रंथ लिहिले. बब्रुबाहनर युद्ध या काव्यग्रंथाच्या आशी-र्वचनात कवी म्हणतो, ‘राजा दुर्लभनारायण हा कामरूपचा वीरपुरुष, त्याची कीर्ती वाढो. तो आपल्या स्वकीयांसह सुखैव एक हजार वर्षेराज्य करो. त्याच्या सुखासीन राज्यात राहणारा विप्र हरिवर गौरी-देवतेला वंदन करीत आहे आणि अश्वमेधपर्वातील, जे चैतन्य धर्मनिष्ठजाणू शकतात, ते काव्यात आणीत आहे.’ या दोन्ही काव्यग्रंथांच्या आख्यायिका जैमिनीय महाभारता तून कवीने घेतल्या आहेत.

बब्रुबाहनर युद्ध या ग्रंथामध्ये ६०० दोहे असून त्यांत पिता-पुत्रांचा रोमहर्षक संघर्ष वर्णिला आहे. प्रारंभी अश्वमेधातील घोडा मणिपूर राज्यात प्रवेश करतो आणि त्यामागे अर्जुन असतो. यज्ञीय घोडा मणिपूरचाराजा बब्रुबाहन पकडतो परंतु आपली माता चित्रांगदा हिच्याकडून अर्जुनहा आपला पिता असल्याचे कळल्यानंतर तो अश्व परत करतो पणअर्जुन पित्याचे नाते नाकारतो व चित्रांगदेच्या चारित्र्याविषयी शंका घेतो.बब्रुबाहनाच्या क्षत्रियत्वाविषयी व दृढनिश्चयाविषयी अर्जुनाने घेतलेल्या शंकांमुळे घनघोर रक्तरंजित युद्ध होऊन त्यात अर्जुन मारला जातो. पुढेश्रीकृष्ण त्याला पुनर्जीवन देतो व अज्ञातवासात चित्रांगदा हिच्याशीझालेला विवाह व पुत्रप्राप्ती याची त्यास आठवण करून देतो. त्यानंतर पिता-पुत्रांचे मनोमीलन होते. या क्रमाने हे काव्य रचले गेले आहे. हे मूळ संस्कृत काव्याचे शब्दशः भाषांतर नसून त्याचे कवीने संवैधानिक रूप स्वीकारले आहे. त्याला उत्कृष्ट वर्णनात्मक अलंकृत शैलीने नाट्यमय केले आहे. पिता-पुत्रांच्या प्रगल्भ संवादांतून कवीची व्यक्तिचित्र रेखाटण्यातील हातोटी दिसून येते. मणिपूरच्या राजदरबाराचे चित्र रेखाटताना वापरलेली प्रगल्भ भाषाशैली, युद्धप्रसंगांतील वीररसप्रधान वर्णने, जिवंत व्यक्तिचित्रे, आनंददायी नीतिबोध आणि सूत्रांनी सुशोभित झालेले हे काव्य वैशिष्ट्यपूर्णम्हणता येईल.

लवकुशरयुद्ध या काव्यग्रंथात लव-कुश व राम यांच्यातील युद्धाचे वर्णन असून तत्पूर्वीचे रामायणातील प्रसंगही उद्धृत केले आहेत. उदा., सीतेचे अपहरण, राम-रावण युद्ध, सीतेची अग्निपरीक्षा, रामाचे राजधानीत (अयोध्येत) पुनरागमन इत्यादी. सामान्य शिक्षितांसाठी लिहिलेल्या या काव्यात स्थानिक जीवनाचे प्रतिबिंब पडल्यामुळे, घरगुती उपमा – उत्प्रेक्षांच्या वापरामुळे हा ग्रंथ लोकप्रिय होण्यास मदत झाली. बद्धकाव्य म्हणून ओळखले जाणारे वीररसप्रधान काव्य लिहिणाऱ्या कवींचे हरिवरविप्र पूर्वसूरी होत.

पहा : असमिया साहित्य.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) गुडेकर, विजया (म.)