आगरवाला, चंद्रकुमार: (२८ नोव्हेंबर १८६७ – २ मार्च १९३८). असमिया कवी. १८९० ते १९०० ह्या दरम्यान असमिया साहित्यात स्वच्छंदतावादी युगाचे प्रवर्तन चंद्रकुमार आगरवाला, ⇨लक्ष्मीनाथ बेझबरुआ आणि ⇨हेमचंद्र गोस्वामी ह्या तिघांनी केले. चंद्रकुमारांचे मूळ घराणे राजस्थानातील. चंद्रकुमारांना साहित्यसेवेचा वारसा त्यांचे वडील हरिबिलास यांच्याकडून मिळाला. हरिबिलास यांनी दुर्लक्षित असे कित्येक चांगले प्राचीन असमिया ग्रंथ शोधून काढले व प्रकाशित केले. चंद्रकुमारांचे शिक्षण कलकत्ता येथे झाले. बी. ए.ला असतानाच त्यांनी कलकत्त्यात शिकणाऱ्या असमिया तरुणांच्या मदतीने ‘असमीज लँग्वेज इंप्रूव्हमेंट सोसायटी’ ह्या संस्थेची स्थापना केली. ह्या संस्थेच्या वतीने कला–साहित्यास वाहिलेले जोनाकी नावाचे मासिक काढण्यात आले. सुरुवातीस जोनाकीचे संपादन चंद्रकुमारांनी केले. असमिया साहित्यिक वर्तुळात त्यामुळे उत्साहाची लाट पसरली. राष्ट्रीय धोरण असलेले असमिया नावाचे एक अर्ध–साप्ताहिकही चंद्रकुमारांनी सुरू केले. चंद्रकुमार निकोप दृष्टीचे आशावादी कवी होते. मानवजातीचे भवितव्य उज्ज्वल आहे, असा त्यांचा विश्वास होता. इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवींचा–विशेषत: शेलीचा–आणि वेदान्तातील चराचरेश्वरवादी दृष्टिकोनाचा त्यांच्या काव्यावर गहिरा प्रभाव दिसून येतो. प्रतिमा (१९१३) आणि बीण-बरागि (१९२३) हे त्यांचे महत्त्वाचे काव्यसंग्रह होत.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) शिरोडकर, द. स. (म.)