असमिया साहित्य : बौद्ध धर्माच्या सहजयान पंथातील सिद्धाचार्यांनी, नवव्या ते बाराव्या शतकांच्या दरम्यान रचिलेल्या अध्यात्मपर चर्यांपदांनी असमिया साहित्याची सुरुवात झाली, असे अनेक विद्वान मानतात. ही पदे गूढ स्वरूपाची असून त्यांत सहजयान पंथाचे सिद्धांत व पंथीय आचारविचार आलेले आहेत. सहजयान पंथातील काही सिद्ध कामरूप देशातील म्हणजेच सध्याच्या आसाममधील होते, हे अलीकडे मान्य झालेले आहे. ह्या पदांची भाषा पूर्वेकडील मगधादी देशांत बोलली जाणारी अपभ्रंश असल्याकारणाने, असमिया भाषेशी तिचे बरेच साम्य आहे. या पदांतील काही शब्द, वाक्प्रचार व म्हणी आजही थोड्याफार फरकाने असमिया भाषेत प्रचलित आहेत. ह्या पदांच्या विशेष म्हणजे गहन तत्त्वे, सिद्धांत व विचार हे अतिशय रंजक स्वरूपात, रूपकात्मक पद्धतीने रोजच्या अनुभवांतील उदाहरणांनी व घरगुती भाषेत स्पष्ट केलेले आहेत, हा होय. म्हणूनच ही चर्यापदे म्हणजे असमिया साहित्याच्या पायातील पहिला थर होत.

असमिया साहित्याची विभागणी स्थूलमानाने पुढील कालखंडांत करता येईल : (१) वैष्णवपूर्व कालखंड (१२५० ते १५००) (२) वैष्णव कालखंड (१५०१ ते १६५०) (३) आहोम अथवा गद्यबुरंजी कालखंड (१६५१ ते १८२६) (४) आधुनिक कालखंड (१८२७ ते १९२०) (५) राष्ट्रीय पुनरुत्थानाचा कालखंड (१९२१ ते १९४७) आणि (६) स्वातंत्र्योत्तर कालखंड (१९४७ नंतर).

वैष्णवपूर्ण कालखंड : असमिया साहित्याची खरीखुरी सुरुवात मात्र तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून, म्हणजे कमत राज्याचे अधिपती दुर्लभनारायण यांच्या कारकीर्दीपासून होतो. ह्या काळात प्रामुख्याने रामायण-महाभारताची भाषांतरे, रूपांतरे करण्यात आली. हरिवर विप्र व हेमसरस्वती यांना दुर्लभनारायणांचा आश्रय लाभला होता. लवकुशरयुद्ध व बब्रुवाहननर युद्ध ही हरिवर विप्राची दोन दीर्घ आख्यानपर काव्ये असून, त्यांत त्याच्या विद्वत्तेचे, प्रतिभेचे आणि आसाममधील जीवनाच्या सखोल परिचयाचे पुरावे आढळतात. हेमसरस्वतीने प्रल्हादचरित्रहरगौरीसंवाद ही दर्जेदार काव्ये लिहिली. ह्या काळातील कविरत्न-सरस्वती आणि रुद्र कंदली हे आणखी दोन उल्लेखनीय कवी होत. ह्या काळातील सर्वच कवींनी मुख्यत: रामायण-महाभारतव क्वचितप्रसंगी पुराणांतून स्फूर्ती घेऊन आपले काव्य रचिले. संपूर्ण रामायणाला मात्र कुणीच हात लावला नाही. हे काम पुढे चौदाव्या शतकात ⇨ माधव कंदली महाकवीने हाती घेऊन तडीस नेले. वाल्मिकिरामायणाची त्याने ओघवत्या असमिया भाषेत मुळाबरहुकूम भाषांतर केले. हे भाषांतर करताना सौंदर्यदृष्टी आणि सामान्यजनांची अभिरुची ह्या दोन गोष्टी त्याने सतत नजरेसमोर ठेवल्या. हे भाषांतर आकर्षक तर आहेच, पण त्याचे वाङ्मयीन मूल्यही मोठे आहे.

वरील सर्व ग्रंथ कथानात्मक (आख्यानपर) काव्याच्या रूढ शैलीत लिहिलेले आहेत. देवदेवतांचा महिमा गाणारी काव्ये रचणे हा ह्या काळातील साहित्याचा आणखी एक प्रकार होय. ह्या दृष्टीने ‘पांचाली’- प्रकारच्या काव्यांचा आवर्जून उल्लेख करावयास हावा. ह्या पांचाली काव्यांत देवदेवतांचा, विशेषत: नागदेवता मनसा हिचा, गौरव केलेला आहे. पांचाली काव्यास सुरुवातीस कथनात्मक भाग, मध्येच काही भावगीतात्मक भाग व शेवटी पुन्हा कथनात्मक भाग असतो. ‘ओजापाली’ या नावाने गायकांचे मेळेही पांचाली काव्ये गात असत. मेळ्यातील प्रमुखास ‘ओजा’ व त्याच्या चारपाच साथीदारांना ‘पाली’ म्हणत. ह्या काळातील पांचाली कवींत दुर्गावर, पीतांबर कवी आणि मंकर हे विशेष प्रसिद्ध आहेत. पंधराव्या शतकाच्या अखेरीस या पांचाली शैलीत दुर्गावर याने गीतिरामायण व बेउला-आख्यान पीतांबर कवीने उषा-परिणय व नलोपाख्यान आणि मंकर याने पद्मपुराण ही काव्ये रचिली. ह्या काव्यांत अनेक भावगीते आली असून रागदारी संगीताच्या चालीवर ती गायिली जात. 

वैष्णव कालखंड : असमिया साहित्येतिहासाचा दुसरा कालखंड सोळाव्या शतकापासून सुरू होऊन सतराव्या शतकाच्या मध्यावर संपतो. वैष्णवपंथाच्या पुनरुजीवनाचा हा काळ होय. ह्या काळातील असमिया साहित्याची सर्व बाजूंनी वाढ व समृद्धी झाली. ⇨ शंकरदेव (१४४९–१५६९) ह्या महान संतकवीने वैष्णवपंथाचे पुनरुज्जीवन केले. तो प्रतिभासंपन्न कवी, उच्च कोटीचा संगीतकार, गाडा विद्वान, समाजसुधारक व उत्तम प्रचारक होता. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे भागवतपुराणावर आधारित अशा वैष्णवपंथाचा प्रसार करणे त्याला सहज शक्य झाले. त्याच्या अनेक कट्टर अनुयायांची त्याला या कार्यात मदत झाली. त्याच्या अनुयायांपैकी ⇨ माधवदेव (१४८९–१५९६) हा प्रमुख होता. वैष्णवपंथाचा प्रसार करण्यासाठी व तो लोकप्रिय करण्यासाठी अनेक वैष्णव संतांनी व कवींनी मधुर व सोप्या असमिया भाषेत आर्ष महाकाव्यांची व पुराणांची भाषांतरे केली तसेच धार्मिक स्वरूपाची काव्ये, भावगीते व नाटके रचिली. संतांच्या चरित्रमालाही गुंफल्या. शंकरदेवाने एक नवीन प्रकारची प्रार्थनापद्धत सुरू केली. ह्या प्रार्थनेत सर्व भक्त सामील होत. प्रार्थनेनंतर शास्त्रग्रंथांचे वाचन व निरूपण होई. शंकरदेवाने सुरू केलेला वैष्णवपंथ अल्पावधीतच भरभराटीस येऊन अतिशय लोकप्रिय झाला आणि हजारो लोक वैष्णवपंथाकडे वळले. शंकरदेवाने भागवतपुराणाचे सुबोध असमिया भाषेत भाषांतर केले. त्याने सहा नाटके, पुराणांतील प्रसंगांवर आधारलेली अनेक भक्तिकाव्ये आणि दोनशेहून अधिक भक्तिगीते लिहिली. त्याने लिहिलेली भक्तिगीते ‘बरगीत’ म्हणून ओळखली जातात. वैष्णवपंथीय साहित्याबाबतचा दृष्टिकोन ⇨ अनंत कंदली या प्रसिद्ध कवीने पुढील आशयाच्या शब्दांत व्यक्त केला आहे : ‘संस्कृत भाषेत मी अत्यंत सहजपणे लेखन करू शकलो असतो परंतु शूद्र व स्त्रियांच्या कल्याणासाठी मी लोकभाषेत (असमिया) लिहिणे पसंत केले.’

वैष्णव कालखंडात निर्माण झालेल्या विपुल साहित्याची वर्गवारी खालीलप्रमाणे करता येईल : 

काव्य : (अ) आर्ष महाकाव्यांची (रामायण व महाभारताची) व पुराणांची भाषांतरे. (आ) महाकाव्यांची व पुराणांची रूपांतरे. (इ) भक्तिप्रेरित अद्‌भुतरम्य कथा. (ई) नाटके. (उ) उदात्त भाव असलेली व रागदारीत बसविलेली गीते. (ऊ) संतचरित्रमाला. 

गद्य : (क) पुराणांची गद्य भाषांतरे व सारांश. (ख) गद्य चरित्रे.

(अ) आर्ष महाकाव्यांची व पुराणांची भाषांतरे : पुराणांपैकी भागवतपुराणाची मोहिनी लोकांच्या मनावर सर्वाधिक पडली. स्वत: शंकरदेवाने भागवतपुराणाच्या एकूण नऊ स्कंदांचे भाषांतर केले व त्याच्या शिष्यांनी उरलेल्या स्कंदांचे भाषांतर पूर्ण केले. शंकरदेवाच्या भाषांतरातील दशमस्कंदाचे भाषांतर अतिशय सरस आणि काव्यमय उतरले असून त्याला अफाट लोकप्रियता लाभली. केशव कायस्थ, अनिरुद्ध कायस्थ, गोपालचरण द्विज, दामोदर दास या वैष्णवपंथीयांनी भागवत-पुराणाचे भाषांतर पूर्ण करण्यास हातभार लावला. लोकप्रियतेच्या बाबतीत भागवतपुराणाच्या खालोखाल महाभारतरामायण या दोन आर्ष महाकाव्यांचा क्रमांक लागतो. महाभारताचे असमिया भाषेत भाषांतर करणाऱ्यांमध्ये रामसरस्वती हा अग्रगण्य कवी होय. या कामात त्याला त्याचा मुलगा गोपीनाथ पाठक तसेच विद्यापंचानन, कंसारी कायस्थ यांची आणि इतर अनेक सहकाऱ्यांची मदत झाली. असमिया-महाभारत मूळ महाभारताचे शब्दश: भाषांतर नाही हे सांगणे आवश्यक आहे. मूळ विषयांचा कुठे संक्षेप, कुठे सारांश, तर कधी त्यात स्वकालीन गोष्टींची घातलेली भर, यामुळे ते खऱ्याखुऱ्या आसामाचे महाभारत वाटते.

रामायणाची अनेक भाषांतरे असमिया भाषेत उपलब्ध आहेत. चौदाव्या शतकात माधव कंदलीने रामायणाचे भाषांतर केले. त्याच्या भाषांतरातील पहिला व शेवटला भाग कालौघात नष्ट झाल्यामुळे माधवदेवाने बालकांडाचे व शंकरदेवाने उत्तरकांडाचे भाषांतर करून माधव कंदलीचा ग्रंथ पूर्ण केला. अनंत कंदली हा शंकरदेवाचा शिष्य व वैष्णव-पंथाचा कट्टर पुरस्कर्ता होता. त्यानेरामायणावर वैष्णव-पंथाचे आवरण चढवून संपूर्ण रामायणाचे असमिया भाषेत भाषांतर केले.

वैष्णवपंथातील भिन्न भिन्न मतानुयायांच्या दृष्टीनेही भगवद्गीता अत्यंत पूज्य मानली जाते. असमिया भाषेत गीतेची गद्य व पद्य स्वरूपाची अनेक भाषांतरे उपलब्ध आहेत. त्यांतील अत्यंत प्रसिद्ध भाषांतर म्हणजे सतराव्या शतकाच्या सुरुवातीस होऊन गेलेल्या गोविंद मिश्रा याचे पद्य-गीता हे होय. पद्मपुराण, मार्कंडेयपुराण, विष्णुपुराण व हरिवंश यांतील निवडक भागांची असमिया भाषेत पद्यमय भाषांतरे झालेली आहेत.


(आ) रूपांतरे : भाषांतरांशिवाय पुराणांतील प्रसंगांची अनेक रूपांतरेसुद्धा उपलब्ध आहेत. पुराणांतील निवडक प्रसंगांचा बारीकसारीक तपशिलांसह विस्तार करून त्यांना काव्यरूप देण्यात आले. मूळ पुराणांतून विषयाचा केवळ सांगाडा घेऊन आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर कवींनी त्याचा आविष्कार केला. या रूपांतरांतील काही उल्लेखनीय उदाहरणे म्हणजे शंकरदेवाचे रुक्मिणीहरण, माधवदेवाचे राजसूय आणि अनंत कंदलीचे कुमारहरण काव्य ही होत. ह्या रूपांतरित काव्यांत वीर व शृंगाराबरोबरच अद्‌भुत रसाचेही मिश्रण आढळते.

(इ) अद्‌भुतरम्य कथा : वैष्णव काळातील साहित्यप्रकारांत सर्वांत अधिक लोकप्रिय प्रकार भक्तिप्रेरित अद्‌भुतरम्य कथांचा होय. त्यांना ‘बंधकाव्य’ म्हणतात. त्यांत पांडवांच्या अत प्रतापांची वर्णने असून अधूनमधून देव, दानव, साधू व राजे यांच्याबाबतच्या दंतकथा व आख्यायिका आलेल्या आहेत. वीर व अद्‌भुत हे त्यांतील प्रमुख रस होत. बंधकाव्यातील नायक व इतर पात्रे महाभारतातील असली, तरी त्यांच्या भोवती विणलेल्या कथा मात्र कविकल्पनेतूनच निर्माण झालेल्या आहेत. बंधकाव्याने सामान्य जनतेस धार्मिक आणि नैतिक शिक्षण देण्याचे कार्य केले. त्यांतील मनोहर कथांची लोकांच्या मनावर विलक्षण मोहिनी पडली. बंधकाव्याचा जनक रामसरस्वती असून त्याच्यानंतरचे कवी अनंत कंदली आणि दैवज्ञ यांनीही या प्रकारची काव्यरचना केली आहे.

(ई) नाटके : वैष्णवकालीन असमिया साहित्यात ‘अंकियानाट’ या प्रकारची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या प्रकारच्या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील गेयता हे होय. अंकियानाटमध्ये संवाद आणि अभिनय यांकडे दुर्लक्ष न करता भावपूर्ण गेय रचनेवर विशेष भर दिला जातो. तसेच त्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाटकाचे सूत्रचालन करणाऱ्या सूत्रधाराच्या गद्य भाषणालाही प्राधान्य देण्यात येते. शंकरदेव आणि माधवदेव यांनी या प्रकारचे प्रत्येकी सहा अंकियानाट लिहिले. नंतर सतराव्या व अठराव्या शतकांतील त्यांच्या अनुयायांनीही अनेक अंकियानाट लिहिले असून त्यांतील काही आजही उपलब्ध आहेत.

(उ) उदात्त व रागदारी गीते : वैष्णव साहित्यातील आणखी एक उल्लेखनीय साहित्यप्रकार म्हणजे ‘बरगीते’ होत. या बरगीतांत उदात्त भाव व रागदारी संगीताच्या चाली आढळतात. आध्यात्मिक अनुभव, तत्त्वचिंतन, संसाराची असारता, आत्म्याची व्यथा आणि परमेश्वराचा महिमा हे बरगीतांचे प्रमुख विषय होत. काही बरगीतांतून श्रीकृष्णाच्या बाललीलांची रेखीव वर्णने आढळतात. शंकरदेव व माधवदेव या दोघांनी सु. २५० बरगीते रचिली असून, नंतरच्या दोनशे वर्षांच्या काळात अनेकांनी त्यांचे अनुकरण करून शेकडो बरगीते लिहिली. वैष्णवपंथीयांच्या उपासनेत व प्रार्थनेत बरगीतांचे गायन हे एक अविभाज्य अंग बनले. वैष्णवपंथाचे अधिकृत तत्त्वज्ञान माधवदेवरचित नामघोषा अथवा हजारी-घोषा नावाच्या काव्यात आढळते.

(ऊ) चरित्रमाला : अनेक वैष्णव संतांची व धर्मप्रचारकांची गद्य-पद्यांतील चरित्रे हा वैष्णवसाहित्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. ही चरित्रे ‘चरित-पुथी’ म्हणून आसामात ओळखली जातात. त्यांत संतांचे व धर्मप्रचारकांचे दैनंदिन जीवन, आचारविचार, धर्मावरील त्यांची निरूपणे व प्रवचने हे विषय प्रामुख्याने आलेले आहेत. शंकरदेवाच्या जीवनाबाबत व कार्याबाबत अशा प्रकाराची चारपाच चरित्रे लिहिलेली आढळतात.

(क-ख) पुराणांची गद्य भाषांतरे व गद्य चरित्रे : असमिया साहित्याच्या वैष्णव कालखंडात गद्यसाहित्यही विपुल प्रमाणात निर्माण झाले. सोळाव्या शतकापासूनच असमिया गद्यसाहित्याची एक अखंड परंपरा आढळते. आपल्या नाटकांतून शंकरदेवाने प्रथम गद्याचा उपयोग केला. मात्र अंकियानाटातील गद्य, चरित्रे व पुराणे यांतील गद्याहून भिन्न प्रकारचे आहे. नाटकातील गद्याची भाषा असमिया-मैथिलीमिश्रित आहे. परंतु सतराव्या-अठराव्या शतकांत भट्टदेव व इतरांनी लिहिलेल्या कथा-गीता, कथाभागवत व रामायण या गद्यग्रंथांत शुद्ध व प्रगल्भ असमिया भाषा असून, तीत मैथिलीचे मिश्रण आजिबात आढळत नाही. भट्टदेवाला असमिया गद्याचे जनक मानण्यात येते. असमियातील कथनात्मक गद्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याच्या कथागीता आणि कथाभागवत या ग्रंथांचा वारंवार उल्लेख केला जातो. भट्टदेवानंतर काही लेखकांनी रामायण व पुराणे यांतील काही भागांचे गद्य अनुवाद केलेले आढळतात. काही संतचरित्रेही गद्यात आहेत. ह्या चरित्रांची भाषा घरगुती स्वरूपाची आहे. कथागुरुचरित (१८ वे शतक) वर्दोवगुरुचरित (१८ वे शतक) संतसंप्रदायकथा ही त्यांतील काही महत्त्वाची चरित्रे आहेत. ह्या चरित्र-ग्रंथांत मध्ययुगीन आसामच्या धार्मिक व सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब पडलेले दिसते.

आहोम अथवा गद्यबुरंजी कालखंड : असमिया साहित्याचा तिसरा कालखंड आसाममधील ⇨ आहोम राजसत्तेच्या उदयापासून सुरू होतो. सतराव्या शतकाच्या मध्यावधीपासून तो १८२६ च्या सुमारास, आसामवर ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित होईपर्यंत, हा कालखंड आहे. आहोम काळात साहित्यिक चळवळीचे केंद्र पश्चिम आसाममधून पूर्व आसाममध्ये गेले. आहोम राजे राजकीय घटना लेखनबद्ध करून ठेवण्यास उत्सुक होते. आसामचा, तसेच जवळपासच्या इतर राज्यांचा इतिहास लिहिण्यासाठी त्यांनी चांगल्या लेखकांच्या नेमणुका केल्या. सर्वांना समजेल अशा सुबोध असमिया भाषेत त्यांनी राजकीय इतिहास लिहवून घेतले. अशा प्रकारे आहोमांच्या कारकीर्दीत अनेक वखरी लिहिल्या गेल्या. ह्या बखरींना ‘बुरंजी’ म्हणण्यात येते. बुरंजी-पद्धतीने लिहिलेले ऐतिहासिक साहित्य विपुल आहे. अलीकडे काही गद्य बुरंजींचे संग्रह संशोधनपूर्वक प्रकाशित करण्यात आले. हरकांत बरुआ याने संपादित केलेल्या आसाम बुरंजी व देवधानी-आसाम बुरंजी यांत अनेक बुरंजींचे संकलन केलेले आहे. याशिवाय श्रीनाथ दुआरा संपादित तुंगखुँगिया बुरंजीकचारी-बुरंजीआसाम बुरंजी डॉ. एस्. के. भूयन संपादित पादशाह बुरंजी हे महत्त्वाचे बुरंजी साहित्य होय.डॉ. भूयन आणि पं. हेमचंद्र गोस्वामी यांनी परिश्रमपूर्वक अनेक बुरंजी शोधून काढल्या. ह्या बुरंजी साहित्यातून तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक बाबींवर चांगला प्रकाश पडतो.

 

गद्य बुरंजीव्यतिरिक्त आहोम राजांनी व सरदारांनी नित्योपयोगी ग्रंथ लिहिण्यासाठीही प्रोत्साहन दिले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना उपयुक्त ठरतील असे ज्योतिष, वैद्यक, संगीत, नृत्य, नीतिशास्त्र इ. विषयांवर अनेक गद्य-पद्य ग्रंथ रचण्यात आले. आहोमांच्या कारकीर्दीत रचिलेल्या ग्रंथांपैकी काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत : हत्तीसंबंधी–हस्तिविद्यार्णव  अश्वरोगचिकित्सेवर घोडानिदान नृत्य व हस्त-मुद्रांवर श्रीहस्तमुक्तावली नीतिशास्त्रावर नीतिलतांकुर ज्योतिषशास्त्रावर भास्वती इत्यादी.

आहोम कालखंडातील काव्यात रामायण-महाभारतांची भाषांतरे, तसेच संस्कृत काव्यांतून व पुराणांतून निवडलेल्या प्रसंगांवर आधारलेली काव्ये यांचा अंतर्भाव होतो. ब्रह्मवैवर्तपुराण, नारदीयपुराण, धर्मपुराण यांची संपूर्ण आणि पद्मपुराण, मार्कंडेयपुराण, हरिवंश, विष्णुपुराण, कल्किपुराण व स्कंदपुराण यांतील काही भागांची पद्यमय भाषांतरे करण्यात आली. याच काळात जयदेवांच्या गीतगोविंदाचीही अनेक भाषांतरे झाली. विशेष म्हणजे याच काळात गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानसमधील अयोध्याकांडाचे, तसेच मृगावती व चंद्रावती या मध्ययुगीन हिंदी भाषेतील सूफी-पंथीय काव्यग्रंथांचेही अनुवाद करण्यात आले.

आधीच्या वैष्णव परंपरेतील साहित्यनिर्मिती आहोम कालखंडातही चालू राहिली. एकांकिका, चरित्रे, भक्तिगीते इत्यादींचे लेखन, तसेच वैष्णवग्रंथांची भाषांतरे हे कार्य चालूच होते. तथापि अठराव्या शतकात ह्या प्रकारच्या लेखनाचा वेग मंदावला आणि त्यास उतरती कळा लागली.

आधुनिक कालखंड : असमिया साहित्याचा आधुनिक कालखंड ब्रिटिशांनी आसाम घेतल्यापासून म्हणजे १८२६ पासून सुरू होतो. तेव्हापासून आसामवर पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव पडू लागला. ब्रिटिश पद्धतीच्या शासनव्यवस्थेसाठी आणि न्यायदानपद्धतीसाठी इंग्रजी जाणणाऱ्या साहाय्यकांची व कारकुनांची मोठ्या संख्येने आवश्यकता भासू लागली. असे लोक आसाममध्ये मिळत नसल्यामुळे बंगालमधून मोठ्या प्रमाणावर ते बोलावण्यात आले. असमिया स्वतंत्र भाषा नसून ती बंगालीचीच एक बोली आहे, असा अपसमज त्यांनी प्रसृत केला. परिणामत: शिक्षणाचे माध्यम म्हणून शिक्षणसंस्थांतून तसेच इतर शासकीय संस्थांमधून असमियाचे उच्चाटन होऊन बंगालीचा वापर होऊ लागला. यानंतर बंगालीचे वर्चस्व सु. चाळीस वर्षे टिकून राहिले. त्यामुळे ब्रिटिश काळाच्या सुरुवातीस असमिया भाषा व साहित्य यांची पिछेहाट झाली.

या काळात असमिया भाषा-साहित्याच्या मदतीला अमेरिकन बॅप्टिस्ट मिशनरी धावून आले. स्थानिक लोकांच्या भाषेला मारक ठरेल अशा प्रकारे आसामवर बंगाली लादणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे, ही गोष्ट त्यांनी सरकारच्या मनावर बिंबवली. मिशनऱ्यांनी असमिया भाषा चटकन आत्मसात केली व त्या भाषेत ग्रंथरचना करण्यास सुरुवात केली तसेच मासिक पत्रिकाही प्रसिद्ध केल्या. १८१३ मध्ये संपूर्ण बायबलचे असमियात भाषांतर झाले. जॉन बन्यनचे पिल्ग्रिम्स प्रोग्रेस आणि त्यासारखी इतर पुस्तके सुबोध असमिया भाषेत भाषांतरित अथवा रूपांतरित करण्यात आली. अरुणोदय या नावाचे संपूर्ण साहित्याला वाहिलेले मासिक त्यांनी १८४६ मध्ये सुरू केले असमिया भाषेचे व्याकरण व कोश तसेच असमिया भाषेतील क्रमिक पुस्तकेही प्रसिद्ध करण्यात आली.

असमिया भाषेला तिच्या हक्काचे न्याय्य स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नात मिशनऱ्यांना सुशिक्षित आसामी तरुणांची फार मदत झाली. अशा तरुणांमध्ये ⇨ आनंदराम ढेकिआल फूकन हे आघाडीवर होते. त्यांनी अनेक विचारप्रवर्तक लेख लिहिले अनेक लहानमोठी पुस्तके प्रसिद्ध केली आणि असमियाची पुन:प्रतिष्ठापना करण्यासाठी सरकारला अनेक निवेदने सादर केली.आनंदराम ढेकिआल फूकन नंतर ⇨ हेमचंद्र बरुआ व ⇨गुणाभिराम बरुआ यांच्या प्रयत्नांचा उल्लेख अवश्य करावा लागेल. हेमचंद्र बरुआंनी शास्त्रीय तत्त्वांवर आधारलेला असमिया शब्दकोश तयार केला असून तो प्रमाणभूत मानला जातो. असमिया भाषेत सामाजिक विडंबनात्मक लेखन करणारे बरुआ हे पहिले लेखक होत. त्यांच्या अन्य लेखनात शालेय क्रमिक पुस्तके व व्याकरणग्रंथ यांचा समावेश होतो. गुणाभिराम बरुआंनी प्रवासवर्णने आणि सामाजिक नाटके लिहिली साहित्यास वाहिलेल्या एका मासिकाचे संपादन केले आणि आसामचा प्रमाणभूत इतिहासही लिहिला. अशा प्रकारे मिशनरी आणि आसाममधील सुशिक्षित तरुणमंडळी यांच्या अविरत प्रयत्नांना यश येऊन १८७३ मध्ये बंगाली भाषेची जागा संपूर्णपणे असमिया भाषेने घेतली. १८४० ते ८० हा काळ असमिया साहित्यातील मिशनरी साहित्याचा काळ म्हणावयास हरकत नाही. कारण या काळात इतरांपेक्षा मिशनऱ्यांनी असमिया भाषा व साहित्य यांची अधिक सेवा केली.


कलकत्ता येथे १८८० ते १८९० च्या दरम्यान शिक्षण घेणाऱ्या आसामी विद्यार्थ्यांनी असमिया साहित्याच्या अभ्युदयासाठी एक मंडळ स्थापन केले. त्यामुळे कलकत्त्यात राहणाऱ्या बुद्धिवादी असमिया समाजाला व विद्यार्थ्यांना साहित्यचर्चेसाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. मंडळातर्फे १८९० मध्ये जोनाकी नावाचे सर्वस्वी साहित्यास वाहिलेले मासिक सुरू करण्यात आले. त्यामुळे असमिया साहित्यात स्वच्छंदतावादी विचारप्रणाली प्रथमच मूळ धरू लागली. साहित्यातील विविध क्षेत्रांत चमकणाऱ्या लेखकांचा एक प्रभावी गट जोनाकीमुळे तयार झाला. त्यातील प्रमुख म्हणजे ⇨लक्ष्मीनाथ बेझबरुआ, ⇨चंद्रकुमार आगरवाला, ⇨हेमचंद्र गोस्वामी, ⇨पद्मनाथ गोहाइन-बरुआ, ⇨बेणुधर राजखोवा, ⇨रजनिकांत बर्दोलोई व कमलाकांत भट्टाचार्य हे होत. लक्ष्मीनाथ व पद्मनाथ हे अष्टपैलू लेखक होते. निरनिराळ्या साहित्यप्रकारांत त्यांनी मोलाची भर घातली. त्यामुळे आधुनिक असमिया साहित्याला चांगली प्रतिष्ठा प्राप्त झाली. चंद्रकुमार व हेमचंद्र हे प्रतिभासंपन्न कवी असून त्यांनी इंग्रजी स्वच्छंदतावादी कवींपासून स्फूर्ती घेतली. हेमचंद्रांनी असमिया भाषेत सुनीतरचनेचा प्रथमच प्रयोग केला. नंतर मात्र ते पुरातन वस्तूंच्या संशोधनाकडे वळले आणि त्यात त्यांनी मोलाची भर घातली. रजनिकांतांनी मुख्यत्वे कादंबरीलेखनावर भर दिला. त्यांनी ऐतिहासिक कादंबऱ्यांची एक मालिका लिहिली. मालिकेतील पहिली ऐतिहासिक कादंबरी मोनोमती (१९००) ही आहे. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या मालिकेतून दोनशे वर्षांपूर्वीच्या आसाममधील जीवनाचे व समाजाचे यथार्थ दर्शन घडते. बेझबरुआंच्या ललित निबंधांनी उपहास व विनोद यांद्वारे व्यक्तींतील व समाजातील दोषांकडे लोकांचे लक्ष वेधविले. त्यांचे हे निबंध संग्रहरूपाने प्रसिद्ध झालेले आहेत.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस साहित्यिकांची दुसरी एक पिढी पुढे आली. या पिढीतील साहित्यिक प्रामुख्याने कवी व नाटककार आहेत. नवीन प्रेरणांचा आणि तंत्राचा अवलंब करून त्यांनी आपल्या साहित्यातून जीवनदर्शन घडविले. कवींमध्ये ⇨ हितेश्वर बरबरुआ, ⇨ रघुनाथ चौधरी, ⇨ जतींद्रनाख दुआरा व ⇨ अंबिकागिरी रायचौधरी हे प्रमुख होत. नाटककार म्हणून ⇨ चंद्रधर बरुआ, ⇨दुर्गेश्वर सर्मा व मित्रदेव महंत हे प्रसिद्ध आहेत. रघुनाथ चौधरी हे वर्ड्‌स्वर्थप्रमाणे निसर्गकवी होते. हितेश्वर बरबरुआ हे सुनीत आणि कथाकाव्य लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. इतिहास व पुराणांवर आधारलेली त्यांची कथाकाव्ये श्रेष्ठ दर्जाची आहेत. जतींद्रनाथ दुआरा हे उत्कृष्ट भावकवी म्हणून प्रसिद्ध असून त्यांचे भावकाव्य करुणमधुर आहे. अंबिकागिरींच्या काव्यात देशभक्ती व सामाजिक संघर्ष यांचा आविष्कार आढळतो. चंद्रधर बरुआ, दुर्गेश्वर सर्मा आणि मित्रदेव महंत यांनी पौराणिक नाटके लोकप्रिय केली. नाट्यगुण व काव्यगुण यांचा या नाटकांत मनोज्ञ संगम झाला आहे. ह्या नाटककारांनी अभिव्यक्तीचे प्रमुख माध्यम म्हणून निर्यमक कवितेचा सर्रास वापर केलेला आहे. पौराणिक नाटकांसोबतच हलक्याफुलक्या सुखात्मिका आणि प्रहसननेही या काळात लिहिण्यात आली.

राष्ट्रीय पुनरुत्थानाचा कालखंड : राष्ट्राचे नेते म्हणून महात्मा गांधी आणि प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणूव काँग्रेस पुढे आल्यापासून असमिया साहित्यात एक नवीन युग सुरू झाले. १९२० नंतरच्या साहित्यात प्रेम, सौंदर्य आणि निसर्ग या विषयांसोबतच देशभक्ती, राष्ट्रजागृती आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाची तळमळ हे विषय प्रकर्षाने आढळतात. बिनंदचंद्र बरुआ, ⇨ डिंबेश्वर नेओग, ⇨अतुलचंद्र हाझरिका, आनंदचंद्र बरुआ, गणेशचंद्र गोगोई व देवकांत बरुआ यांसारख्या अनेक कवींनी प्रेम, सौंदर्य व निसर्ग यांवर काव्यरचना केली.  त्याचप्रमाणे देशाचा तेजस्वी भूतकाळ, तत्कालीन अनुकंपनीय स्थिती आणि उज्ज्वल भवितव्याची आशा यांचेही वर्णन आपल्या काव्यात केले. ह्या सर्वच कवींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्वच्छंदतावादी असल्याचे दिसून येते. विसांहून अधिक नाटके लिहिणारे अतुलचंद्र हाझरिका हे नाटककार म्हणून प्रसिद्ध असले, तरी त्यांच्या बहुतांश नाटकांतून अकिनाट्याची लक्षणे आढळतात. या काळातील इतर उल्लेखनीय नाटककार म्हणजे ⇨दैवचंद्र तालुकदार, नकुलचंद्र भूयन, कमलानंद भट्टाचार्य व ⇨ज्योतिप्रसाद आगरवाला हे होत. ज्योतिप्रसाद आगरवाला यांनी आधुनिक तंत्रांचा अवलंब करून नाट्यलेखनात क्रांती घडवून आणली. शोनित-कुवारी, कारेंगर लिगिरी (राजदासी) आणि रूपालिम ही त्यांची तीन नाटके कलादृष्ट्या उत्कृष्ट मानली जातात.

कादंबरीक्षेत्रात ह्या काळात विशेष उल्लेखनीय निर्मिती झाली नाही. त्यातल्या त्यात रजनिकांत बर्दोलोई, दैबचंद्र तालुकदार आणि ⇨ दंडिनाथ कलिता यांची नावे या काळातील आघाडीचे कांदबरीकार म्हणून घ्यावयास हवीत. तत्कालीन सामाजिक स्थिती आणि व्यक्तिव्यक्तींतील प्रेम, द्वेष, असूया इत्यादींचे चित्रण त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून केले. कादंबऱ्यांद्वारे सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या हव्यासामुळे त्यांच्या लेखनाला उच्च कलात्मक मूल्य प्राप्त होऊ शकले नाही. लघुकथा, ललितनिबंध, विनोदी व उपरोध-उपहासात्मक लेखन, साहित्यसमीक्षा इत्यादींकडेही लेखकांचे लक्ष होते. तथापि लघुकथा सोडल्यास इतर साहित्यप्रकारांत विशेष उल्लेखनीय असे लेखन आढळत नाही.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इ.) शिरोडकर, द.स. (म.)

स्वातंत्र्योत्तर कालखंड : स्वातंत्र्योत्तर काळात असमिया साहित्याचा विकास फार झपाट्याने झाला. नव्या विचारांचे प्रयोगशील कवी, नाटककार व कादंबरीकार पुढे आले. महायुद्धापूर्वीच्या स्वच्छंदतावादी प्रणालीची जागा आधुनिक वास्तववादी तंत्राने व नवनवीन प्रयोगांनी घेतली. साहित्यिकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ह्या काळात सर्वस्वी बदलला. या काळातील असमिया काव्य भावनेपेक्षा बुद्धीस अधिक जवळचे आहे. तसेच ते वास्तववादीही आहे. जुन्या वृत्त-छंदोबद्ध रचनेची जागा लयबद्ध रचनेने आणि मुक्तच्छंदाने घेतली. आशय आणि तो अभिव्यक्त करण्याची पद्धती या दोन्ही बाबतींत असमिया नवकाव्याने क्रांती घडवून आणली. फ्रॉइडप्रणीत मनोविश्लेषण आणि मार्क्सवादी दृष्टिकोन हे स्वातंत्र्योत्तर काळातील साहित्याचे विशेष मानावे लागतील.

नव्या प्रकारच्या प्रतीकात्मक काव्याचा प्रयोग करण्यात ⇨हेमकांत बरुआ यांना अग्रस्थान द्यावे लागेल. बरुआ यांची प्रतिमासृष्टी आणि अभिव्यक्तीचे तंत्र असाधारण आहे. नवकांत बरुआ (१९२६– ) हेही प्रयोगशील व आघाडीचे कवी आहेत. हरी बरकाकती (१९२७–   ), सैयद अब्दुल मलीक, होमेन बरगोहाइन, महेंद्र बोरा, दिनेश गोस्वामी, नीलमणी फूकन (धाकटा), केशव महंत, बीरेश्वर बरुआ, महीम बोरा हे सध्याचे आघाडीचे कवी होत. नवकाव्याच्या विकासास रामधेनू (१९५१) या मासिकाने तर फार मोठा हातभार लावला.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्वलंत व क्रांतिकारक देशभक्तीने भरलेली नाटके अवतरली. त्यांत चंद्रकांत फूकन, सुरेंद्रनाथ सैकिया, सरदकांत बर्दोलोई आणि प्रवीण फूकन या नाटककारांचा उल्लेख अवश्य करावा लागेल. कमलानंद भट्टाचार्य आणि ज्योतिप्रसाद आगरवाला यांची नाटके स्वप्नरंजनात्मक आहेत. नाटक आणि रंगभूमी ह्या क्षेत्रांत ज्योतिप्रसादांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या नाटकांवर आणि तंत्रावर पाश्चात्त्यांची छाप पडलेली आहे.

 


कथा-कादंबरीच्या क्षेत्रांत स्वप्नरंजनाची जागा वास्तववादाने आणि मनोविश्लेषणाने घेतल्याचे दिसते. उपेक्षित वर्गाकडे लेखकांचे लक्ष वेधले तसेच सामाजिक दृष्टिकोनातून त्याचे मूल्यमापनही होऊ लागले. आसामच्या ग्रामीण जीवनावरील सुरुवातीची अत्यंत गाजलेली वास्तववादी कादंबरी म्हणून बीना बरुआ यांच्या जीवनर बाटतचा (१९४५) उल्लेख केला पाहिजे. तसेच हितेश डेका यांची आजीर मानुह (१९५२) आद्यनाथ सर्मा यांची जीवनर तीनि अध्याय  चंद्रकांत गोगाई यांची सोणार नांगल गोविंद महंत यांची कृषकर नाति ह्या उल्लेखनीय कादंबऱ्या होत. दावर आरु नाइ (१९५५) ह्या कांदबरीत जोगेश दास यांनी दुसऱ्या महायुद्धामुळे नैतिक आणि सामाजिक कल्पनांची कशी उलथापालथ झाली, याचे कलात्मक चित्रण केलेले आहे. बीरेंद्रकुमार भट्टाचार्य, प्रफुल्लदत्त गोस्वामी व राधिकामोहन गोस्वामी यांनी मनोविश्लेषणात्मक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. असमिया लघुकथा पाश्चात्त्य कथासाहित्याच्या प्रभावाने विकसित झाली. लघुकथेला उच्च कलात्मकता प्राप्त करून देण्याचे श्रेय लक्ष्मीकांत बेझबरुआ यांच्याकडे जाते. साधुकथार कुकि, जोनबिरी व सुरभि ह्या तीन संग्रहांत त्यांच्या लघुकथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांच्या कथांत जीवनाच्या विविध अंगांचे चित्रण आढळते. सखोल पण तरल अनुभव आणि मनात क्षणिक उठलेले विचारतरंग यांचे दर्शन त्यांच्या कथांतून घडते. शरच्चंद्र गोस्वामी यांच्या कथांत प्रादेशिक जीवनाचे वास्तववादी चित्रण आढळते. नगेंद्र नारायण चौधरी आणि ⇨त्रैलोक्यनाथ गोस्वामी यांच्या कथांतून सखोल सामाजिक जाणीव व्यक्त होते. गोस्वामी यांचे अरुणामरीचिका हे संग्रह या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहेत. महीम बोरा आणि लक्ष्मीनाथ फूकन यांच्या कथा त्यांतील विनोदासाठी प्रसिद्ध आहेत. हलीराम डेका यांच्या कथांमधील औपरोधिक दृष्टिकोन वैशिष्ट्यपूर्ण आहे. लक्ष्मीकांत सर्मा यांनी आपल्या कथांत अत्याधुनिक तंत्राचा वापर केलेला असून त्यांत स्त्रियांच्या प्रेमभावनांचे चित्रण आढळते. त्यांचे अनुकरणही अनेकांनी केले. त्यांत बीना बरुआ आणि राम दास यांच्या नावांचा उल्लेख आवश्यक आहे. दीनानाथ सर्मा यांचे दुलाल (१९५२), कल्पना आरू वास्तव (१९५५), अकलशरीआ इ. कथासंग्रह विशेष प्रसिद्ध असून त्यांत स्त्रियांच्या विकृत, व्यभिचारी जीवनाचे चित्रण आढळते. स्वातंत्र्योत्तर काळातील असमिया साहित्यात इतर साहित्यप्रकारांच्या तुलनेने लघुकथेचे क्षेत्र विशेष विकसित व समृद्ध झाल्याचे दिसते.

ललित निबंधांची सुरुवात लक्ष्मीनाथ बेझबरूआ यांनी केली. त्यांनी ललित निबंधाचा एक नवीनच प्रकार सुरू करून तो लोकप्रिय केला. रंजकता हा त्यातील प्रमुख गुण. त्यांच्या निबंधाची तुलना काही अंशी चेस्टर्‌टन यांच्या निबंधांशी करता येईल. साधा विषय निवडून मनोरंजक व विनोदी पद्धतीने त्यावर ते नवा प्रकाश पाडतात. बरबरुअर भावर बुरबुरणि या नावाने लिहिलेल्या मालेतील त्यांचे निबंध फार प्रसिद्ध आहेत. त्यांत समाजातील रूढी, सामाजिक समस्या व माणसाचा पोकळ डौल यांचे प्रत्ययकारक दर्शन त्यांनी घडविले आहे. सत्यनाथ बोरा यांनीही याच पद्धतीचे समाजचित्रणात्मक निबंध लिहिलेले असून ते केंद्रसभा नावाने प्रसिद्ध झाले. पुढे त्यांच्या निबंधांनी ललित स्वरूप सोडले आणि ते वैचारिक बनले. सारथी आणि चिंताकली यांतील त्यांचे वैचारिक निबंध विचारांना चालना देणारे आहेत. त्यांच्या वैचारिक निबंधांमुळे असमिया भाषेला व गद्याला प्रगल्भता प्राप्त झाली. ⇨बाणीकांत काकती यांच्याही प्रगल्भ व डौलदार निबंधांनी असमिया गद्य समृद्ध केले.

टीकासाहित्य, ऐतिहासिक साहित्य, तात्त्विक आणि वैज्ञानिक साहित्य, तसेच चरित्रपर आणि इतर प्रकारचे साहित्य अशा चार प्रकारांत असमियातील वैचारिक साहित्य आढळून येते.

टीकासाहित्य : अमेरिकन बॅप्सिस्ट मिशन स्थापन झाल्यापासून तो आजपर्यंत असमिया भाषेतील अनेक प्राचीन हस्तलिखिते संशोधून ती ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्यात आली. ह्या प्राचीन साहित्याचा केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच अभ्यास झाला असे नाही तर सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि वाङ्मयीन दृष्टिकोनांतून त्याचे मूल्यमापन करण्याची परंपराही निर्माण होऊन ती जोपासली गेली. सध्याच्या वाङ्मयीन टीकेत सौंदर्यशास्त्रीय टीका आणि सामाजिक–विशेषत: मार्क्सवादी–टीका हे दोन ठळक प्रवाह आढळतात. डॉ. बाणीकांत काकती हे काटेकोरपणे वाङ्मयीन टीकेची तत्त्वे अनुसरून साहित्याचे अनुशीलन करणाऱ्यात अग्रगण्य होत. त्यांनी सौंदर्यशास्त्रीय टीका लोकप्रिय केली. त्यांनीच असमिया साहित्यात शास्त्रशुद्ध टीकालेखनाचा पाया घातला. डॉ. काकतींचे उल्लेखनीय टीकाग्रंथ म्हणजे पुरानी असमिया साहित्य (१९४०) आणि पुरानी कामरूपर धर्मर धारा (१९५५) हे होत. कृष्णकांत हँडिक्यू हे संस्कृतचे मोठे अभ्यासक असून त्यांचे ‘अनुबदार कथा’, ‘स्पॅनिश साहित्यात रोमिओज्यूलिएट’, ‘जर्मन साहित्यत सपोन नाटक’, ‘ग्रीक नाटकर गान’, ‘सॉक्रोटिसर मते कविर प्रकृती’ इ. लेख विशेष गाजले.

ज्योतिप्रसाद आगरवाला हे ललित लेखक असले, तरी त्यांनी टीकालेखनही केलेले आहे. अत्यंत कल्पक टीकेचा नमुना म्हणून रत्नबर काकती यांच्या ‘दालिनी’ आणि ‘जिनू’ यांवरील निबंधांचा उल्लेख करावयास हवा. डिंबेश्वर नेओग हे ख्यातनाम साहित्येतिहासकार आहेत. त्यांचे महत्त्वाचे साहित्येतिहास-ग्रंथ म्हणजे आधुनिक असमिया साहित्यर बुरंजी (१९३७), असमिया साहित्यर बुरंजित भूमुकी (१९४५). असमिया साहित्यर बुरंजी (१९५७) हे होत. साहित्येतिहासांशिवाय त्यांचे इतर उल्लेखनीय ग्रंथ वैष्णव धर्मर अतिगुरी (१९४०), वैष्णव धर्मर क्रमविकास (१९४३), प्राग-ऐतिहासिक असोम (१९४९) हे होत. त्यांची शैली वस्तुनिष्ठ व लवचिक आहे. ⇨बिरिंचीकुमार बरुआ (१९१०–१९६४) हे उत्कृष्ट टीकाकार व कादंबरीकार. त्यांचा काव्य आरु अभिव्यंजना (१९४१) हा काव्यशास्त्रावरील ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. लक्ष्मीनारायण ‘सुधांशु’ याच्या काव्य में अभिव्यंजनावाद (१९३८) ह्या हिंदी आणि बेनीदेत्तो क्रोचे यांच्या एस्थेटिक्स ह्या ग्रंथांवर तो आधारित आहे. बरुआ यांचे इतर उल्लेखनीय ग्रंथ म्हणजे असमिया कथा साहित्य (१९५०), असमिया भासा आरु संस्कृती (१९५७) आणि लोक संस्कृती (१९६१) हे होत. मनोरंजन शास्त्री यांचा साहित्य दर्शन (१९६१) आणि त्रैलोक्यनाथ गोस्वामी यांचा साहित्य आरु समालोचना (१९५०) हे आणखी दोन उल्लेखनीय टीकाग्रंथ आहेत. डॉ. प्रफुल्लदत्त गोस्वामी हे दर्जेदार लेखनासाठी प्रसिद्ध असून त्यांनी साहित्य आरु जीवन(१९५५) आणि असमिया जन साहित्य (१९४३) हे महत्त्वाचे ग्रंथ लिहिलेले आहेत. डॉ. महेश्वर बेओग, डॉ. सत्येंद्रनाथ सर्मा आणि भावनानंद दत्त इ. टीकाकारही उल्लेखनीय आहेत.

महेंद्र बोरा यांचा असमिया कवितार छंद (१९६२) हा असमिया छंदशास्त्रावरील पहिला ग्रंथ होय. त्यात बोरा यांच्या स्वतंत्र दृष्टीचा आणि विवरणशक्तीचा प्रत्यय येतो. नाटक आरु अभिनय प्रसंग (१९६२) हा सत्यप्रसाद बरुआ यांचा अभिनयकला आणि नाट्यशास्त्र यांवरील महत्त्वाचा ग्रंथ होय. यांव्यतिरिक्त अनेक टीकाकारांनी असमिया टीकासाहित्यात कमीअधिक मोलाची भर घातलेली आहे. कलकत्ता येथील ‘आसामीज स्टूडन्ट्स लिटररी क्लब’ तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या असमिया साहित्यविषयक दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचा उल्लेख आवश्यक आहे. त्यांची नावे गिरीशचंद्र चौधरीकृत चिंताकोश (१९३६) आणि महेशचंद्र देव गोस्वामीकृत साहित्य आरु समालोचना (१९४१) ही आहेत. तसेच चित्र भागवत (१९४९) हा हरि नारायण दत्त-बरुआ यांनी प्रकाशित केलेला ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त आहे.

ऐतिहासिक साहित्य : आहोम राजांचा कालखंड आणि गद्य बुरंजी यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधणे स्वाभाविक होते. ह्या इतिहासकारांमध्ये डॉ. ⇨सूर्यकुमार भूयन (१८९४–१९६४) यांचे इतिहासविषयक लेखन विशेष महत्त्वाचे आहे. त्यांत आहोमोर दिन (१९१८), कोंवर विद्रोह (१९४८), बुरंजिरबानी आण‍ि ‍ मिरजुमलर असोम आक्रमण (१९५६) ह्या ग्रंथांचा अंतर्भाव होतो. ⇨बेणुधर सर्मा यांनी आपल्या संशोधनाद्वारे अनेक ऐतिहासिक घटना प्रकाशात आणल्या. त्यांचे देशद्रोही कोन, पूर्णानंद ने बदन, मणिराम दिवान (१९५०) हे ग्रंथ माहितीच्या दृष्टीने उपयुक्त असले, तरी त्यांतील ऐतिहासिक उपपत्ती आणि भाष्य सदोष आहे. सर्वानंद राजकुमार, डॉ. प्रतापचंद्र चौधुरी आणि लीला गोगोई यांचे इतिहासविषयक लेखन उल्लेखनीय आहे. डॉ. चौधुरी यांच्या लेखनात चिकित्सक दृष्टी आणि इतिहासाच्या सामर्थ्याची जाण दिसून येते. गोगोई यांचे आहोम कालखंडावरील आणि बुरंजीविषयक इतिहासग्रंथ महत्त्वाचे आहेत.


सध्याच्या इतिहासलेखकांत राजमोहन नाथ, डिंबेश्वर नेओग, डॉ. बिरिंचीकुमार बरुआ, प्रेमधर चौधुरी, पद्मेश्वर गोगोंई, केशवनारायण दत्त, भुवनचंद्र हँडिक्यू, रजनीकांत देब-सर्मा आणि डॉ. लक्ष्मी देवी यांचा समावेश होतो.

तात्त्विक आणि वैज्ञानिक साहित्य : तात्त्विक विषयांवर असमिया भाषेत उल्लेखनीय लेखन करणाऱ्या व्यक्तींमध्ये राधा फूकन (१८७५–१९६४) यांची गणना होते. फूकन यांच्या तत्त्वमीमांसेत गणिती काटेकोरपणा व निश्चित युक्तिवाद असून त्यांचा तात्त्विक दृष्टिकोन चिद्‌वादी आहे. त्यांनी लिहिलेले महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे सांख्य दर्शन (१९४९), वेदान्त दर्शन (१९५१),कथारे उपनिषद (१९५४) आणि जन्मांतर रहस्य (१९५७) हे होत. दुसरे पंडित म्हणजे मनोरंजन शास्त्री हे होत. त्यांनी लिहिलेला असोम वैष्णव दर्शनर रूपरेखा (१९५४) हा वैष्णवपंथीय नीतिशास्त्रावरील ग्रंथ अत्यंत व्यासंगपूर्ण असा आहे. सरत गोस्वामी हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून त्यांनी तत्त्वज्ञान या विषयास वाहिलेली नियतकालिके असमिया भाषेत प्रथमच सुरू केली. मौलाना तय्यबल्ला यांनी उनमुल कुराण (१९५९) या ग्रंथात धर्मनीतिविषयक विवेचन केले आहे. अलिमुन्निसा पिअर यांचा पोहरर पोथ (१९६३) हा धर्मतत्त्वज्ञानपर ग्रंथही उल्लेखनीय आहे.

फ्रॉइड, युंग आणि ॲड्‌लर यांच्या प्रभावाने मनोविश्लेषणावर असमियात काही लेखन झाले. डॉ. हरिनाथ सर्मा-बर्दोलोई यांच्या विविध नियतकालिकांतील मनोविश्लेषणविषयक लेखांत विषयाचे सखोल आकलन दिसून येते. नीलिमा दत्त (शिशु-विकास, १९५५), आनंदी कोंवर (शिशु-मनोविज्ञान, १९४९) आणि लक्ष्याहिर दास यांनी बालमानसशास्त्रावर चांगली पुस्तके लिहिलेली आहेत. विज्ञानाचे अध्ययन-अध्यापन वाढत असले, तरी असमिया भाषेत त्यावर फारशी ग्रंथनिर्मिती झालेली नाही. विज्ञानास वाहिलेली काही मोजकी नियतकालिके अलीकडे निघू लागली आहेत.

चरित्रपर आणि इतर साहित्य : आधुनिक असमियातील चरित्रपर साहित्य हे प्राचीन ‘चरितपुथी’ हून सर्वस्वी भिन्न आहे. आधुनिक चरित्रांत चिकित्सक मूल्यमापनाचा दृष्टिकोन आढळतो. यांतील महत्त्वाची चरित्रे पुढीलप्रमाणे आहेत : डॉ. सूर्यकुमार भूयन–गोपाळ कृष्ण गोखले (१९१६) आणि आनंदराम बरुआ (१९२०), पद्मनाथ गोहाइन-बरुआ–जीवनी संग्रह (१९१५),महादेव सर्मा–बुद्धदेव (१९१४) आणि महंमद चरित (१९२८), सर्बेश्वर सर्मा कातकी–सत्यनाथ बोरार जीवन चरित (१९१७), हरेन सर्मा–जोन द आर्क (१९१८) आणि कमाल पाशा (१९३१), अतुल-बरुआ–सरत्चंद्र गोस्वामीर चमुजीवनी (१९२९), कमलेश्वर चालिहा–विश्वरसिक बेझबरुआ (१९३९), नलिनीबाला देवी–स्मृतितीर्थ (१९४८), आणि विश्वदीप (१९६१), डॉ. प्रफुल्लदत्त गोस्वामी–यूरोपर मानिसी पचगारकी आणि बिरेन बरकाकती–खोजते मिलाऊ खोज (१९५६).

डॉ. महेश्वर नेओग यांनी लिहिलेले श्री श्री शंकरदेव (१९४८) हे चरित्र शंकरदेव ह्या थोर संतकवीच्या नीतिविषयक व साहित्यविषयक विचारांचा विद्वत्तापूर्ण परिचय घडवून देणारे आहे. शंकरदेवाच्या कर्तृत्वाचे व व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन नेओग यांनी नव-अभिजाततावादी दृष्टिकोनातून केलेले आहे. काही आत्मचरित्रेही असमियात आढळतात. त्यांपैकी लक्ष्मीनाथ बेझबरुआ, पद्मनाथ गोहाइन-बरुआ, वेणुधर राजखोवा, ज्ञानदाभिराम बरुआ, नलिनीबाला देवी आणि पद्म चालिहा यांची आत्मचरित्रे उल्लेखनीय म्हणावी लागतील.

आसाम संगीत नाटक अकादमीने प्रसिद्ध केलेला स्वररेखन बरगीता (१९५९) हा महत्त्वाचा संशोधनपर ग्रंथ आणि गोलोकचंद्र खौंद यांचा बरगीता स्वरलिपी हे दोन ग्रंथ सोडले, तर असमियात ललितकलांसंबंधी फारशी ग्रंथनिर्मिती झाली नाही. भारतीय नृत्यकलेवर सुरेश गोस्वामी यांचा भारतीय नृत्यकला (१९६३) हा बऱ्यापैकी ग्रंथ आहे. तसेच डॉ. भूपेन हाझरिका यांनी विविध नियतकालिकांतून संगीतावर काही चांगले लेख लिहिलेले आहेत.

असमिया संस्कृतीच्या विविध अंगांचे विवेचन व मूल्यमापन करण्याचा प्रयत्न काही आधुनिक लेखकांनी केला आहे. त्यांत विश्वनारायण शास्त्री यांचा भारतीय साहित्य आरु संस्कृती हा ग्रंथ उत्कृष्ट आहे. तसेच डॉ. महेश्वर नेओग-पुरानी असेमिया समाज आरु संस्कृती (१९५७) ह्या ग्रंथात असमिया संस्कृतीच्या इतिहासावर चांगला प्रकाश पडलेला दिसतो. डॉ. बाणीकांत काकती–कलिता जतीर इतिवृत्त (१९४३), प्रफुल्लकुमार बरुआ–बुद्ध गोया किमन दुरात (१९६१), विजय भगवती–गांधीवाद (१९४८), लीला गोगोई–सीमांतर माती आरु मनुह (१९६३) हे या दृष्टीने महत्त्वाचे ग्रंथ होत. 

असमिया भाषेत कादंबरीच्या खालोखाल चटकदार प्रवासवर्णने लोकप्रिय असावीत असे दिसते. प्रवासवर्णनांंत ज्ञानदाभिराम बरुआ यांचे बिलातर चिठी (१९४८), डॉ. बिरिंचीकुमार बरुआ यांचे स्वित्झर्लंड भ्रमण (१९४८), डॉ. अमलेंदु गुहांचे सोव्हिएट देशत अभुमुकी (१९५८) ही प्रवासवर्णने चांगली आहेत. तसेच प्रफुल्लदत्त गोस्वामी, बडजेना, अब्दुम सतार, डॉ. ललित बरुआ, डॉ. प्रसन्न चंद्र गोस्वामी, कनक महंत, हरिनारायण दत्त-बरुआ आणि हेमंत सर्मा यांनी लिहिलेली प्रवासवर्णनेही उल्लेखनीय आहेत. 

सुर्वे, भा. ग.

संदर्भ : 1. Barua, Birinchi Kumar, History of Assamese Literature, New Delhi, 1984.

           2. Barua, Birinchi Kumar, Modern Assamese Literature, Gauhati, 1957.

           3. Barua, Hem, Assamese Literature, New Delhi, 1965.

           4. Bhuyan, Suryakumar, Studies in the Literature of Assam, Gauhati, 1956.

           5. KaKati, Banikanta, Aspects of Early Assamese Literature, Gauhati, 1953.  

           6. Neog, Dimbeswar, Modern Assamese Literature, Jorhat, 1955.

           ७. नेओग, महेश्वर, असमिया साहित्यर रूपरेषा, गोहाती, १९६२.

           ८. सर्मा, सत्येंद्रनाथ, असमिया साहित्यर इतिवृत्त, गोहाती, १९५९.