कलिता, दंडिनाथ : (१८९० — १९५५). असमिया कादंबरीकार व कवी. दरंग जिल्ह्यात एका गरीब कुटुंबात जन्म. व्यवसाय शिक्षकाचा. उषा मासिकाचे संपादक ⇨पद्मनाथ गोहाइन-बरुआ (१८७० — १९४६) यांचे त्यांना वाङ्‍मयीन मार्गदर्शन लाभले. समाजसुधारणेच्या प्रेरणेतून कलितांनी कादंबर्‍या लिहिल्या. त्यांपैकी फूल (१९०८), साधना (१९२९), आविष्कार (१९४८), गणविप्लव (१९४८), परिचय (१९५०) इ. उल्लेखनीय आहेत. आपल्या औपरोधिक काव्यातून त्यांनी समाजातील दिखाऊ नीतिमत्ता, दांभिकता आणि अंधश्रद्धा यांचा उपहास केला आहे. रहघरा (१९१६), रगर (१९२२), बहुरुपी (१९२५) आणि दीप्ति (१९२५) हे त्यांचे काव्यसंग्रह यादृष्टीने महत्त्वाचे होत. महाकाव्याच्या धर्तीवर रचलेल्या असम संध्या (१९४९) या काव्यात त्यांच्या प्रतिभेचे कथनकौशल्यादी अनेक गुण दिसून येतात. यांशिवाय त्यांनी सतीर तेज (१९३१) व अग्निपरीक्षा (१९३७) ही नाटकेही लिहिली आहेत.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)