बोरा, महीम : (६ जुलै १९२६ – ). आधुनिक असमिया लघुकथाकार, कादंबरीकार व कवी. जन्म नौगाँग जिल्ह्यातील हाटबर येथे. १९५२ मध्ये एम्.ए. झाले. १९४९-५० या काळात रोंगघर या बालमासिकाचे साहाय्यक संपादक म्हणून आणि १९५६ मध्ये अरुणाचल या नियतकालिकाचे सहसंपादक म्हणून त्यांनी काम केले. १९५०-५२ या कालावधीत आकाशवाणी गौहाती येथे ग्रामीण कार्यक्रमांच्या संचालनाचे काम त्यांच्याकडे होते. १९५३ मध्ये जोरहाट येथील जे. बी. कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. १९५४ पासून नौगाँग कॉलेजमध्ये असमिया विभागाचे प्रमुख या नात्याने ते काम करीत आहेत.

बोरा हे आसाममधील एक लोकप्रिय लघुकथालेखक आहेत. त्यांच्या प्रसिद्ध लघुकथासंग्रहापैकी कथनी बरिर घाट (१९६१-म. शी. अरण्यातील नदीकाठ) हा एक उत्कृष्ट कथासंग्रह आहे. प्रासादिक शैली, ग्रामीण पार्श्वभूमी आणि सर्वसामान्य माणसाच्या समस्यांची चांगली समज ही त्यांच्या कथालेखनाची वैशिष्ट्ये होत. दैनंदिन जीवनातील छोट्या घटनांमधून त्यांनी मानवी मनाच्या संघर्षाचे उत्कृष्ट चित्रण केले आहे. त्यांच्या सर्व यशस्वी कथा ग्रामीण जीवनावर आधारलेल्या आहेत. त्यांनी उपरोधपूर्ण कथाही लिहिल्या आहेत परंतु त्या मुख्यतः शोक आणि कारुण्य यांचेच दर्शन घडवितात.

बोरा यांनी काही कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. पुतला घर (१९७१- पुतळा घर) आणि हिरोवा दिगंतर माया (१९७३- हरवलेल्या क्षितिजाचा आभास) या त्यांच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या. शहरात जीवनाची सुरळित घडी बसलेल्या एका कुटुंबाला खेड्यात जाणे भाग पडल्यामुळे, त्या कुटुंबाच्या जीवनाची कशी वाताहत होते, याचे सुंदर चित्रण त्यांनी पुतला घरमध्ये केले आहे. अवघ्या एका दिवसाच्या कालावधीत घडलेल्या घटनांचे चित्रण या कादंबरीत आहे. हिरोवा दिगंतर माया या कादंबरीत त्यांनी नवीन शैलीचा अवलंब केला आहे. यातील प्रमुख व्यक्तिचित्रांचे गतजीवन पूर्वदीपन पद्धतीने त्यांनी रंगविले आहे. त्यांनी कथाकादंबऱ्यांव्यतिरिक्त समीक्षापर लेख (चिंता-बिचित्रा) व कविताही (रंगा-जिया) लिहिल्या आहेत. एक प्रभावी असमिया कथाकार म्हणूनच त्यांची प्रतिमा ठळकपणे नजरेत भरते.

गोस्वामी, इंदिरा (इं.) मिरजकर, ललिता (म.)