हेमसरस्वती : (अंदाजे तेराव्या शतकाचा उत्तरार्ध वा चौदाव्या शतकाचा प्रारंभ). असमिया साहित्यातील आद्य कवींपैकी एक. तेहरिवर विप्रा चे समकालीन असून कामरूपच्या दुर्लभनारायण राजाच्या दरबारात कवी होते. त्यांचे वडील रुद्र सरस्वती व वडीलबंधू ध्रुव सरस्वती हे विद्वान पंडित होते. प्रल्हादचरित्र व हरगौरीसंवाद या काव्यग्रंथांची रचना हेमसरस्वती यांनी केली. वामन पुराणा तील कथा-बीजाचे रूपांतर प्रल्हादचरित्र या ग्रंथात त्यांनी स्वतंत्रपणे केले आहे. अत्यंत साध्या छंदात त्यांनी प्रल्हाद कथेचे वर्णन सांगितले आहे. यातील भाषा आलंकारिक नसली आणि शब्दसौष्ठव विपुल प्रमाणात नसले, तरीहीहे काव्य भक्तिरसाने ओतप्रोत भरले आहे. आश्रयदाता राजा दुर्लभनारायण याची स्तुती या ग्रंथात हेमसरस्वती यांनी केलेली आहे. यातील श्लोकांतून कवीचे वैष्णवधर्माविषयीचे सखोल ज्ञान दिसून येते तथापि ते कट्टर वैष्णवधर्मी नव्हते. हरगौरीसंवाद हे काव्य एकूण ९०० श्लोकांचे आहे. त्यांचा हा ग्रंथ मोठा पांडित्यपूर्ण व अनेक काव्यगुणांनी मंडित असून त्यावर कालिदासाच्या कुमारसंभव या ग्रंथाचा प्रभाव जाणवतो, असे काही समीक्षक मानतात. पुराणग्रंथांतून व स्थानिक लोकसाहित्यातून निवडलेले विविध कथाविषय यात मांडलेले दिसतात आणि दुलारी वृत्त व छंदाचा त्यात प्रभावशाली वापर केला आहे. हे काव्य कवीचा शाक्त-शैव संप्रदायांकडे असलेला कल निर्दिष्ट करते. एकूण त्याची काव्यशैली पांडित्यप्रचुर आहे. हेमसरस्वतीने असमिया साहित्येतिहासाच्या युगाचा प्रारंभ केला. 

 

संदर्भ : 1. Barua, Birinchi Kumar, History of Assamese Literature, New Delhi, 1964.

            2. Barua, Hem, Assamese Literature, New Delhi, 1965. 

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) शिरोडकर, द. स. (म.)