रघुनाथ महंत : (अठरावे शतक). असमिया वैष्णव कवी व गद्यलेखक. रघुनाथ महंत हे अठराव्या शतकाच्या अखेरीस पूर्व आसाममधील एका वैष्णव मठाचे अधिपती होते. त्यांच्या घराण्यात वंशपरंपरेने हे मठाधिपतित्व चालत आले होते. त्यांचे वडील कृष्णनाथ व आजोबा हरिकृष्ण हे न्याय, व्याकरण आणि वैष्णवशास्त्रात पारंगत होते. पांडित्याचा हा वारसा रघुनाथ महंतांनीही जोपासल्याचे त्यांच्या ग्रंथांतून दिसून येते.

रघुनाथ महंतांचे आतापर्यंत जे तीन ग्रंथ उपलब्ध झाले आहेत, ते असे : शत्रुंजय आणि अद्‌भु रामायण हे दोन काव्यग्रंथ आणि कथा रामायण हा गद्यग्रंथ. प्रभू रामचंद्राचे गुणगान करण्यासाठी वैष्णव प्रेरणेतून हे तिन्ही ग्रंथ त्यांनी रचले. अद्‌भु रामायण हे आपले काव्य मार्कंडेय पुराणावर आधारित असल्याचे कवीनेच म्हटले आहे. शत्रुंजय ह्या काव्यात रामकथा तशी गौणच असून पुराणांच्या आधारे कवीचे रचलेली एक काल्पनिक कथा प्रधान आहे. राम हा विष्णूचा एक अवतार असल्याने रामकथेद्वारे वैष्णव मताचा व भक्तीचा पुरस्कार ह्या कृतींतून कवीने केला आहे.

कथा रामायण ही त्यांची प्रसन्न असमिया गद्यात रचलेली उत्कृष्ट व परिपक्व रचना मानली जाते. ⇨भट्टदेव (१५५८-१६३८) यांच्या कथा गीता ह्या असमिया गद्यात लिहिलेल्या ग्रंथाप्रमाणेच संस्कृत शैलीचा आणि भाषेचा प्रभाव या ग्रंथावरही पडलेला आहे. भट्टदेवांनी सुरू केलेली असमिया गद्याची परंपरा समृद्ध करण्यास कथा रामायणाचा हातभार लागला. ओथंबलेल्या भक्त्तिभावनेने आणि तळमळीने अत्यंत साध्या व प्रसन्न गद्य शैलीत त्यांनी हा ग्रंथ लिहिला.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) शिरोडकर, द. स. (म.)