अनिरुद्ध कायस्थ : प्राचीन असमिया साहित्यात या नावाचे दोन संतकवी होऊन गेले. (१) सोळाव्या शतकात होऊन गेलेला अनिरुद्ध कायस्थ पूर्वभागातील कोचवंशीय राजा रघुनारायण (कारकीर्द १५८०-१५९२) याचा मंत्री होता. आपल्या काव्यग्रंथांच्या शेवटी आपण रामचंद्राचा पुत्र व दामोदराचा नातू असल्याचे तो नमूद करतो. दामोदर हा ⇨माधवदेवां चा (१४९०-१५९६) वडील भाऊ होता. अनिरुद्धानेभागवतपुराणाच्या दुसऱ्या व पाचव्या स्कंधांचे असमियात भाषांतर केले आहे. (२) हा अनिरुद्ध कायस्थ कवी, वैष्णव संप्रदायातील ‘मायामरा’ नावाच्या शाखेचा प्रवर्तक असून त्याचा काल १५५३ ते १६२३ असा आहे. ही वैष्णवशाखा आसामच्या इतिहासात दोन कारणांमुळे विशेष प्रसिद्ध आहे : (१) अठराव्या शतकाच्या अखेरीस या शाखेने आहोम राजसत्तेविरूद्ध सशस्र उठाव करून काही काळ सत्ताही बळाकावली आणि (२) आसामच्या कानाकोपऱ्यांत तसेच डोंगराळ प्रदेशातही या शाखेच्या अनुयायांनी वैष्णव संप्रदायाचा प्रसार केला. अनिरुद्धाने सु. दोनशे भक्तिगीते रचली असून ती आजही त्याने स्थापिलेल्या वैष्णव मठांतून आवडीने गाइली जातात. याशिवाय त्याने भागवतपुराणाच्या चौथ्या व पाचव्या स्कंधांचे असमियात भाषांतरही केले आहे.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा.ग. (म.)