नेओग, डिंबेश्वर : (१९००–  ). आधुनिक असमिया कवी. सिबसागर जिल्ह्यातील एका खेड्यात त्यांचा जन्म झाला. शिक्षण सिबसागर आणि गौहाती येथे एम्‌.ए. पर्यंत झाले. मालिका ह्या १९२२ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या दीर्घकाव्यामुळे नेओग हे कवी म्हणून प्रथम प्रसिद्धीस आले. त्यानंतर थुपितरा (१९२५, म. शी. तारकासमूह), इंद्रधनु (१९३०), मुकुता (१९३२, म. शी. मोती), थापना (१९४८) हे त्यांचे विशेष उल्लेखनीय असे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. प्रेमकविता आणि देशभक्तिपर कविता असे त्यांच्या कवितेचे दोन मुख्य वर्ग पाडता येतील. यौवनसुलभ भावनांच्या आवेगाने भारलेल्या त्यांच्या प्रेमकवितेतून प्रेमाच्या विविध पैलूंचे दर्शन त्यांनी परिणामकारकपणे घडविले आहे. महात्मा गांधींनी पुकारलेल्या असहकारितेच्या चळवळीचा नेओग ह्यांच्या मनावर मोठा प्रभाव पडला. त्यातून त्यांना देशभक्तीची प्रेरणा लाभली. ‘बुरंजी लेखक’ (म. शी. इतिहासलेखक) आणि ‘शापमुक्ता’ह्या त्यांच्या काही महत्त्वाच्या देशभक्तिपर कविता होत.

नेओग ह्यांच्या गद्यलेखनात दीपावलि (१९३१) हा कथासंग्रह, आधुनिक असमिया साहित्यर बुरंजी (१९३७, म. शी. आधुनिक असमिया साहित्याचा इतिहास) आदि ग्रंथांचा समावेश होतो. साहित्यसेवेच्या प्रारंभकाळी त्यांच्यावर चंद्रकुमार आगरवाला (१८६७–१९३८) व लक्ष्मीनाथ बेझबरुआ (१८६८–१९३८) या साहित्यिकांच्या लेखनाचा पुष्कळच प्रभाव पडलेला दिसतो. असमिया साहित्येतिहासावर एक इंग्रजी ग्रंथही त्यांनी लिहिला असून त्यात १८२६ ते १९४७ पर्यंतच्या असमिया साहित्याचा परामर्श घेतलेला आहे. ह्याशिवाय असमिया भाषेतील प्रणयपर लोकगीते तसेच स्त्रीगीते आणि शिशुगीते त्यांनी संकलित करून प्रसिद्ध केलेली आहेत.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) कर्णे, निशा (म.)