रामसरस्वती : (सोळावे-सतरावे शतक). ‘असमिया व्यास’ म्हणून ओळखला जाणारा प्रख्यात असमिया कवी. कामरूप जिल्ह्यातील एका खेड्यात जन्म. त्याचे वडील भीमसेन कविचूडामणी हेदेखील प्रकांड पंडित होते. तरुण वयातच रामसरस्वतीची कोच वंशातील राजे नरनारायण (कार. १५३३ – ८४) यांनी आपल्या दरबारात राजपंडित म्हणून नेमणूक केली. रामसरस्वतीचे मूळ नाव अनिरुद्ध असे होते तथापि नंतर त्याच्या चाहत्यांनी व आश्रयदात्यांनी त्याला ‘रामसरस्वती’, ‘कविचंद्र’, ‘भारतभूषण’ इ. किताब बहाल करून त्याचा गौरव केला.

रामसरस्वतीने विपुल साहित्यनिर्मिती केली. कोच राजे नरनारायण तसेच त्यांच्यानंतर गादीवर आलेल्या राजांचा त्याला आश्रय लाभला. आपल्या समकालीन कवींच्या साहित्यिक चळवळीचे रामसरस्वतीने कुशल नेतृत्व केले. आपल्या आश्रयदात्यांच्या आज्ञेवरून त्याने महाभारताच्या बऱ्याच मोठ्या भागाचा असमियात वृत्तबद्ध अनुवाद केला. महाभारताच्या अनुवादाशिवाय त्याने ‘बधकाव्य’ म्हणून ओळखला जाणारा एक नवीन वीरकाव्यप्रकारही असमियात प्रचलित केला.

वैष्णव संप्रदायात भागवताखालोखाल महाभारतासही महत्त्व दिले जाते. महाभारताचा वैष्णव कवींवर खूपच प्रभाव पडलेला आहे. एकट्या रामसरस्वतीने महाभारत अनुवादाची सु. ३०,००० पद्ये रचली व इतर कवींनी फक्त सु. ३,००० पद्ये रचली असे दिसते. रामसरस्वतीने ‘आदि’, ‘वन’, ‘उद्योग’ व ‘कर्ण’ ह्या संपूर्ण पर्वांचा अनुवाद एकट्याने केला तर आपला मुलगा गोपीनाथ पाठक याच्या सहकार्याने ‘सभापर्व’ विद्यापंचानन याच्या सहकार्याने ‘भीष्मपर्व’ आणि गोपीनाथ व दामोदर यांच्या सहकार्याने ‘द्रोणपर्वा’चा अनुवाद केला. कंसारी कायस्थ (‘विराट’), दामोदर दास (‘शल्य’), जयनारायण (‘स्तुटि’ – ‘सोप्तिक’ ?), लक्ष्मीनाथ द्विज (‘शांति’), गंगादास, सुबुधिराय आणि भवानीदास (शेवटची ३ पर्वे ‘अश्वमेध पर्व’ या नावाने) हे मूळ महाभारताचा असमिया अनुवाद करणारे इतर कवी होत.

रामसरस्वतीचे महाभारत हे मूळ संस्कृत महाभारताचा शब्दशः अनुवाद नाही. आसाम प्रदेशाची भाषा, धर्म, परंपरा, तत्त्वज्ञान, कला, लोकाचार इ. असमिया संस्कृतीच्या विविध अंगोपांगांशी ह्या अनुवादाचे अतूट नाते आहे. त्यात कवीच्या स्वतंत्र प्रतिभेचे मनोहर दर्शन घडते. आसामच्या नव-वैष्णव चळवळीस रामसरस्वतीने आपल्या काव्यरचनेद्वारा नवे सौंदर्य व शक्ती प्राप्त करून दिली. त्याला आसाममध्ये अफाट लोकप्रियता लाभली. असमिया ‘वनपर्वा’त जे अनेक विभाग आहेत, त्यातच ‘कुलाचलबध’, ‘बघासुरबध’, ‘खतासुरबध’, ‘कूर्मवलिबध’, ‘अश्वकर्णबध’ इ. विभाग आहेत. या प्रत्येक भागाला ‘बधकाव्य’ म्हणतात. ते प्रदीर्घ असून त्याची कल्पना व मांडणी स्वतंत्र असते. धर्मज्ञान, अद्भुत कथा इ. तर त्यात असतातच पण सर्वसामान्य जनतेस सत्य, नीती व धर्मपरायणता यांचेही पाठ त्यात दिलेले असतात.

यांशिवाय त्याने जयदेवाच्या गीतगोविंदाचाही असमियात अनुवाद केला असून तोही शब्दशः नसून स्वतंत्रच आहे. त्याचे आणखी एक प्रख्यात काव्य भीमचरित हे असून त्यात पराक्रमी भीमाची वीरगाथा महाभारताच्या आदिपर्वाधारे वर्णिली आहे. आसामचा एक श्रेष्ठ व लोकप्रिय कवी म्हणून रामसरस्वतीचे स्थान चिरंतन महत्त्वाचे आहे.

सर्मा. सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)