छत्तीसगढी बोली: छत्तीसगढी ही पूर्वी वा पूर्व हिंदीची एक बोली असून ती अवधीला विशेष जवळची आहे. ती मध्य प्रदेशाच्या छत्तीसगढ भागात बोलली जात असून तिच्या उत्तरेला बघेली वा बाघेली, पूर्वेला ओडिया, दक्षिणेला तेलुगू आणि पश्चिमेला मराठी आहे. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे तिच्या भाषिकांची संख्या २९,६२,०३८ एवढी होती. याशिवाय तिचेच पोटभाग समजल्या जाणाऱ्या पंधरा उपबोली असून त्यांची नावे अशी : बैगानी, भुलिया, बिलासपुरी, बिंझवारी, देवार, धामडी, गौरिया, गौरो, कंकेरी, लारिया, नागवंशी, पंडो, पंकी, सतनामी व सुरगुजिया. या इतर उपबोलींच्या भाषिकांची संख्या २५—३० हजार आहे.

छत्तीसगढ या शब्दावरून ज्या प्रदेशात छत्तीस गढ आहेत किंवा होते तो प्रदेश असा अर्थ होत असला, तरी काही अभ्यासकांनी मात्र याची व्युत्पत्ती ‘चेदीश गढ’ अशी दिलेली आहे.

व्याकरण : छत्तीसगढीची ध्वनीव्यवस्था पूर्व हिंदीसारखीच आहे. व्याकरणाची काही वैशिष्ट्ये

पुढीलप्रमाणे :

नामे : लिंगे दोनच, पुल्लिंग व स्त्रीलिंग. अनेक वचनाचा प्रत्यय—मन—पण तो कित्येकदा वापरला जात नाही. सामान्यरूप होत नाही. शब्दयोगी अव्यय मूळ रूपालाच लागते. नाम निश्चित असेल, तर त्याला –हर हा प्रत्यय लागतो.

सर्वनामे : प्र. पु. मै. –हम (मन), द्वि. पु. तै—तुम (मन), तृ. पु. वो—वो (मन). ये—इन, येमन ‘हा—हे’, ते—तिन, तेमन ‘तो—ते’, जे-जेमन ‘जो—जे’, कोन—कोनमन ‘कोण’, का—काका ‘काय’ इत्यादी.

क्रियापदे : सकर्मक आणि अकर्मक क्रियापदांची रूपे भूतकाळातही कर्तृप्रधानच असतात. इतर क्रियापदे भारतीय आर्यभाषांपेक्षा फारशी वेगळी नाहीत.

उतारा : वो-कर बडे लइका हर खेत-मां रहिस. और जब वो-हर घर-के नजीक आये लगिस, बाजा-गाजा-के सबद सुनिस. और वो-हर अपन नोकरन-मां-के एक-ला बलाय के पुछिस के ये का होत-है. तब वो-हर वो-कर-से कहिस के तोर भाई आइस-है और तौर ददा-हर सुन्दर जेवनार रचे-है. काहे-बर के वो-ला छेम कुसल पाइस-है.

भाषांतर : त्याचा मोठा मुलगा शेतात होता आणि जेव्हा तो घराच्या जवळ यायला लागला, गाण्याबजावण्याचा आवाज ऐकला आणि त्याने आपल्या नोकरातल्या एकाला बोलावून विचारले की हे काय होते आहे ? तेव्हा त्याने त्याला सांगितले की तुझा भाऊ आला आहे आणि तुझ्या बापाने सुंदर जेवण बनवले आहे. कारण तो क्षेम कुशल मिळाला आहे.

साहित्य : छत्तीसगढीचे लोकसाहित्य अत्यंत समृद्ध आहे आणि आता तिच्यात विविध प्रकारचे लिखित साहित्यही निर्माण होऊ लागले आहे.

संदर्भ : 1. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. VI, Delhi, 1968.

. पंचदश लोकभाषा-निबंधावली, पाटणा, १९६०.

कालेलकर, ना. गो.