भोजपुरी साहित्य: भोजपुरी भाषा हिंदीची बोली भाषा असल्यामुळे जितक्या प्रचुर प्रमाणात मौखिक साहित्य उपलब्ध आहे, तितक्या प्रमाणात लिखित साहित्य भोजपुरीत आढळत नाही.

मौखिक साहित्य गद्य व पद्य दोन्ही प्रकारांत आढळते. लोककथा, दंतकथा या स्वरूपात गद्य आढळते, तर लोकगीत, लोकगाथा, कूटपदे, विनोदी गाणी या स्वरूपात पद्य साहित्य आढळते. ‘तिरिया चरि-तर’ सारख्या उपदेशात्मक कथा, ‘अनंत चतुर्दशी कथा’, ‘त्रिलोकीनायकी कथा’, ‘करवा-कथा’, ‘जिउतिया कथा’, यांसारख्या ‘व्रतकथा’ आढळतात. कौटुंबिक जीवनात घडणाऱ्या प्रेमकथाही सापडतात. ‘ढेला और पती’ सारख्या केवळ मनोरंजन करणाऱ्या कथाही विपुल प्रमाणात प्रचलित आहेत. ‘राजाके न्याय की कथा’, ‘जनता कष्ट कथा’, ‘बहुविवाह कथा’, ‘कन्याविक्रय कथा’ यांसारख्या जनतेच्या सुखदुःखाच्या कथा सांगितल्या जातात. ‘शिव दधीचि’, ‘सत्यहरिश्चंद्र’, ‘नल-दमयंती’, ‘सारंगा सदावृत’ सारख्या पौराणिक कथा, तर अमानुष व अस्वाभाविक घटनांचे वर्णन करून जनमानसाला रंजविणाऱ्या कथाही आढळतात. भोजपुरी बोलीभाषा असल्यामुळे व्यवहारात हरघडी वापरल्या जाणाऱ्या म्हणी व सुभाषिते यांचा मोठा खजिना या भाषेत उपलब्ध आहे.

भोजपुरीमध्ये लोकगाथांचा भरणा विपुल आहे. ‘कुसुमादेवी’, ‘भगवती देवी’, ‘लचिया’, ‘नथकवा बनजारा’, ‘भरथरी चरित्र’, ‘चनैनी’ इ. प्रेमकथात्मक गाथा आढळतात. ‘आल्हा’, ‘लोरिकायत’, ‘विजयमल’, ‘राजा दौलत’ इ. वीरकथात्मक गाथा प्रसिद्ध आहेत.

लोकगीतांचे फार मोठे भांडार भोजपुरीत आहे. जन्म, मुंज, लग्न इ. प्रसंगी गायिली जाणारी संस्कार गीते झूला, कजरी, फगुआ, चैता, होली, चैताल इ. प्रकारची ऋतुगीते नागपंचमी, छठी, गोधन, माता इत्यादींसंबंधी गायिली जाणारी गीते तसेच शृंगार, करुण, वीर, हास्य, शांत इ. रसांनी युक्त मौखिक गीते भरपूर आहेत. यांशिवाय वेगवेगळ्या जातींच्या खास संस्कारांचे व चालीरीतींचे वर्णन करणारी गीतेही आढळतात. उदा., हरिजन गीत, अहीर गीत, तेलीगीत इत्यादी. शिवाय पेरणी, मळणी इ. प्रसंगी गायिली जाणारी तसेच चरख्यावर व जात्यावर गायिली जाणारी, श्रम हलके करणारी गीतेही विपुल संख्येने आढळतात. याशिवाय लोकजीवानाला स्पर्श करणाऱ्या अनेक घटनांसंबंधीच्या गीतांचा संचय आढळतो. अलीकडे बोलीभाषेविषयी अस्मिता जागृत झाल्यामुळे भोजापुरीमध्ये लिखित साहित्यही जोमाने प्रकाशित होत आहे. अवधविहारी सुमन, राधिकादेवी श्रीवास्तव यांची नावे कथाक्षेत्रात महत्त्वाची आहेत. सुमन यांचा जेहलक सनदि नावाचा १० कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला आहे. भोजपुरि नावाच्याच नियतकालिकात कथा प्रकाशित होत असतात. कथासाहित्याच्या तुलनेने भोजपुरी नाट्यसाहित्य अधिक प्राचीन असून गीत, संगीत, नृत्य यांची त्रिवेणी धारा त्यात प्रवाहित झालेली आहे. पं. रविदत्त शुक्ल यांचे देवाक्षर चरितनामक लोकनाट्य १८८४ मध्ये प्रकाशित झाले. तसे हे नाटक खडीबोलीत आहे पण २-३ अंक भोजपुरीत आहेत. भिखारी ठाकूर यांचे ‘बिदेसिया’ भोजपुरीत अतिशय लोकप्रिय झालेले लोकनाट्य आहे. हिंदीचे मोठे लेखक राहुल सांकृत्यायन यांची काही नाटके भोजपुरी बोलीत प्रकाशित झालेली आहेत : नई की दुनिया, ढुनमुन नेता, मेहरारून के दुरदसा, जोंक, ई हमार लडाई, देश –रच्छक, जपनिया राछछ, जरमनवा के हार निहचय इ. गोरखनाथ चौबे यांचे उल्टा जमाना पं. रामविचार पांडेय यांचे कुंवरसिंह रामेश्वर सिंह काश्यप यांचे लोहासिंह इ. नाटके प्रसिद्ध आहेत.

भोजपुरीत लिखित काव्य खूप जुन्या काळापासून सापडते. ⇨गोरखनाथ व ⇨कबीर यांच्या पदांत भोजपुरी भाषेची वैशिष्ट्ये आढळतात. धरमदास (कबीरशिष्य), धरनीदास (यांचे दोन ग्रंथ-प्रेम-प्रगास आणि शब्द-प्रगास ), लक्ष्मी सखी वा बाबा लक्ष्मीदास (अमर-कहानी, अमर-बिलास, अमर-सीढी, अमर-फराश हे चार ग्रंथ प्रसिद्ध आहेत), शिवनारायण (दोहा-चौपाई छंदात जतसार, घाँटो ) हे कवी भोजपुरीत विख्यात आहेत. शिवाय औघडबाबा वा सरभंग संप्रदायाच्या अनेक संतांनी कविता भोजपुरीतच रचलेली आहे.

भोजपुरी बोलीत आधुनिक कविता प्रचुर प्रमाणात लिहिली जात आहे. बिसराम, रामकृष्ण वर्मा, तेग अली, पं. दूधनाथ उपाध्याय (संग्रह – भारती का गीत, गोविलाप छंदावली, भूकंप पचीसी ), रघुवीर नारायण (बटोहिया ), मनोरंजन प्रसाद सिनहा (फिरँगिया ), भोजपुरी रत्न रामविचार पांडेय (बिनिया-बिछिया ), श्यामविहारी तिवारी (देहाती-दुलकी ), चंचरीक (ग्राम-गीतांजलि ), रणधीरलाल श्रीवास्तव (बरबै शतक ), हृदयानंद तिवारी (क्रांतिदूत ), कृष्णदेवप्रसाद गौड ऊर्फ ‘बेढब बनारसी’ (भोजपुरीत अनेक व्यंगात्मक कविता), महेंद्रशास्त्री (आजकी आवाज ), राजबली तिवारी (राष्ट्रीय गीते ), प्रसिद्ध नारायणसिंह (बलिदानी बलिया ) श्यामसुंदर ओझा (भोजपुरी निसर्गकाव्याचे प्रणेते), शिवदत्त श्रीवास्तव ‘सुमित्र’ (गावगिरान ), मोहनलाल गुप्त (अनेक काव्यसंग्रह प्रकाशित), रमाकांत द्विवेदी, रामनाथ पाठक, प्रभुनाथ मिश्र, रामवचनलाल श्रीवास्तव, रामसिंह उदय, अनिरुद्ध, दिवाकर लाल ‘अंकुर’, भगवानसिंह, चंद्रशेखर मिश्र, चंद्रदेवसिंह ‘हृदय’, भुवनेश्वर प्रसाद, कमलाप्रसाद मिश्र इत्यादी अनेक कवी भोजपुरीचे आधुनिक काव्य समृद्ध करीत आहेत.

संदर्भ : १. उपाध्याय, कृष्णदेव, भोजपुरी लोकसाहित्य का अध्ययन, वाराणसी, १९६१.

२. उपाध्याय, कृष्णदेव, भोजपुरी साहित्य का इतिहास, वाराणसी, १९७२.

३. तिवारी, उदयनारायण, भोजपुरी भाषा और साहित्य, पाटणा, १९५४.

४. राहगीर, संपा. भोजपुरी के नये गीत और गीतकार, वाराणसी, १९६३.

५. सांकृत्यायन, राहुल उपाध्याय, बलदेव, संपा. हिंदी साहित्य का बृहत् इतिहास, षोडश भाग, हिंदी का लोकसाहित्य, वाराणसी, १९६०.

बांदिवडेकर, चंद्रकांत