‘फिराक’गोरखपुरी‘फिराक’ गोरखपुरी : (२८ ऑगस्ट १८९६ – ). भारतीय ज्ञानपीठपुरस्कार लाभलेले एक श्रेष्ठ उर्दू कवी. गोरखपूर (उ. प्र.) येथे जन्म. मूळ नाव रघुपतिसहाय व काव्यनाम ‘फिराक’ गोरखपुरी. काव्यनामानेच ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील गोरखप्रसाद ‘इबरत’ हेही कवीच होते. ते वकिली करीत. त्यांनी तज्ञ शिक्षक नेमून फिराक यांच्या शिक्षणाची घरीच व्यवस्था केली. त्यांपैकी एक शिक्षक फिराक यांना तुलसीदासांचे रामचरित मानस वाचून दाखवीत असत. बालपणीच्या अनेक स्मृती फिराक यांच्या ‘जुग्‍नू’, ‘हिंदोला’, ‘परछायियाँ ’ आणि ‘आधी रात’ यांसारख्या काव्यांत व्यक्त झाल्या आहेत. १९१३ मध्ये गोरखपूरच्या सरकारी ज्युबिली हायस्कूलमधून मॅट्रीक झाल्यावर त्यांनी अलाहाबादच्या म्यूर सेंट्रल कॉलेजमध्ये प्रवेश केला व बी.ए. झाले. त्यांच्या अभ्यासाचे विषय इंग्रजी साहित्य, इतिहास, पर्शियन, भाषा-साहित्य आणि तत्वज्ञान हे होते.

त्यांचे लग्‍न एका सर्वसामान्य मुलीशी १९१४ मध्ये झाले. या लग्‍नामुळे फिराक यांची जीवनविषयक सारी स्वप्‍ने भंग पावली. त्यातच त्यांना एका ‘प्रेमभंगा’च्या आघातालाही तोंड द्यावे लागले. दीर्घ आजारानंतर वडिलांचा मृत्यू झाला. आर्थिक परिस्थिती तर कमालीची ओढगस्तीची होती. या साऱ्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि काव्यावर खोलवर परिणाम झाला. बी.ए. झाल्यावर चालून आलेली उपजिल्हाधिकाऱ्याची नोकरी लाथाडून त्यांनी राष्ट्रीय चळवळीत उडी घेतली. १९२० च्या सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना आग्रा तुरुंगात पाठविण्यात आले. या तुरुंगवासाच्या काळात निगार हे उर्दू मासिकपत्र त्यांच्या वाचनात आले आणि त्यामधील ‘फानी’ या कवीच्या काव्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे लखनौचा तुरूंगवासही त्यांना घडला (१९२१). पंडित नेहरूंच्या सूचनेनुसार फिराक यांनी अलाहाबादच्या अखिल भारतीय काँग्रेस समितीचे उपसचिव म्हणून काम केले (१९२३-२७). नंतर अलाहाबाद विद्यापीठात प्रदीर्घ काल ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. १९६० मध्ये ते या विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले.

इंग्रजीतील वर्ड्‌स्वर्थ आणि उर्दूतील मीर, मुसहफी व गालिब या स्वच्छंदतावादी कवींच्या प्रभावाखाली असतानाच १९१६ मध्ये फिराक यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. रूहे काईनात हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह (१९४५). गुले नग्‍मा (१९५९) या त्यांच्या गझल, रूबाया व इतर कवितांच्या संग्रहाला १९६० मध्ये साहित्य अकादेमीचा व १९६९ मध्ये भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कार प्राप्त झाला.

इंग्रजी व हिंदी साहित्याचा प्रगाढ व्यासंग आणि तल्लख कल्पनाशक्तीची अभिजात देणगी, यांमुळे फिराक यांनी प्रेम आणि जीवन यांसंबंधी एक नवी दृष्टी आपल्या काव्यातून प्रकट केली आहे. उर्दू कवितेच्या रूढ पारंपरिक कल्पना बदलून त्यांनी प्रेयसी ही प्रियकरासाठी झुरते आहे, रडते आहे आणि प्रियकर हा धीरोदात्तपणे, काहीसा ताठरपणे उभा आहे असे चित्रण केले. सौंदर्याकडे सौंदर्य म्हणून पहावे,‘मेहरबाँ ’ अगर ‘नामेहरबाँ ’ अशी उपाधी त्याच्या मागे लावू नये, असे त्यांनी म्हटले आहे. मशाल या आपल्या संग्रहाच्या प्रस्तावनेत त्यांनी काम, प्रेम व वैश्विक प्रश्न यांची चर्चा केली आहे. फारच थोड्या कवींना साधेल अशा निडरपणाने त्यांनी प्रेम आणि जीवन यांच्यातील संघर्षाचे व विसंगतीचे चित्रण केले. गुले नग्‍मा या संग्रहात जीवन हे आगही आहे आणि पाणीही आहे असे विरोधाभासात्मक विधान त्यांनी केले आहे तर क्रांती ही एकाच वेळी शीघ्रगती आणि मंदगती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या दृष्टीने या जीवनाची रचनाच अशी आहे, की स्वप्‍ने ही सत्य ठरावीत व सत्य हे स्वप्‍नवत्‌ ठरावे.

फिराक यांच्या काव्याचा आणखी एक विशेष असा, की ते भारतीय परंपरेच्या मनोभूमीत खोलवर रूजले आहे आणि त्याच भूमीचा रंगगंध घेऊन ते तरारले आहे. त्यांच्या रूप (१९५७) या रूबायासंग्रहात हा विशेष उत्कटतेने जाणवतो. याच संग्रहाच्या प्रस्तावनेत, उर्दू कवींनी संस्कृत आणि हिंदी काव्यातील प्रतिमांचा अभ्यास करण्याच्या व त्यांतून प्रेरणा घेण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला आहे. त्यांनी स्वतः या दिशेने जाणीवपूर्वक प्रयत्‍न केल्याचेही रूप संग्रहातील ‘शृंगार रसकी रुबाइयाँ ’ या रचनेवरून दिसून येते. शिवशंकराने केलेले तांडवनृत्य आणि विषप्राशन यासारख्या भारतीय पुराणकथेचे अनेक संदर्भ त्यांनी वापरले आहेत. ‘कोमलपदगामिनी’, ‘करुणरस’ असे संस्कृत शब्दही त्यांनी योजले आहेत. त्यांच्या एका अत्यंत गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या शेरात त्यांनी मानवी जीवन हे रामाच्या नशिबी आलेल्या वनवासासारखे आहे, असे वर्णन केले आहे.

ऐंद्रिय संवेदनांची प्रत्ययकारी चित्रे रेखाटताना चित्रमय आणि गतिमान प्रतिमांचा केलेला कलात्मक उपयोग, हा फिराक यांच्या शैलीचा आणखी एक विशेष. ‘जगमगाना’, ‘सरसराना’, ‘थरथराना’ अशा ध्वन्यनुकारी क्रियापदांची योजना करण्याची त्यांना हौस दिसते.

फिराक यांचे खरे सामर्थ्य प्रकट झाले आहे ते त्यांच्या गझललेखनात. ‘गझल’ या तशा निस्तेज झालेल्या काव्यप्रकारात फिराक यांनी आपल्या प्रभावी शब्दकळेने नवा प्राण ओतला. या गझलांमधूनच त्यांचा कवी या नात्याने खरा आत्माविष्कार झाला आहे.

वॉल्टर पेटर, कोलरिज आणि रस्किन या स्वछंदतावादी कलासमीक्षकांच्या परंपरेतून फिराक यांनी उर्दू काव्याचे मोठे मर्मग्राही समालोचन केले आहे. अंदाजे (१९४४), उर्दूकी इष्किया शायरी (१९४५), हाशिये (सु. १९४७) हे त्यांचे समीक्षणात्मक ग्रंथ होत. नकश या लाहोर येथून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकातून ‘मनआनम’ या सदराखाली लिहिलेल्या व याच नावाने पुढे संगृहीत केलेल्या पत्रांतून त्यांनी साहित्य, प्रेम, लैंगिकता इत्यादींसंबंधी आपले विचार व्यक्त केले आहेत.

टागोरांच्या गीतांजलीचे व एकशेएक कवितांचे त्यांनी उर्दूत भाषांतर केले आहे. याखेरीज हिंदीत पाच, तर इंग्रजीत सात अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. शुल-ए-साझ, गजलिस्तान (१९६५), शब्‍नमिस्तान (१९६५), शिरीस्तान (१९६६) हे त्यांचे इतर उल्लेखनीय काव्यसंग्रह असून पीछली रात (१९६९) हा त्यांनी स्वतःच्याच निवडक कवितांचा संपादित केलेला संग्रह आहे. चिरागाँ (१९६६) व गुल्बांग (१९६७) हेही त्यांच्या निवडक कवितांचे उल्लेखनीय संग्रह होत.

नईमुद्दीन, सैय्यद