नजीर अहमद : (६ डिसेंबर १८३६ – ३ मे १९१२). प्रसिद्ध उर्दू लेखक. उर्दू कांदबरीचे जनक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. संपूर्ण नाव मौलवी शम्सुल्उल्मा नजीर अहमद खान बहादुर. उत्तर प्रदेशात बिजनोरजवळील नगीना नावाच्या गावी एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सुरुवातीस वडील मीर सआदत अली यांच्याजवळ घरीच थोडेफार शिक्षण घेऊन ते वयाच्या चौदाव्या वर्षी दिल्लीस गेले. तेथे एका मशिदीला जोडून असलेल्या शाळेत ते शिक्षण घेऊ लागले. ही विद्यार्थिदशा त्यांनी अत्यंत हालअपेष्टांत काढली. अशाही स्थितीत त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पुरे करून दिल्ली महाविद्यालयात नाव दाखल केले परंतु वडिलांनी त्यांना इंग्रजी शिकण्यास मनाई केली. १८४७–५४ पर्यंत त्यांनी अरबी साहित्य, गणित इ. विषयांचे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पंजाबात अध्यापकाची नोकरी स्वीकारली. पुढे ते स्वकर्तृत्वाने शाळा निरीक्षकाच्या हुद्यापर्यंत चढत गेले. नोकरीत असताना मात्र त्यांनी घरी अभ्यास करून आपली इंग्रजी शिक्षणाची इच्छा पूर्ण करून घेतली. १८६१ मध्ये त्यांनी इंडियन पीनल कोडचा उर्दूत अनुवाद केला. त्यामुळे मामलेदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. नंतर ते नोकरीत उपजिल्हाधिकारीपदापर्यंत चढत गेले. त्यांनी उर्दूत अनुवादित केलेल्या एका ग्रंथास एक हजार रुपयांचा पुरस्कारही लाभला. १८७७ मध्ये एका शिष्टमंडळाचे प्रतिनिधी म्हणून ते द. हैदराबादला गेले पुढे तेथे ते राजस्व मंडळाचे सभासदही झाले. १८९७ मध्ये त्यांना एडिंबरो विद्यापीठाने एल्.एल्.डी. व पंजाब विद्यापीठाने डी.ओ.एल्. ह्या सन्मान्य पदव्या देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. हैदराबाद येथून सेवानिवृत्त होऊन ते दिल्लीस परतले आणि दिल्ली येथेच ते निधन पावले.

एक थोर उर्दू लेखक, शिक्षणतज्ञ व प्रभावी वक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. ते विनोदप्रिय होते. त्यांच्या व्याख्यानांचे दोन संग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. सर सय्यद अहमद यांच्या विचारांशी त्यांच्या विचारांचे बरेच साम्य आहे. शिक्षणप्रसाराबाबतही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांची ग्रंथनिर्मिती विपुल असून तीत कायद्यावरील अनेक ग्रंथांचे उर्दू अनुवाद, मतालिब-उल-कुरान हा कुराणावरील विवरण ग्रंथ, कुराणाचा कुराण मजिद मुतारजम हा दर्जेदार सटीप उर्दू अनुवाद इ. सु. ३५ ग्रंथांचा अंतर्भाव होतो. उर्दू साहित्यात त्यांना जे महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे, ते त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांमुळेच. आपल्या दर्जेदार कादंबऱ्यांतून त्यांनी दारिद्र्यात खितपत पडलेल्या मध्यमवर्गीय मुस्लिम समाजाच्या सुधारणेबाबतचे विचार कलात्मकपणे व्यक्त केले आहेत.

मिर्-अतुल-उरूस (१८६९, म. शी. वधूचा आदर्श) ही त्यांची पहिली कादंबरी असून तिच्यामुळेच ते उर्दू कादंबरीचे जनक मानले जातात. नंतर त्यांनी सात कादंबऱ्या लिहिल्या. त्यांतील काहींना पुरस्कारही लाभले. मिर् अतुल-उरूसबिनात-उन्-नाश (१८७३, म. शी. शवकन्या) ह्या कादंबऱ्यांत त्यांनी तत्कालीन स्त्रियांच्या समस्या प्रभावीपणे व कलात्मकपणे हाताळल्या आहेत. अयामा, फसाना-इ-मुबतल (१८८५) व रुया-इ-सादिका इ. कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. मुंतखिब-उल्-हिकायात (१८६९) हा त्यांच्या निवडक कथांचा संग्रह होय. त्यांच्या सर्वच कादंबऱ्यांतील पात्रे आदर्शवादी असून त्यांच्या कादंबऱ्यांत जागोजाग धर्म व नीतिपर विचार डोकावताना दिसतात, असा आक्षेप त्यांच्यावर घेतला जातो. तथापि भाषेवरील त्यांचे प्रभुत्व असामान्य आहे. विशेषतः स्त्रियांच्या संभाषणप्रसंगी त्यांनी योजिलेल्या शैलीवरून या भाषाप्रभुत्वाचा आपल्याला प्रत्यय येतो.

तौबतुन्नसूह (१८७७, म. शी. पश्चात्तापाचा उद्‌गार) ही त्यांची कादंबरी विशेष प्रसिद्ध असून महत्त्वाचीही आहे. तीत त्यांनी दिल्लीतील मावळत्या मुस्लिम घराण्यांचे सुस्पष्ट व हृदयस्पर्शी चित्र रेखाटले आहे. खऱ्या धार्मिकतेशिवाय जीवनसाफल्य नाही, असा विचार त्यांनी या कादंबरीतून प्रतिपादिला आहे. इब्‍नल्‌वक्त (१८८८, म. शी. कालपुत्र) मध्ये त्यांनी इंग्रजांच्या भारतीयांनी केलेल्या अंधानुकरणावर कोरडे ओढले आहेत. त्यांची शैली सुबोध, स्पष्ट व सरळ आहे. विनोदाचा सूर त्यांच्या कादंबऱ्यांत सर्वत्र आढळतो. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील एक प्रसिद्ध लेखक म्हणून ते मान्यता पावले. त्यांच्या इतर ग्रंथात चंदपंद (१८६९, म. शी. थोडा उपदेश), मबादियूल हिकमत (१८७१, म. शी. तर्कशास्त्र प्रवेश), अल् हुकुक् बल् फराइझ् (१९०६, म. शी. हक्क आणि कर्तव्ये), अल् इज्‌तेहाद् (१९०८, म. शी. नवा पवित्रा), उम्महातुल् उम्मह (म. शी. इस्लामी जमातीच्या माता) इ. ग्रंथांचा समावेश होतो.

त्यांनी काही कविताही लिहिल्या असून त्या मजमूअए बेनजीर ह्या संग्रहात संकलित केल्या गेल्या. तथापि त्यांची काव्यरचना सामान्य दर्जाचीच आहे.

फैजी, सुलताना (उ.); सुर्वे, भा. ग. (म.)