गालिब

गालिब : (२७ डिसेंबर १७९७–१५ फेब्रुवारी १८६९). प्रख्यात उर्दू कवी. संपूर्ण नाव मिर्झा असदुल्ला खान व टोपणनाव ‘गालिब’. त्याचा जन्म आग्रा येथे झाला. त्याचे वडील मिर्झा अब्दुल्ला बेग खान हे लष्करात अधिकारी होते. गालिब पाच वर्षांचा असतानाच ते एका लढाईत मारले गेले. त्यानंतर त्याचा सांभाळ आग्र्यास त्याच्या आजोबांनी केला. तेथे तो ऐष-आरामात वाढला. तत्कालीन पद्धतीनुसार त्याचे अरबी  व  फार्सीचे शिक्षण झाले. तो मुळातच बुद्धिमान आणि प्रतिभासंपन्न होता. वयाच्या तेराव्या वर्षी त्याचा उमराव बेगमशी विवाह झाला आणि सतराव्या वर्षी (१८१४) तो दिल्लीस स्थायिक झाला. १८२८ च्या सुमारास तो वर्षासनाच्या खटल्यानिमित्त कलकत्त्यास गेला. तेथे तो सु. दोन वर्षे होता तथापि ह्या खटल्याचा निकाल त्याच्या विरुद्ध गेला आणि तो दिल्लीस परतला. ह्या खटल्यात त्याचे सर्वत्र प्रयत्न अपेशी ठरून त्याला फार मनस्ताप झाला व कर्जही बरेच झाले तथापि त्याने वर्षासनासाठी आपले प्रयत्न मोठ्या चिकाटीने चालूच ठेवले. त्याचे बहुतांश आयुष्य दिल्लीतच व्यतीत झाले. मिळणारे तुटपुंजे वर्षासन तसेच अयोध्येच्या नबाबाकडून आणि दिल्ली दरबारातून त्याला जे काही थोडेफार वेतन मिळे, त्यावरच अतिशय तंगीत तो आपला निर्वाह करू लागला. उत्पन्नाच्या मानाने त्याचा खर्च बराच होता व त्याला दारूचेही व्यसन होते. त्यामुळे तो अतिशय कर्जबाजारी बनला. त्याला जुगाराचाही नाद होता व त्याबाबत त्याला तुरुंगातही जावे लागले. या घटनेचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याचे त्याच्या काव्यातून आणि पत्रव्यवहारातून दिसते. त्याला सात मुले झाली पण ती अल्पवयात वारली. त्याचे कौटुंबिक जीवन फारसे सुखी नसावे, असे दिसते. १८५७ च्या उठावाच्या वेळी तो दिल्लीतच होता. दस्तंबू ह्या रोजनिशीवजी फार्सी गद्यग्रंथात त्याने ह्या उठावाची हकीगत लिहून ठेवली आहे. ११ मे १८५७ ते ३१ जुलै १८५८ पर्यंतच्या घटना ह्या रोजनिशीत आल्या असून त्यात त्याने केवळ आपद्‌धर्म म्हणून इंग्रजांची स्तुती आणि उठाव करणाऱ्यांची निंदा केली आहे तथापि त्याने आपल्या मित्रांना लिहिलेल्या पत्रांतील त्याची मते याहून सर्वस्वी वेगळी व विरोधीही आहेत.

वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षापासूनच तो कविता रचू लागला आणि पंचविसाव्या वर्षापर्यंत त्याने उर्दूत काव्यरचना केली. त्याच्या सुरुवातीच्या रचनेवर फार्सी कवी ‘बेदिल’ याचा प्रभाव होता. बेदिलचे ऋण त्याने आपल्या काव्यात मोकळ्या मनाने मान्यही केले आहे. नंतरच्या त्याच्या रचनेवर मात्र कोणाही कवीचा प्रभाव नसून ती संपूर्णपणे स्वतंत्र आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून ते त्रेपन्नाव्या वर्षापर्यंत मात्र त्याने उर्दूऐवजी फार्सीत रचना केली. त्याचे फार्सीवर विशेष प्रेम होते. आपली उत्कृष्ट रचना उर्दूऐवजी फार्सीतच आहे, असे त्याने म्हटले आहे तथापि त्याची विशेष ख्याती मात्र उर्दू काव्यामुळेच झाली. १८५० पासून पुढे बहादूरशाह जफर (१८३७–५७) ह्या मोगल बादशहाच्या सांगण्यावरून तो परत उर्दूत रचना करू लागला. ह्या काळातील त्याची उर्दू रचना दर्जेदार व परिपक्क आहे.

त्याच्या समग्र फार्सी कवितांचा कुल्लियात-इ-गालिब (१८४५) हा संग्रह प्रसिद्ध असून त्यात कसीदा, गझल, मस्नवी इ. प्रकारांतील रचनांचा समावेश आहे. त्याच्या उर्दू रचनेचा दीवान-इ-गालिब (१८४१) हा संग्रह इतका गाजला, की गालिबच्या हयातीतच त्याच्या चार आवृत्त्या निघाल्या. फार्सी धर्तीच्या रचनेमुळे यातील त्याची काही रचना दुर्बोध झाली आहे तथापि जी सोपी आहे ती अतिशय कलात्मक व प्रसन्न आहे. आपला आशय तो सखोल अनुभूतीतून व अभिनव पद्धतीने व्यक्त करतो. या दोन काव्यसंग्रहांव्यतिरिक्त त्याचे काही फार्सी व उर्दू गद्यग्रंथही आहेत. फार्सी गद्यग्रंथांत मिहर-इ-नीमरोज (१८५४, तैमूर वंशाचा हुमायूनपर्यंतचा इतिहास, पहिला खंड), कुल्लियात-इ-नस्र (१८६८, गद्यलेखांचा संग्रह), दस्तंबू (१८५७ च्या उठावाची हकीगत), पंज-गंज-इ-आहंग (फार्सी व्याकरण व शैलीवरील प्रबंध), कातिअ-इ-बुर्हान (१८६१, बुर्हान-इ-कातिअ  या फार्सी शब्दकोशावरील टीका) इत्यादींचा समावेश होतो. त्याच्या उर्दू गद्यग्रंथांत ऊद-इ-हिंदी (१८६८) आणि उर्दू-इ-मुंअल्ला (१८६९) ह्या दोन पत्रसंग्रहांचा अंतर्भाव होतो. त्याच्या ह्या सर्वच फार्सी-उर्दू ग्रंथांच्या पुढे अनेकांनी विविध आवृत्त्या प्रकाशित केल्या. गालिबने आपल्या मित्रांना व अनुयायांना वेळोवेळी लिहिलेली उर्दू पत्रे वाङ्‌मयीन दृष्ट्या श्रेष्ठ असून त्यांची भाषाशैली वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळेच तो आधुनिक उर्दू गद्याचा प्रवर्तक मानला जातो. त्याच्या ह्या पत्रांतून तत्कालीन मुस्लिम समाजाच्या विविध अंगांवर तसेच गालिबच्या व्यक्तिमत्त्वावरही चांगला प्रकाश पडतो. त्याच्या ह्या पत्रांची गणना उर्दूतील अभिजात साहित्यात केली जाते.

फार्सी व उर्दू यांच्या संश्लेषणातून गालिबने आपली उर्दू कविता लिहिली. सखोल अनुभूती व तात्त्विक चिंतन यांचा कलात्मक आविष्कार त्याच्या काव्यात आढळतो. धार्मिक व सांप्रदायिक भेदभावांना त्याच्या विचारात स्थान नाही. त्याच्या मते केवळ एकाच परमेश्वराची शुद्ध उपासना करणाऱ्याच्या ठिकाणी धार्मिक भेदभावाच्या भावनेचा लोप होतो. प्रत्येक धर्म, उपासकास त्या एकाच परमेश्वराकडे नेतो. अपार सहानुभूती व मानवतेचे असीम प्रेम यांचा तो उपासक आहे. त्याचा मित्रपरिवार व अनुयायीवर्ग फार मोठा होता व त्यांत विविध धर्मांचे लोक होते. त्याचे काव्य कळावयास कठीण असले, तरी त्यात एकदम हृदयाला जाऊन भिडण्याचे सामर्थ्य आहे. तुर्की परंपरेस अनुसरून गालिबच्या ठिकाणी पावित्र्याची चाड आणि पराकाष्ठेचा अभिमान, गुढवाद आणि ऐहिक जीवनातील सुखदुःखे, परंपरागत सामाजिक रूढी आणि उदारमतवाद तसेच नैराश्य आणि आशावाद यांचे चमत्कारिक मिश्रण झालेले दिसून येते.

गालिबची फार्सी गद्य-पद्य रचना उत्कृष्ट असूनही आजवर ती उपेक्षितच राहिली आहे. समीक्षाकांचे तिच्याकडे म्हणावे तसे लक्ष वेधले नाही आणि त्यामुळेच तिचे यथायोग्य मूल्यमापनही होऊ शकले नाही.

गालिबला दिल्ली दरबारातून ‘नज्मुद्दौला दबीरुल्‌मुल्क निजामगंज’ हा मानाचा किताब मिळाला होता. ⇨ हाली, रख्शाँ, जकी, मजरुह, मुन्शी हरगोपाल तुफ्ता, मुन्शी बिहारीलाल मुश्ताक इ. त्याचे प्रमुख अनुयायी होते. हाली हा गालिबचा आद्य चरित्रकार व अनुयायी. त्याने उर्दूत यादगार-इ-गालिब (१८९७) हे गालिबचे आठवणीवजा चरित्र लिहिले असून ते विशेष प्रसिद्ध आहे. गालिब दिल्ली येथे निधन पावला. तेथे त्याची कबर आहे.

संदर्भ : 1. Mujeeb, M. Ghalib, Delhi. 1969.

      २. खान, यूसुफ हुसेन, गालिब और आहंग-इ-गालिब, दिल्ली, १९६८.

फैजी, सुलताना (उर्दू) सुर्वे, भा. ग. (म.)