उर्दूभाषा : उर्दू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाषेचे मूळ नाव ‘हिंदी’ असे होते. प्रथम अमीर खुसरौ (१२५३–१३२५ ) याने या भाषेला ‘हिंदी’ म्हणून अनेक ठिकाणी उल्लेखिलेले आहे. या भाषेला ‘उर्दू’ हे नाव दिल्ली व लखनौ येथील विद्वानांनी १७२५ च्या सुमारास रूढ केले. ‘उर्दू’ हा मूळ तुर्की भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ ‘लष्करी छावणी’ असा आहे. हिंदी भाषा मुसलमान बादशहांच्या महालात विशिष्ट रूपात वावरत होती. तिच्यात अरबी-फार्सी शब्दांचा वापर भरपूर व शैलीपूर्ण होता. आरंभी ‘जबाने उर्दू-ए-मुअल्ला’ असा प्रयोग मीर तकी याने केला. मागाहून ‘उर्दू’ हा शब्द भाषेचे नाव म्हणून वापरात आला. या भाषेच्या उगमासंबंधाने उर्दू साहित्यिकांत तीव्र मतभेद होते. मुसलमान विजेत्यांच्या छावणीत ही भाषा जन्‍म पावली, असे काहींनी प्रतिपादले तर काहींनी इस्लामसंपर्काने अरबी – फार्सीच्या आधारे ती उगम पावली असे म्हटले. वस्तुत: दिल्ली, रामपूर, मुरादाबाद, बिजनोर, मुझफरनगर, सहारनपूर, अंबाला, पूर्व पतियाळा, मीरत, डेहराडून या प्रदेशांतील प्राचीन अपभ्रंशांतून ही भाषा विकसित झालेली आहे, हे आता नव्या संशोधनामुळे मान्य झालेले आहे.‘उर्दू’ या नावाप्रमाणेच ‘खडी बोली’ हे नावसुद्धा फार उशिरा (१८०० च्या सुमारास) तिला मिळालेले आहे. उर्दू मातृभाषा असणार्‍यांची भारतातील संख्या २,३३,२३,५१८ (१९६१) आहे.पश्चिम पाकिस्तानातील विशेषत: पंजाबी मुसलमानांचीही ती मातृभाषा आहे. तसेच पाकिस्तानने पूर्व बंगालचीही (बांगला देश अस्तित्त्वात येण्यापूर्वी) ती राष्ट्रभाषा केली होती.

मुसलमान बादशहांचे दरबारी वातावरण फार्सी भाषेलाच पोषक असल्याने मुसलमानांनी ही भाषा आरंभापासून अरबी-फार्सी लिपीतच लिहिली पण ती देवनागरीतही लिहिली जात होती, याचेही पुरावे मिळतात. नंतरही नागरीतून तीत साहित्यनिर्मिती होत होती. तथापि राजसत्तेच्या आश्रयामुळे मुसलमान साहित्यिकांकडून फार्सी लिपीत उर्दू साहित्यनिर्मिती झाली पण ती तिच्या मायभूमीत मात्र झाली नाही. दक्षिणेत बहामनी राज्य स्थापन झाल्यावर तिच्यात साहित्य निर्माण होऊ लागले. दक्षिणेत तिला हिंदीच्या बरोबरीने ‘दकनी’, ‘दखनी’ वा ‘दक्खिनी’ अशीही नावे रूढ झाली.

दक्षिणेत ख्वाजा बंदेनवाज ( मृ. १४२२) याने या भाषेत प्रथम रचना केली. पुढेही सु. १७८० पर्यंत ही साहित्यनिर्मिती चालली होती. परंतु उत्तरेत यानंतर तिचे हिंदी रूप लोप पावून सौदा, दर्द, मीर तकी मीर इ. श्रेष्ठ कवींची साहित्यनिर्मिती उर्दू नावाने चालू होती.

हिंदी भाषेत असलेले सर्व स्वर उर्दू भाषेत आहेत, त्याचप्रमाणे हिंदीतील सर्व व्यंजनेही तीत आहेत. उर्दू लिपीत हिंदीतील महाप्राणांसाठी स्वतंत्र चिन्हे नसली, तरी हे उच्चार आहेत जोडाक्षराने ते व्यक्त होतात. त्याची दखल इन्‍शाअल्ला खान ‘इन्‍शा’ याने घेतलेली आहे. जिव्हामूलीय स्वर ऐन, घर्षक ख, ज, ग, फ आणि मृदुतालव्य ही व्यंजनेही आहेत. आजच्या उर्दू साहित्यात ते जरी अविकृत रूपात असले, तरी दक्खिनी हिंदी काळात या मूळ अरबी ध्वनीचे हिंदीकरण करण्याची परंपरा होती. उदा., नफअ – नफा, वजअ – वजा, विदाअ – विदा, कुफल – कुलूफ, मअनी – माना, अक्ल – अखल, मनअ – मना, जमाअत – जमात, साअत – सात, अअला – आला इत्यादी. उर्दूतील महाप्राणांचे उच्चार तिच्या पूर्वकाळात अल्पप्राण बनत असत. दक्खिनी हिंदी रूपातून देकना, लाक, पारकी अशी रूपे रूढ होती. त्याच काळात स्वरमध्यस्थ  च्या पूर्वी असल्यास त्याचा होत असे, जसे कहना – कयना, ठहरना – ठयरना, पहचा (छा ) न – पयछान. आजच्या उर्दूत आढळणाऱ्या ठाटमाट, ढूण्डना, डाटना, टण्टा, टूटना, टेढा, ठण्डक आदी शब्दांच्या ऐवजी दक्खिनी हिंदी काळात थाटमाट, धूण्डना, दाटना, तण्टा, तूटना, तेढा, थण्डक इ. रूपे रूढ होती. म्हणजे एकाच शब्दात लागोपाठ दोन मूर्धन्य व्यंजने आल्यास पहिल्याचा दंत्य उच्चार होत असे. हा मराठी भाषेच्या सहवासाचा परिणाम असणे संभवनीय आहे. कुतबशतक ग्रंथात ढुंढना ( परिच्छेद २९ ) आणि ठंढ (परिच्छेद १०१ ) अशी रूपे आढळतात.

आजच्या उर्दू भाषेत लिंगभेद व शब्दाच्या अंत्य वर्ण यांना अनुसरून अनेकवचनास वेगवेगळे प्रत्यय लागतात. परंतु दक्खिनी हिंदी या पूर्वरूपात सर्व प्रकारच्या नामांचे अनेकवचन केवळ आन् – ऑ लावून बनत असे. जुन्या भाषेत इ – ईकारान्त स्त्रीलिंगी नामात वैकल्पिक रूपेही आढळतात. जसे गतियां, मोहनियां, सहलियां आदी.

आजच्या उर्दूत अनेकवचनाचे सामान्य रूप औरतों -, मर्दों -, असे होते. परंतु जुन्या उर्दूत मात्र केवळ ऑ, आन् या प्रत्ययांवरच निर्वाह होत असे. उदा., इन जमाने के मर्दां को क्या पतियाना. उर्दूत जेथे आज केवळ नामद्विरुक्ती आढळते, अशा रूपाबद्दल जुन्या उर्दूच प्रथम नामाला तृतीयेचा इ- इँ अथवा ए-एँ हा प्रत्यय लागतो. उदा., बने – बन. हिंदीची ही मूळ प्रवृत्ती कुतबशतक  या नागरी ग्रंथातही आढळते.

सर्वच मध्य आणि नव्या आर्य – भारतीय (इंडो-आर्यन ) भाषांमधून लिंगभेदात अनिश्चिती दिसून येते. तीच अवस्था उर्दू भाषेतही झालेली आहे. उर्दूच्या आरंभकाळात हे विशेषरूपाने दिसते. दक्खिनी हिंदी काळात या अनिश्चितीचे प्रमाण अधिकच वाढते. उर्दूतील आजची सर्वनामे हिंदीप्रमाणेच असली, तरी जुन्या रूपात भिन्नता दिसून येते. मै, हूं, हौ, हम, हमें, हमन-ना, तू, तुं, तूं, तुम, तुमन-ना, मुज-झ आदी रूपे आढळतात. तृतीय पुरूषात वो, ओ (वह ) ही दोन्ही रूपे रूढ होती. अनेकवचनात वे आढळतो. जुन्या उर्दूत सो (वह ) रूपाचा प्रयोग विशेष लक्षणीय आहे. जुनी रूपे जिने, उने, किने इत्यादीत जिन, उन, किन या मूळ रूपांना ने हा तृतीयेचा प्रत्यय प्रच्छन्न रूपाने लागलेला आहे. जु कोई, जु कुच –छ असे प्रयोग नित्यप्रयुक्त असत. आजच्या उर्दूत वैशिष्ट्यवाचक ही (जसे करनाही होगा ) अव्यय लागत असले, तरी जुन्या उर्दूत मराठीतील या अव्ययाचा वापर सर्रास होता. उदा., ‘जानो कधीं आये च न थे’, ‘रसूल उसी च ते नावु दिया’ (सबरस ).

उर्दू व हिंदी भाषांत प्रथमा विभक्तीत ने हा कर्तृवाचक प्रत्यय रूढ आहे. या ने प्रत्ययाचा प्रयोग जुन्या उर्दूत सर्रास आहे. काही विद्वानांच्या मते ने प्रत्यय मूलत: खडी बोलीचाच आहे. तो मराठीतून आला की काय, अशी शंका ग्रीयर्सन यांना होती. आजच्या उर्दूइतका जुन्या उर्दूत हा प्रयोग नियमित नव्हता. त्याचे कारण असे, की तो मराठी भाषेच्या चिरसहवासाने दक्खिनी वा उर्दू- हिंदीत आला. त्याच्या वापरातील अनियमितपणा दिखाऊ आहे. मराठीशी तुलना केल्यावर अनियमितपणाचा आभास दूर होतो, हे आता स्पष्ट झाले आहे. ने प्रत्ययाचा वापर खडी बोलीत नाही. ने प्रत्ययाऐवजी इ –ईं यांचा वापर होत असे. इं–ईं यांचाही प्रच्छन्न वापर आढळतो. उर्दूत तृतीया व पंचमी या विभक्तीत आज फक्त से प्रत्ययाचा वापर होतो. जुन्या भाषेत सूं – सो, ते –तें. थे – थें, सात यांचा वापर होई. सेते यांचे संयुक्त रूप सेते, सीते, सिते हेही भरपूर प्रमाणात आढळते. चतुर्थीला लिप, खातिर प्रत्यय लागतो. जुन्या भाषेत खातिर, बदल अधिकतया लागत. लिए हा प्रत्यय उशिरा आला. आज संबधदर्शक का, की, के हे आहेत. जुन्या भाषेत यांच्याखेरीज केरा –री – रे हे प्रत्ययही बाहुल्याने आढळतात.कुतबशतक ग्रंथात नुहिं प्रत्ययांचा वापर आढळतो. सप्तमीचे ऊपर, पर, में, अन्दर बाहर आदी प्रत्यय आज आहेत. जुन्या रूपांत यांशिवाय मन, मियाने, म्यान-ने हे प्रत्यय में च्या जोडीने आणि पर, ऊपर यांच्याबरोबर उपर, उपराल वापरले जात. पो अथवा पिह नंतर आले.


उर्दूत भूतकालीन रूपे आकारान्त होतात. उदा., पडा, कहा, भागा इत्यादी. परंतु जुन्या काळी ही रूपे पड्या, कह्या, भाग्या अशी होत. ही मूलत: हिंदी भाषेचीच होत. वर्तमानकालीन क्रियापदांची पुरूषवाचक रूपे ता –कारान्त होतात. जुन्या काळी ती -कारान्तही असत. भविष्यकालीन क्रियापदाचा प्रत्यय गा-गी-गे असा आहे. जुन्या भाषेत या रूपांशिवाय सी या प्रत्ययाचा वापरही होत असे. उदा., जासूं (मी जाईन ), लेसूं (मी घेईन ), रहसी (तो राहील ) आदी.

आजच्या उर्दूत मराठीप्रमाणेच, विशेषणात विशेष्यानुसार विभक्ती बदलत नाही. आकारान्त विशेषणात सामान्य रूप होते. परंतु जुन्या उर्दूत (दक्खिनी) विशेषत: ई – कारान्त नामांच्या

 विशेषणाला विशेष्याचा प्रत्यय लागतो एवढेच नव्हे तर क्रिया व प्रत्यय यांनाही तो लागतो. उदा., ‘‘बाजे ओरता मर्दा खातिर सत्यां ह्यां हैं, आग में जल्यां है’’ (सबरस पृ. २२० ), ‘‘सोने क्यां कल्यां कर करन में भरी’’,‘‘जित्यां अथ्यां हित क्यां संख्या’’ इत्यादी.

उर्दूत कालवाचक अब, जब, तब, कब स्थानवाचक यहां, वहां, जहां, तहां, कहां दिशावाचक इधर, उधर, आदी रीतिवाचक यों, ज्यों, क्यों, त्यों इ. वापरले जातात. जुन्या भाषेत यांच्याऐवजी जधाँ, तधाँ, कधाँ, ज-त-क-धन, कधीं इत्यादींचा वापर अन्य अव्ययांबरोबर सर्रास होत असे. तसेच संग, संगात हे साथ याच्याऐवजी वापरले जात. आजच्या उर्दूतील मानिंद, तरह (प्रमाणे ) प्रत्ययांऐवजी जुन्या उर्दूत नमून, नमन, घात, जिन्स, नाद, सम, समान आदी प्रत्यय होते. उभयान्वयी कि हे अव्यय आजच्या उर्दूप्रमाणे जुन्या भाषेतही आरंभापासून (सु. १३२८ ) वापरलेले दिसते. आजच्या उर्दूत जो, जे (कि) हे उभयान्वयी क्वचितच वापरले जाते. परंतु जुन्या भाषेत त्याचा उपयोग सर्वत्र होत होता. दक्खिनीत तर ते फार उशीरापर्यंत टिकून होते. शाह तुराब याच्या मनसमझावन (१७६२ ) मधील

‘‘जु हुशयार गुनवन्त चातुर है दाना

अरे मन नको रे नको हो दिवाना ।’’

हा उपयोग लक्षणीय आहे. त्यापूर्वीच्या साहित्यात हा प्रयोग सर्वत्र आहे. आता कुतबशतक प्रकाशात आल्याने उर्दूच्या जुन्या रूपाचा अभ्यास करणे शक्य झालेले आहे.

उर्दूच्या प्रत्ययप्रक्रियेवर अरबी-फार्सी प्रक्रियेचा वेगळा असा प्रभाव बहुधा नाही. जो आहे तो भारतीय भाषांप्रमाणेच थोडासा आहे. उर्दूच्या शब्दसिद्धीचाही तोच प्रकार आहे. अरबीतील त्रिवर्ण धातू आणि त्याचे साधित शब्द लेखनाच्या दृष्टीने मूळ रूपात वापरले जातात, पण अरबी ध्वनीचा मात्र वापर नाही. अरबी – फार्सी तत्सम शब्दांचे प्रमाण उर्दूत ५० टक्क्यांहून अधिक भरेल. उर्दूची शब्दसिद्धी हिंदी, मराठी आदींप्रमाणेच होते. तिची वाक्यरचनाही शुद्ध आर्य- भारतीय आहे. म्हणून उर्दू ही आर्य-भारतीय भाषाच होय. परंतु उर्दू पंडितांनी उर्दूचे व्याकरण अरबीच्या अनुकरणाने तयार केल्याने, ते वेगळी मांडणी करतात.

उर्दूचे हिंदीपासून भिन्नत्व उर्दूने स्वीकारलेल्या केवळ अरबी-फार्सी शब्दसंपत्ती आणि अरबी –फार्सी लिपी यांत सामावलेले आहे. आजच्या उर्दू लिपीची तीन ऐतिहासिक स्थित्यंतरे आहेत. अरबी भाषेतील अठ्ठावीस वर्ण तीत आहेत. अरबांचा इराणशी संपर्क आल्यानंतर आणखी चार वर्ण तीत समाविष्ट झाले (पे, चीम, झे, गाफ). इराणी मुसलमान भारतात आल्यानंतर वरील बत्तीस वर्णात आणखी तीन वर्णाची भर पडली, त्यामुळे उर्दू लिपीत आता पस्तीस वर्ण आहेत.भारतात समाविष्ट झालेले वर्ण टे, डे आणि डाल हे होत.

उर्दू वर्णांपैकी ते आणि तोय यांचा उच्चार असाच होतो. त्यांत भेद नाही. से, सीन आणि स्वाद या सर्वाचा उच्चार असा होतो. है आणि हे यांचा उच्चार ह असून त्यांत भेद नाही. जाल, जे आणि जोय हे तीन वर्ण एकाच ध्वनीचे दर्शक आहेत. से वर्णाचा उच्चार अरबी भाषेत मृदु सारखा होतो पण तो उर्दूत नष्ट झालेला आहे. या वर्णांमुळे अरबी शब्द मूळ स्वरूपात लिहिता येतात.

संदर्भ : 1. Bailey, T. G. Teach Yourself Urdu, London. 1962.

             2. Platts, J. T. A Grammar of the Hindustani or Urdu Language, Oxford, 1967.

             ३. शौकत, सब्जवारी, उर्दू का इर्तिका, डाक्का, १९५६.

             ४. सक्सेना, बाबूराम, दक्खिनी हिंदी, अलहाबाद, १९५२.

चौहान, देवीसिंग