धनुर :(भुंगेरा). कोलिऑप्टेरा गणाच्याब्रुकिडी कुलातील पीडक कीटक. साठविलेल्या कडधान्याला अत्यंत उपद्रव देणारे हे भुंगेरे सु. सहा मिमी. लांबीचे गर्द तपकिरी रंगाचे असून डोक्याकडे निमुळते होत जातात. शरीराच्या वरील भागावर मध्यभागी दोन चकचकीत पांढरे ठिपके असतात.

वाटाण्यातील भुंगेरा (ब्रुकस पिसोरम) : (१) अळी, (२) कोष, (३) पौढ भुंगेरा.

भुंगेऱ्याची मादी शेतामध्ये शेंगांवर किंवा दाण्यांवर एक एक किंवा काही वेळेस पुंजक्या – पुंजक्याने अंडी घालते. चारपाच दिवसांत अंडी उबून बाहेर पडणाऱ्या अळ्या पांढऱ्या रंगाच्या नळकांड्यांच्या आकाराच्या मांसल व सुरकुत्या पडलेल्या अंगाच्या असतात. त्याचे तोंड तपकिरी रंगाचे असते. त्या दाण्यात शिरून तेथेच राहतात. दोनतीन आठवड्यात त्या पूर्ण वाढतात. त्या दाण्यातच कोषावस्थेत जातात. त्यातून चार ते आठ दिवसांत भुंगेरे बाहेर पडतात. ते उडू शकतात. त्यामुळे ते साठविलेल्या धान्यातून शेतातील पिकांवर तसेच शेतातून साठविलेल्या धान्यात किडीची प्रसार करू शकतात. भुंगेरे दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त जगतात.

शेतामध्ये अळ्या शेंगांत शिरून आतील दाणे खातात. साठविलेल्या कडधान्याला यांचा फारच उपद्रव होतो. कडधान्याला दिसणारी भोके  भुंगेऱ्यांना बाहेर पडता यावे यासाठी त्यांनी केलेली असतात. मूग, हरभरा, तूर, उडीद, घेवडा, वाल, वाटाणा अशाच कडधान्याला या किडीचा उपद्रव होतो. किड लागलेले बी चांगले उगवत नाही. या किडीच्या प्रमुख जातीचे नाव ब्रुकस कायेन्सिस आहे. डाळींना मात्र या किडीचा उपद्रव होत नाही.

शेतामध्ये या किडीचे नियंत्र करणे अवघड असते. साठवेलल्या धान्यावरील किडीच्या नाशासाठी कार्बन डायसल्फाइड, इडीसीटी अगर मिथिल ब्रोमाइडसारख्या औषधांची विषारी धुरी देतात. ही औषधे मानवासही विषारी असल्याने तज्ञाकडूनच वापरली पाहिजेत. धुरी द्यावयाचे धान्य हवाबंद करता आले पाहिजे.

पोखरकर, रा. ना.