गोचीड : ह्या रक्तशोषक परोपजीवीचा (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या जीवाचा) उपद्रव मानव, स्तनी प्राणी, पक्षी आणि सरीसृप (सरपटणारे प्राणी) यांना होतो. ती कीटकसदृश असली तरी तिचा समावेश आर्थ्रोपोडा संघाच्या अरॅक्निडा वर्गात करतात. त्यांचे ⇨ माइटांशी (लाल कोळ्यांशी) संबंध आहेत. ॲकॅरिना या उपवर्गात त्या मोडतात. टणक गोचीड (आयक्झोडिडी कुल) वा मऊ गोचीड (अर्‌गॅसिडी कुल) असे त्यांचे दोन प्रकार आहेत. तिच्या शेकडो जाती जगभर सर्वत्र आढळतात. कीटकाच्या उलट तिला पायांच्या चार जोड्या असतात व कीटकाप्रमाणे तिच्या शरीराचे डोके, वक्ष व उदर यांमध्ये स्पष्ट विभाजन झालेले नसते. तिची मुखांगे (तोंडाचे अवयव) रक्तशोषणास योग्य असून त्यांना मागे वळलेले दात असतात. ती जेव्हा चावा घेते तेव्हा आश्रयीच्या (ज्यावर परजीवी पोसला जातो त्याच्या) त्वचेत आपले दात खुपसून घट्ट बसते व अशी गोचीड काढणे अवघड काम असते. रक्त पिऊन तट्ट फुगल्यावर ती आपली पकड ढिली करते व आश्रयीपासून गळून पडते. मादी नरापेक्षा आकाराने थोडी मोठी असते.

मादी जमिनीवर व गवतात अंडी घालते. अंडी उबून सहा पायांचे डिंभ (अळीसारखी अवस्था) बाहेर पडतात. त्यांचे योग्य वेळी निर्मोचन (कात टाकण्यासारखी क्रिया) होऊन आठ पायांचा अर्भक तयार होतो. अर्भकाचेही निर्मोचन होऊन प्रौढ गोचीड तयार होते. काही जातींमध्ये संपूर्ण जीवनचक्र एकाच आश्रयीवर पुरे होते. तर काही जातींत विकास पावणारी गोचीड प्रत्येक निर्मोचनानंतर वेगळ्या आश्रयीवर जाते. पूर्ण वाढ झालेल्या गोचिड्या कधीकधी अन्नाशिवाय बरीच वर्षे जगू शकतात व डिंभ अन्नाशिवाय बरेच महिने जगल्याचे आढळून आले आहे.

आयक्झोडिडी कुलातील खालील जातींचा मानवाला व पाळीव प्राण्यांना उपद्रव होतो. डर्‌मॅसेंटर व्हेन्यूस्टस  ही जाती माणसाच्या रॉकी माऊंट ठिपके ज्वाराची (अमेरिकेतील रॉकी पर्वत प्रदेशात प्रथमतः 

रक्त पिऊन फुगलेली कुत्र्यावरील गोचीड.

आढळलेल्या व ठिपक्यासारखे फोड हे लक्षण असणाऱ्या तापाची) वाहक आहे. डर्‌मॅसेंटर रेटिक्युलेटस  या जातीने कुत्र्यांमध्ये हेमॅटोझूनाचे संक्रामण होऊन त्यांना पित्तज्वर होतो. असाच रोग द. आफ्रिकेत हीमोफायसॅलिस लिची  या जातीच्या चाव्यामुळे होतो. मॉरगॅरोपस ॲन्यूलेटस  ही जाती जनावरांच्या रक्तमूत्र या रोगाच्या जंतूंची वाहक आहे. काही जातींच्या चावण्यामुळे विशिष्ट प्रकारचा गोचीड पक्षघात होतो व तो गोचीड काढल्यावर नाहीसा होतो. अर्‌गॅसिडी कुलातील पुढील जातींचा उपद्रव होतो. ऑर्निथोडोरस मौबेटा  ही जाती स्पायरोकिटी जंतूंची वाहक असून त्यामुळे मानवाला ⇨ पुनरावर्ती ज्वर  होतो. मेक्सिको व टेक्सस येथे ऑर्निथोडोरस ट्युरिकेटा  या जातीचा मानवाला व कोंबड्यांना उपद्रव होतो. अर्गस मिनिएटस  ही जाती स्पायरोकिटी या जंतूंची वाहक असून त्यामुळे कोंबड्यांना स्पायरिलोसिस रोग होतो.

गोचिड्यांच्या नियंत्रणासाठी जनावरांना ५० टक्के गॅमेक्झिन भुकटी लावतात, त्याचा फवारा देतात किंवा त्याच्या पाण्यातून जनावरे नेतात. याशिवाय मॅलॅथिऑन अगर रोनेल या कीटकनाशकांचाही वापर करतात. 

गर्दे, वा. रा.