पिसू भुंगेरा : या कीटकाचा समावेश कोलिऑप्टेरा गणातील ॲल्टिसिडी व यूमोल्पिडी या कुलांत करतात. पिसूसारखा आकार व उडी मारण्याच्या पध्दतीमुळे या भुंगेऱ्यांना पिसू भुंगेरे हे नाव पडले असावे. हे भुंगेरे अत्यंत लहान, लंबवर्तुळाकार, बहिर्वक्र असतात. ह्यांचा रंग चमकदार काळा, निळा, हिरवा किंवा तपकिरी असतो. काही जातींत शरीरावर फिकट ठिपके असतात. पाय लहान, केशविरहित असून पाठीमागील पायांची जोडी लांब झालेली असल्यामुळे उडी मारण्यास मदत होते. पिसू भुंगेरे कोवळी पाने, फुले, कळ्या यांवर उपजीविका करतात. ते बहुधा सकाळ-संध्याकाळ जास्त प्रमाणात नुकसान करतात.

भुंगेऱ्याची मादी एक–एक किंवा पुंजक्याने झाडांच्या पानांवर किंवा जमिनीत झाडांच्या मुळांवर अगर खोडाच्या आसपास अंडी घालते. ती ४–७ दिवसांत उबून अळ्या बाहेर पडतात. अळ्यांच्या सवयी भुंगेऱ्यांच्या जातीप्रमाणे निरनिराळ्या असतात. ज्वारी, मका, द्राक्ष इत्यादींवरील भुंगेऱ्यांच्या अळ्या मुळांवर उपजीविका करतात. तागावरील भुंगेऱ्याच्या अळ्या मुळांमध्ये शिरून आतील भाग खातात, तर मिरीवरील भुंगेऱ्याच्या अळ्या पक्व होणाऱ्या मिरीत शिरून आतील बी खातात. अळी अवस्था निरनिरळ्या जातींनुसार १५–४५ दिवसांची असते. जमिनीतच त्या मातीच्या आवरणात कोशावस्थेत जातात. ७–१५ दिवसांनी कोशातून भुंगेरे बाहेर पडतात व झाडांच्या जमिनीवरील भागांवर उपजीविका करतात. त्यामुळे पानांना बारीक भोके पडतात.

पिसू भुंगेऱ्यांच्या पुष्कळ जाती आहेत. त्यांमध्ये ज्वारी, मका, बाजरी, इतर गवते यांवरील कीटोकनेमा पुसेन्सिस, तागावरील लाँगिटार्सस बेलगॉमेन्सिस, मिरीवरील लाँ. नायग्रिपेनिस व द्राक्षावरील उघड्या [स्केलोडोंटा स्राजमयगिकोलीस → द्राक्ष] हे भुंगेरे महत्त्वाचे आहेत. त्याच्या नियंत्रणासाठी द्राक्षावर डीडीटी फवारतात. तागावर व ज्वारीवर १० % बीएचसी उडवितात व मिरीवर लिंडेन फवारतात.

पोखरकर, रा. ना.