काजवा: एकसारखा किंवा अधूनमधून निसर्गतः प्रकाश देणारा विशिष्ट कीटक. त्याच्या सु.दोन हजार जाती असून त्यांचा प्रसार उष्ण व समोष्ण कटिबंधात आहे.

काजवा

कोलिऑप्टेरा गणाच्या लॅपिरिडी व फेंगोडिडी कुलातील काजवे संख्येने बरेच, महत्त्वाचे व सर्वांना परिचित आहेत. कॅरॅबिडी, सेरँबिसिडी, इलेटॅरिडी, पौसिडी आणि स्टॅफिलिनिडी कुलांतील काजवे कमी महत्त्वाचे आहेत. अगदी थोड्याच काजव्यांच्या बाबतीत अंडे, अळी, कोश व प्रौढ या विकासाच्या सर्व अवस्थांत प्रकाशाची उत्पत्ती होते. तथापि बहुतेक सर्व काजवे फक्त अळी व प्रौढावस्थेत स्वयंप्रकाशी असतात.

काजवे साधारणतः दोन सेंमी. लांब, मऊ शरीराचे असून मंद काळसर, भुरे, पिवळे किंवा तांबूस रंगाचे असतात. त्यांचे एक वैशिष्टय म्हणजे त्यांच्या बहुतांशी माद्या अळीसारख्या असतात व त्या हालचाल कमी करतात. त्या पंखहीन व इलीट्रारहित (कठीण झालेले पुढचे पंख नसलेल्या) असतात. तसेच त्यांचे डोळेही कमी विकसित असतात. नरात प्रकाश देणारा अवयव उदराच्या सहाव्या व सातव्या खंडांत आणि मादीत त्यामागील खंडांत असतो. नर चांगले उडू शकतात व ते भरपूर उजेड देतात. त्यांना पंख असतात व डोळेही चांगले विकसित असतात. दिवसा ते लपून बसतात आणि रात्र झाली की बाहेर पडतात.

प्रौढावस्थेत काजव्यांना फारच थोडे अन्न लागते किंवा लागतसुद्धा नाही. मात्र त्यांच्या अळ्या मांसाहारी असतात आणि गोगलगाई व स्लग (कवचहीन गोगलगाय) यांवर त्या आपला उदरनिर्वाह करतात. त्या आपले खाद्य विळ्यासारख्या चिबुकास्थीने (जबड्यासारख्या अवयवाने) पकडतात. प्रत्येक चिबुकास्थीमध्ये अगदी बारीक वाहिन्या आडव्या असतात व त्यांमधून खाद्यावर गडद रंगाचा स्राव सोडला जातो. ह्या स्रावाने मॉलस्कांच्या (मृदुकाय प्राण्यांच्या) स्नायूंचे अपघटन (मूळ रेणूचे तुकडे पडून लहान रेणू अथवा अणू बनणे) होऊन बहुतांशी पचन बाहेरच होते. अळीमध्ये तयार अन्न सिबेरियमच्या (तोंडाच्या अगोदरच्या व तोंडाच्या अवयवांनी वेढलेल्या जागेच्या) साहाय्याने आत ढकलले जाते. अळ्यांना लाळग्रंथी नसतात.

काजव्यांचा प्रकाश असामान्य आहे. त्याला शीत प्रकाश असेही म्हणतात. तो बहुधा पांढरा, पिवळा, नारिंगी, हिरवट, निळा किंवा तांबूस असतो व तो जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरणरहित असतो. विकासाच्या विविध अवस्थांचा विचार करता प्रकाशाचे निश्चित कार्य काय याचा उलगडा होत नाही. परंतु प्रौढावस्थेत बहुतांशी तो नर व मादीला एकत्र आणण्याकरिता उपयोगी पडतो. या शीत प्रकाशाचा अभ्यास झाल्यास त्याचा व्यवहारात खूपच उपयोग करता येण्याची शक्यता आहे.

पहा : जीवदीप्ति

जमदाडे, ज. वि.