कीटक : कीटक हे संधिपाद (आर्थ्रोपोडा) संघाच्या कीटक (इन्सेक्टा) वर्गातील प्राणी होत. त्यांच्या शरीराचे शीर्ष (डोके), वक्ष (छाती) आणि उदर (पोट) असे तीन प्रमुख भाग पडतात. शीर्षावर मुखांगे (तोंडाचे अवयव), नेत्र व शृंगिकांची (सांधे असलेल्या लांब स्पर्शेंद्रियांची) एक जोडी असते. वक्षाचे तीन खंड (भाग) असून प्रत्येकाच्या अधर (खालच्या) पृष्ठावर पायांची एक जोडी असते म्हणूनच कीटकांना षट्पाद म्हणतात. पुष्कळ कीटकांना वक्षावर पायांशिवाय पंखांच्या दोन जोड्या असतात. उदराचेही खंड पडलेले असून त्यावर जननेंद्रिये आणि गुदद्वार असते.

संख्या व आकारमान : प्राणिसृष्टीत कीटकांच्या सर्वांत जास्त जाती असून नोंद झालेल्या प्राण्यांच्या एकूण जातींच्या त्या ७० टक्के आहेत. आतापर्यंत कीटकांच्या सु. सात लाख जातींची नोंद झालेली असून असंख्य जातींची नोंद अद्यापि व्हावयाची आहे.

सर्वसाधारणपणे कीटक लहान आकारमानाचे असून त्यांची लांबी ६—१० मिमी.पेक्षा अधिक नसते. आकारमान लहान असणे कीटकांच्या फायद्याचेच असते, कारण त्यामुळे पोषणाला थोडे अन्न लागते आणि राहण्यास व लपण्यास कमी जागा पुरते. यामुळेच कीटक इतर प्राण्यांना सहसा सापडत नाहीत. काही कीटक मात्र अतिशय लहान तर काही बरेच मोठे असतात. कोलिऑप्टेरा गणातील काही सूक्ष्म भुंगेरे आणि कॅल्सिड वंशातील काही परजीवी (अन्न किंवा आसरा या बाबतीत स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी दुसऱ्या जीवावर किंवा त्याच्या शरीरात राहणारे) कीटक यांची लांबी केवळ ०.२ मिमी. असते, तर फॅस्मिडा गणातील काही कीटकांची लांबी २५ ते ३३ सेंमी. भरते. 

प्रसार : जेथे वनस्पती उगवतात अशा सर्व भूभागांवर कीटक आढळून येतात यात बर्फाळ, वाळवंटी, दलदलीचे, अति-उष्ण असलेले व अतिपर्जन्यमानाचे प्रदेशही येतात.

बहुतेक कीटक स्थलचर असून ते जमिनीवर, मातीत, निरनिराळ्या वनस्पतींवर, साठविलेल्या अन्नधान्यात व इतर जैव (सेंद्रिय) पदार्थांत इतकेच नव्हे, तर काही इतर प्राण्यांच्या शरीरावरही रहात असतात. पाण्यात राहणाऱ्या कीटकांची संख्याही फार मोठी आहे. या जलचर कीटकांपैकी बहुतेक नद्या, नाले, तलाव, सरोवरे, विहिरी यांच्या गोड्या पाण्यात राहतात. ह्यांपैकी काहींचे संपूर्ण जीवनचक्र तर काहींच्या जीवनचक्रातील प्रारंभीच्या अवस्था पाण्यातच घडून येतात. हेमिप्टेरा व कोलिऑप्टेरा गणांतील काही कीटकांचा संपूर्ण जीवनक्रम पाण्यातच पार पडतो व ओडोनेटा गणातील चतुर, इफेमेरॉप्टेरा गणातील शेमटी किंवा शेंबडी (मेफ्लाय), प्लेकॉप्टेरा गणातील अश्म-पतंग (स्टोन फ्लाय) इ. कीटक प्रारंभीच्या अवस्थांमध्ये पाण्यात राहतात. कीटकांच्या काही जाती खाऱ्या पाण्यात त्याचप्रमाणे समुद्रातही आढळून येतात, परंतु अशा जाती थोड्याच आहेत. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे सायलोपा पेट्रोली या माशीच्या अळ्या (डिंभ) खनिज तेलाच्या विहिरीतही आढळून आल्या आहेत.

अन्न : कीटक प्रायः सर्वभक्षी असल्यामुळे अन्नाच्या बाबतीत त्यांच्याइतकी विविधता इतर कोणत्याच प्राणिवर्गात सापडत नाही. त्यांच्या अन्नात निरनिराळ्या वनस्पती, साठविलेले धान्य, इतर खाद्य पदार्थ, लाकूड, कपडे, लोकर, चामडे व इतर सर्व प्रकारच्या जैव पदार्थाचा समावेश होतो. काही कीटक इतर कीटकांवर आणि सूक्ष्म प्राण्यांवर जगतात, तर काही मनुष्याच्या आणि इतर प्राण्यांच्या रक्ताचे शोषण करतात.

शरीररचना व तिचे कार्य : कीटकांच्या शरीराचे रचनेच्या दृष्टीने बाह्य शरीररचना व आंतर शरीररचना असे दोन भाग पडतात. पहिल्या भागात कीटकाच्या शरीराचे अध्यावरण आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या उपांगांचा समावेश होतो. दुसऱ्या भागात शरीराच्या आतील निरनिराळी इंद्रिये आणि त्यांची तंत्रे (संस्था) ही येतात.

आ. १ . कीटकाच्या शरीराची रूपरेषा, पार्श्व रूपरेषा, पार्श्व दृश्य (शरीराचे तीन भाग अलग दाखविलेले आहेत): (१) संयुक्त नेत्र, (२) शृंगिका, (३) अक्षिका, (४) पश्चभाल, (५) उत्तरोष्ठ, (६) गुल्फ, (७) श्वासरंध्रे, (८) नखर, (९) अंतर्जंघिका, (१०) ऊर्विका, (११) शिखरक, (१२) कक्षांग, (१३) अंडनिक्षेपक, (१४) पुच्छिका, १५) कर्णपटल, (१६) पश्चपक्ष, (१७) अग्रपक्ष, (१८) पश्चवक्ष, (१९) मध्यवक्ष, (२०) अग्रवक्ष.

बाह्य शरीररचना : कीटकांच्या शरीराची उपत्वचा कायटिनाची बनलेली असून हे द्रव्य जलाभेद्य असते. बाह्यत्वचा ठिकठिकाणी कठीण झालेली असते. अशा कठीण भागांना दृढके म्हणतात. दोन द्दढकांमध्ये मृदू आणि लवचिक असा त्वचेचा भाग असतो, त्याला सेवनी म्हणतात. सेवनीमुळे कीटकांना इच्छित बाजूला हालचाल करता येते.

शीर्ष : हा शरीराचा अग्र भाग असून तो सहा शरीरखंडांचा बनलेला असतो. हे खंड दृढकांनी सांधून डोक्याची कवटी तयार होते. शीर्षावर मुखांगे, शृंगिका आणि नेत्र असतात. कीटकांमध्ये शीर्षाच्या मध्यावर λ च्या (उलट्या रोमन वाय अक्षराच्या) आकाराची एक सेवनी असून तिला अधिकपाल सेवनी असे म्हणतात. या सेवनीच्या दोन्ही भुजांमधील आणि पुढील भागाला भाल म्हणतात. भालाच्या मागे अधिकपाल असते. भालाच्या लगेच खाली व त्याला लागूनच पश्चभाल असते. पश्चभालाच्या खालच्या काठाला उत्तरोष्ठ जोडलेला असून त्याच्या आंतरपृष्ठावर स्वादेंद्रिये असतात.

शीर्षाच्या दोन्ही बाजूंना एकेक संयुक्त नेत्र आणि त्याच्या पुढच्या भागात व नेत्रांच्या आतल्या बाजूला एकेक शृंगिका असते अशा प्रकारे शीर्षावर संयुक्त नेत्रांची एक जोडी व शृंगिकांची एक जोडी असते. डोळ्यांच्या मागे आणि खाली असणाऱ्या डोक्याच्या भागास कपोल म्हणतात. कीटकांच्या डोक्यावर संयुक्त नेत्रांशिवाय प्रायः दोन किंवा तीन अक्षिकाही (साधे नेत्रही) असतात. शीर्ष लवचिक त्वचेने वक्षाशी जोडलेले असते त्वचेच्या या भागाला मान म्हणतात.

किटकांच्या मुखांगांत उत्तरोष्ठ, अधरोष्ठ, जंभ, जंभिका व जिव्हा हे प्रमुख भाग असतात. उत्तरोष्ठ व अधरोष्ठ हे तोंडाच्या पोकळीच्या अनुक्रमे वरच्या व खालच्या बाजूस आवरणासारखे असतात. जंभ (जबडे) चर्वणाकरिता असून प्रतिकारासाठीही कीटक त्यांचा उपयोग करतात. जंभिका हे साहाय्यक जबडे असून खाताना भक्ष्य धरून ठेवण्यास यांची मदत होते.

वक्षाच्या आत अन्ननलिकेच्या दोन्ही बाजूंस लालाग्रंथी असतात. त्यांच्या वाहिन्या जिव्हेच्या बुडाशी उघडतात. लाळेचा अन्नपचनासाठी मुख्यत्वे उपयोग होतो. रेशमाच्या किड्यामध्ये या ग्रंथीच्या रसापासून रेशमी धागा तयार होतो.

कीटकांच्या अन्न खाण्याच्या पद्धतीनुसार त्यांच्या मुखांगाचे रूपांतर झालेले असते. वेधन (खुपसण्याच्या) व चूषण (शोषणाच्या) मुखांगांत जंभ आणि जंभिका सुईसारख्या असतात. अशी अनेक प्रकारची रूपांतरीत मुखांगे निरनिराळ्या कीटकांत आढळून येतात.


कीटकांच्या डोक्यावर संयुक्त नेत्रांच्या आतल्या बाजूस बारीक शृंगिकांची एक जोडी असते. शृंगिका संधियुक्त असून सगळ्या बाजूंना हालविता येतात. त्या घ्राणेंद्रियांचे कार्य करतात. काही कीटकांमध्ये त्या स्पर्शेंद्रियांचे कार्य करतात. आकारमानाच्या आणि रचनेच्या दृष्टीने कीटकांच्या निरनिराळ्या जातींत शृंगिकांचेही रूपांतर झालेले असते. कीटकांमध्ये अक्षिका किंवा साधे नेत्र व संयुक्त नेत्र असे नेत्रांचे दोन प्रकार असून अक्षिकेत एकच भिंग असते. याच्या उलट संयुक्त नेत्र अनेक नेत्रिकांचा बनलेला असून प्रत्येक नेत्रिकेत एक भिंग असते. कीटकांचे दृष्टिज्ञान मानवासारखे नसते. प्रत्येक नेत्रिका पुढे असणाऱ्या वस्तूचा जेवढा भाग अगदी तिच्यासमोर असेल तेवढ्याच भागाची प्रतिमा उत्पन्न करते. अशा तऱ्हेने एखाद्या वस्तूची सबंध प्रतिमा तिच्या निरनिराळ्या भागांच्या लहान लहान प्रतिमांचे तुकडे एके ठिकाणी जुळून बनलेली असते. याला मिश्रदृष्टी म्हणतात. प्रकाशाच्या तीव्रतेत होणारे फरक व अंधार आणि प्रकाश यांतील फरक यांची नोंद करणे ही अक्षिकांची कार्ये होत.

आ.२. नाकतोड्याचे शीर्ष, उपांगे आणि मुख्य अंगे : (अ) अग्र दृश्य, (आ) पार्श्व दृश्य. (१) शृंगिका, (२) संयुक्त नेत्र, (३) अक्षिका, (४) जंभिका, (५) स्पर्शक, (६) जंभ, (७) उत्तरोष्ठ, (८) जिव्हा, (९) अधरोष्ठ.

वक्ष : शीर्ष व उदर यांच्या मधील भागास वक्ष म्हणतात. वक्षाचे अग्रवक्ष, मध्यवक्ष व पश्चवक्ष असे तीन खंड आहेत. प्रत्येक खंडावर पायांची एक जोडी असते. सपक्ष कीटकांमध्ये मध्यवक्ष व पश्चवक्ष यांवर प्रत्येकी एक पंखांची जोडी असते.

कीटकाच्या पायाचे पाच भाग असतात. वक्षाच्या अधर पृष्ठाला जोडलेल्या पायाच्या पहिल्या रूंद भागास कक्षांग म्हणतात. कक्षांगाच्या दूरस्थ टोकाशी एक लहान भाग असतो त्याला शिखरक म्हणतात. यानंतरचे भाग अनुक्रमाने ऊर्विका, अंतर्जंधिका आणि गुल्फ हे होत. गुल्फ पाच किंवा त्यापेक्षा कमी विभागांचे बनलेले असून शेवटच्या विभागावर नखरांची (नख्यांची) जोडी असते. कीटकांच्या पायांचा उपयोग चालण्यासाठी किंवा धावण्यासाठी होतो. परंतु काही कीटकांत पायांचे इतर काऱ्यासाठीही, उदा., भक्ष्य धरून ठेवण्यासाठी, जमीन उकरण्याकरिता, उडी मारण्याकरिता अथवा पोहण्यासाठी रूपांतर झालेले असते.

कीटकांच्या पंखाचा आकार सर्वसाधारणपणे त्रिकोणी असल्यामुळे त्याला तीन कडा असतात. पुढच्या बाजूला असणारी अग्र कडा, बाहेरच्या बाजूला असणारी शीर्षस्थ अथवा बाह्य कडा व आतील बाजूस असणारी आंतर कडा. पंखांमध्ये ठळक रेषांसारखे काही भाग दिसतात त्यांना शिरा म्हणतात. शिरांमुळे पंखांना मजबुती येते शिवाय कीटकांच्या जाती ओळखण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो.

आदिम (आद्य) गणातील कीटकांना पंख नसतात. सपक्ष उपवर्गांतील मुंग्या व वाळवी यांच्या वांझ माद्यांमध्ये व काही अन्य कीटकांतही पंखांचा ऱ्हास झालेला असतो. सपक्ष कीटकांना बहुधा पंखांच्या दोन जोड्या असतात, पंरतु डिप्टेरा गणातील कीटकांना एकच जोडी असून मागील पंखांच्या जोडीच्या ठिकाणी लहान गाठीसारखे प्रवर्ध (विस्तारीत वाढ) असून त्यांना संतोलक म्हणतात. पंखांमध्येही विविधता असते. काहींच्या पुढील जोडीतील पंख कठीण असतात. काहींचे पंख चामड्यासारखे चिवट तर काहींमध्ये ते शल्कांनी (खवल्यांनी) आच्छादिलेले असतात. पंखांचे असे अनेक प्रकार असून गणांना नावे देताना पंखांच्या लक्षणांचा उपयोग केला जातो. पंख हा कीटकांचा एक महत्त्वाचा अवयव असून त्यामुळे त्यांना अन्न, सहचारी किंवा सहचारिणी किंवा अंडी घालण्यासाठी योग्य वनस्पती इ. गोष्टी शोधण्याकरिता दूरवर जाता येते. पंखांमुळे कीटकांचा अन्य भागात फैलाव होतो. शत्रूपासून बचाव करण्याचेही पंख हे एक साधन आहे.

उदर : उदर हा कीटकाच्या शरीराचा तिसरा भाग असून प्राय: तो १० खंडांचा बनलेला असतो. पंरतु प्रोट्यूरा गणातील कीटकांचे उदर १२ खंडांचे असून इतर काही कीटकांमध्ये ते ११ खंडांचेच असते. उदराच्या शेवटच्या खंडांवर गुदद्वार असून काही कीटकांमध्ये याच खंडावर दोन स्पर्शग्राही पुच्छिका (शेपट्या) असतात.

उदराच्या अधर बाजूला कीटकांची जननांगे (प्रजोत्पादक इंद्रिये) असून नराच्या नवव्या खंडावर जनन-रंध्र व जननेंद्रिये असतात. नराच्या बाह्य जननेंद्रियात शिश्न, पॅरॅमिअरांची (कायटिनमय प्रवर्धांची) एक जोडी आणि आलिंगकांची एक जोडी यांचा समावेश होतो. आलिंगकांचा उपयोग मैथुनाच्या वेळी मादीला धरून ठेवण्यासाठी होतो. मादीची जननांगे सातव्या व आठव्या खंडांत असून तिच्या बाह्य जननेंद्रियास अंडनिक्षेपक म्हणतात. अंडी घालण्याकरिता अंडनिक्षेपकाचा उपयोग होतो पण काही गणांतील कीटकांमध्ये या भागाचे इतर कार्याकरिता रूपांतर झालेले असते. मधमाश्यांत आणि गांधील माश्यांत दंश करण्याकरिता त्याचे नांगीत रूपांतर होते वाळवंटी टोळाच्या मादीत तो पात्याच्या आकाराचा असून त्यामुळे मातीत अंडी घालणे सुलभ होते काही परजीवी कीटकांत तो अणकुचीदार असल्यामुळे पोषकाच्या (परजीवीला आश्रय देणाऱ्याच्या) शरीरात अंडी घालण्यास उपयुक्त असतो.

आ. ३. कीटकाच्या आंतरांगांची रूपरेषा : (१) मेंदू, (२) महारोहिणी, (३) ह्रदय, (४) मालपीगी नलिका, (५) पश्चांत्र, (६) मलाशय, (७) गुदद्वार, (८) जनन-रंध्र, (९) अधर तंत्रिका रज्जू, (१०) जननेंद्रिय, (११) मध्यांत्र, (१२) पेषणी, (१३) अन्नपुट, (१४) लालाग्रंथी, (१५) लालवाहिनी, (१६) ग्रसिका, (१७) शृंगिका, (१८) अक्षिका.

आंतर रचना: कीटकांच्या शरीरात अनेक महत्त्वाची इंद्रिये असून ती बाह्यत्वचेच्या आवरणामुळे सुरक्षित असतात. पचन, श्वसन, परिवहन (अभिसरण), तंत्रिकीय (मज्जासंस्था), जनन आणि उत्सर्जन (निरूपयोगी द्रव्य बाहेर टाकणारे) ही कीटकाच्या शरीरातील महत्त्वाची इंद्रिय तंत्रे होत.


पचन तंत्र : पचन तंत्रात आहारनाल (मुखापासून गुदापर्यंतचा नळीसारखा अन्नमार्ग) प्रमुख असून त्याचे अग्रांत्र (आतड्याचा पुढचा भाग), मध्यांत्र (आतड्याचा मधला भाग) आणि पश्चांंत्र (आतड्याचा शेवटचा भाग) असे तीन भाग पडतात. अग्रांत्राचे ग्रसनी (घसा), ग्रसिका (अन्ननलिका), अन्नपुट (अन्न साठविण्यासाठी आहारनालाचा (विशेषतः ग्रसिकेचा) झालेला पिशवीसारखा विस्तार) आणि पेषणी (अन्न कुटून बारीक करणारा स्नायुमय कोष्ठ) असे चार भाग असतात. द्रवरूप अन्न घेणाऱ्या कीटकांत ग्रसनीचा पंपासारखा उपयोग होतो व अन्न तोंडात घेतले जाते. ग्रसिका बारीक असून बऱ्याच कीटकांत तिचा पश्चभाग पिशवीसारखा असतो. त्याला अन्नपुट म्हणतात. अन्न मध्यांत्रात जाण्यापूर्वी अन्नपुटात साठविले जाते. अन्नपुटाला लागून पेषणी व तिला जोडलेली आणि मध्यांत्रात उघडणारी जठरागम (जठरात उघडणारी) झडप असते. अग्रांत्राच्या दोन्ही बाजूंना लालग्रंथी असून त्या तोंडात उघडतात. मध्यांत्र लहान असून त्याच्या अग्र टोकापासून जठर-अंधनाल (बाहेरच्या टोकाशी बंद असणाऱ्या नळ्या वा पिशव्या) निघालेले असतात. मध्यांत्रात मुखतः पचनाचे कार्य चालते. पश्चांत्र सुरुवातीस बारीक पण पश्च टोकोकडे फुगीर झालेले असते या फुगीर भागास मलाशय म्हणतात व त्याच्या बाहेर उघडणाऱ्या द्वाराला गुदद्वार म्हणतात.मध्य व पश्च आंत्रांच्या संधिस्थानावर बारीक मालपीगी नलिका (उत्सर्गी नलिका) असून त्या शरीरातील नायट्रोजनयुक्त क्षेप्यद्रव्यांचे (टाकाऊ पदार्थांचे) शोषण करून ते पश्चांत्रात सोडतात व तेथून ते गुदद्वाराच्या मार्गाने बाहेर पडतात.

श्वसन तंत्र :बहुतेककीटकांत श्वसन विशिष्ट वायुनलिकांच्या साहाय्याने चालते या नलिकांना श्वासनाल म्हणतात. श्वासनालांपासून अनेक बारीक शाखा निघालेल्या असून त्यांचे जाळे सर्व शरीरात पसरलेले असते. या बारीक शाखांना श्वासनलिका म्हणतात. बाह्य शरीरावर दोन्ही कडांना श्वासनालात हवा घेण्यासाठी रंध्रे (छिद्रे) असतात, त्यांना श्वासरंध्रे म्हणतात. श्वासरंध्रांना उघडझाप करण्याची व्यवस्था असते. कीटकांमध्ये श्वासरंध्रांच्या दहा जोड्या असून त्यांपैकी दोन वक्षावर आणि आठ उदरावर असतात. सर्वसाधरणपणे कीटकामध्ये वीस (दहा जोड्या) पेक्षा जास्त श्वासरंध्रे नसतात, मात्र काही कीटकांत त्यांची संख्या कमी असते.

बऱ्याच जलचर कीटकांच्या डिंभांमध्ये (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामानतः क्रियाशील असणाऱ्या पूर्व अवस्थांमध्ये, अळ्यांमध्ये) श्वासरंध्रांऐवजी श्वासनाल क्कोम (कल्ले) असून ते श्वासरंध्रे ज्या जागी असावयाची तेथेच असतात. जलचर कीटकांत श्वसन क्कोमांच्या साहाय्याने बाह्यत्वचेतून होते. श्वासरंध्रांतून घेतलेल्या ऑक्सिजनाचे श्वासनाल आणि श्वासनलिका यांच्याद्वारे सर्व शरीरात विसरण (आपोआप मिसळण्याची क्रिया) होऊन कार्बन डाय-ऑक्साइड त्याच पद्धतीने बाहेर टाकला जातो.

आ. ४. कीटकाचे हृदय, पृष्ठीय दृश्य : हृदयाचे तीन कोष्ठ आणि महारोहिणी दाखवली आहे. रुधिर परिवहनाचा मार्ग बाणांनी दाखविला आहे. (१) हृदय, (२) द्वार, (३) महारोहिणी.

परिवहन तंत्र : कीटकांच्या शरीरात पृष्टवाहिका ही मुख्य रुधिरवाहिका असून ती पृष्ठीय बाह्यत्वचेखाली व मध्यस्थित असते. पृष्ठवाहिका साधारणपणे शरीराइतकीच लांब असून तिचे पश्च टोक बंद असते. हिचे दोन भाग असून पुढचा भाग आखूड आणि मागचा लांब असतो. पुढचा आखूड भाग ही महारोहिणी होय. मागचा लांब आणि किंचित फुगीर भाग अनेक कोष्ठांचा बनलेला असून स्पंदनशील असतो. या भागाला ह्रदय म्हणतात. प्रत्येक कोष्ठाच्या दोन्ही बाजूंना एक एक याप्रमाणे द्वारांची एक जोडी असते. देहगुहा (शरीरातील पोकळी ) ही खरी देहगुहा नसून रुधिर गुहा असते.रुधिर गुहेतील रक्त कोष्ठ-द्वारांमधून हृदयात शिरते व हृदयाचा स्पंधनामुळे क्रमशः मागचा कोष्ठातून त्याच्या पुढच्या कोष्ठात जाते व अशा रीतीने अखेर महारोहिणीत शिरते. महारोहिणीच्या मोकळ्या तोंडातून ते शीर्षकोटरात (अनियमीत आकाराच्या पोकळीत व खळग्यात) जाते आणि तेथून ते रुधिर गुहेत परत जाते. रुधिर गुहेतून रक्त पुन्हा ह्रदयात शिरते. अशा रीतीने रुधिर परिवहनाचे कार्य सतत चालू असते. यावरून असे दिसून येईल की, कीटकांचे रक्त काही अंशी वाहिकांतून तर काही अंशी निश्चित भित्ती नसलेल्या लहानमोठ्या कोटरांतून वाहते. अशा प्रकाराच्या रुधिर तंत्राला अनावृत रुधिर परिवहन तंत्र म्हणतात.

रुधिर परिवहनामुळे पचन झालेले अन्न शरीरातील सर्व ऊतकांना (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या समूहांना) पोहोचविले जाते आणि ऊतकांत उत्पन्न होणारी क्षेप्यद्रव्ये उत्सर्जनांगांना (निरुपयोगी पदार्थाबाहेर टाकणाऱ्या अवयवांना) पोहोचविली जातात. शरीराच्या सर्व भागांना प्रवर्तकांचा (उत्तेजक स्त्रावांचा, हॉर्मोनांचा) पुरवठा रक्ताच्या द्वारेच होतो. त्याचप्रमाणे रक्त श्वसनक्रियेतही काही प्रमाणात भाग घेते.


तंत्रिका तंत्र: केंद्रिय तंत्रिका तंत्र, मुखजठर तंत्रिका तंत्र आणि परिणाह तंत्रिका तंत्र या तिन्हींचे मिळून तंत्रिका तंत्र बनलेले असते. [→तंत्रिका तंत्र].

केंद्रिय तंत्रिका तंत्रात अर्धग्रसिका – गुच्छिका (गुच्छिका म्हणजे ज्यांच्यापासून तंत्रिका-तंतू निघतात. अशा तंत्रिका – कोशिकांचा समूह) अथवा मेंदू, अधोग्रसिका गुच्छिका, या दोन्ही गुच्छिकांना जोडणाऱ्या परिग्रसिका – संयोजकांची एक जोडी आणि एक अधर, मध्यस्थित, गुच्छिकायुक्त दुहेरी तंत्रिकारज्जू (मज्जारज्जू) यांचा समावेश होतो. मेंदूचे पूर्वमस्तिष्क, मध्यमस्तिष्क आणि पश्चमस्तिष्क असे तीन भाग असून ते संयुक्त नेत्र, अक्षिका, शृंगिका आणि अनुकंपी तंत्रिका तंत्र इत्यादींचे तंत्रिकातंतूंच्या द्वारे नियंत्रण करतात.

मुखजठर तंत्रिका तंत्रामुळे आहारनालाच्या अग्रभागाचे व हृदयाचे नियंत्रण होते. सगळ्या गुच्छिकांपासून निघून शरीराच्या वेगवेगळ्या भागांना जाणाऱ्या सर्व तंत्रिकांचा समावेश परिणाह तंत्रिका तंत्रात होतो. हे तंत्र मुख्यत: त्वचेचे नियंत्रण करते.

तंत्रिका तंत्रामुळे कीटकांना ज्ञानेंद्रियांद्वारे परिस्थितीचे ज्ञान होऊन शरीराच्या प्रतिक्रियात्मक हालचाली आणि इतर अंतस्थ व्यवहार करता येतात.

उत्सर्जन तंत्र : शरीरातील क्षेप्यद्रव्ये बाहेर टाकणाऱ्या इंद्रियांपैकी उत्सर्गी नलिका प्रमुख होत. पण या तंत्रात वसापिंड (मध्यस्तरीय ऊतकातील चरबीसारखा दिसणारा पदार्थ) आणि इतर साहाय्यक इंद्रियांचाही समावेश होतो.

कीटकांच्या शरीरात उत्सर्गी नलिकांची संख्या २ ते १५० असू शकते. या नलिका नायट्रोजनयुक्त क्षेप्यद्रव्ये शोषून घेऊन आहारनालाच्या पश्च भागात सोडतात आणि ती गुदद्वारातून बाहेर पडतात.

जनन तंत्र : काही ठळक अपवाद सोडले तर कीटकांमध्ये लिंगे भिन्न असतात. पुष्कळदा आकारमान, रंग इ. लक्षणांवरून नर व मादी ओळखता येतात त्याचप्रमाणे गौण लैंगिक लक्षणांवरूनदेखील त्यांच्यातला फरक कळू शकतो. नर व मादीची जननेंद्रिये हृदयाच्या खाली पार्श्वोत्तर जागी असतात आणि त्यांनी बरीच उदरगुहा (पोटातील पोकळी) व्यापिलेली असते.

नरामध्ये वृषणांची (जनन ग्रंथींची) एक जोडी असून प्रत्येक वृषणात अनेक शुक्रनलिका असतात त्यांत शुक्राणू तयार होतात. शुक्राणू वृषणांतून शुक्रवाहकात येतात व शेवटी रेतोसेचनीच्या मार्गाने मैथुनाच्या वेळी शिश्नातून बाहेर पडतात. काही कीटकांमध्ये शुक्रवाहक पश्चभागाकडे रुंद होऊन त्यात शुक्राणू जमा होतात. या रुंद भागाला शुक्राशय म्हणतात. काही कीटकांमध्ये जनन तंत्राच्या काही भागांशी संलग्न असणाऱ्या काही साहाय्यक ग्रंथी असतात.

आ.५. (अ) नर कीटकाचे प्रारूपिक जनन तंत्र : (१) वृषण, (२) शुक्रवाहक, (३) शुक्राशय, (४) साहाय्यक ग्रंथी, (५) रेतोसेचनी, (६) शिश्न, (७) जनन-रंध्र (आ) मादी कीटकाचे जनन तंत्र : (१) अंतिम तंतू, (२) अंडाशय, (३) अंडाशयक, (४) कटोर, (५) शुक्रग्राहिका, (६) पार्श्व अंडवाहिनी, (७) शुक्रग्राहिका ग्रंथी, (८) अंडवाहिनी, (९) साहाय्यक ग्रंथी, (१०) जनन-रंध्र, (११) योनी.

मादीमध्ये अंडाशयांची एक जोडी असून प्रत्येकात नलिकेसारखे कित्येक अंडाशयक असतात. निरनिराळ्या जातींच्या कीटकांत अंडाशयकांची संख्या वेगवेगळी असते. प्रत्येक अंडाशयापासून एक पार्श्व अंडवाहिनी निघते. दोन्ही पार्श्व अंडवाहिन्या मागे एकमेकींना मिळून एक समाईक अंडवाहिनी तयार होते आणि ती योनिमार्गात उघडते. पक्व झालेली अंडी अंडाशयातून पार्श्व अंडवाहिनीत, तेथून समाईक अंडवाहिनीत आणि तिच्यातून योनिमार्गात जातात. योनिमार्ग अंडनिक्षेपकात उघडत असल्यामुळे कीटक अंडनिक्षेपकातून अंडी घालतात. समाईक अंडवाहिनीशी एक पिशवी संलग्न असते तिला शुक्रग्राहिका म्हणतात. हिच्यात मैथुनानंतर शुक्राणू साठविले जातात. समाईक अंडवाहिनीच्या दोन्ही बाजूंना एकेक श्लेष्म ग्रंथी असते. या ग्रंथीपासून स्त्रवणाऱ्या चिकट पदार्थाचा उपयोग घातलेली अंडी झाकण्याकरिता व चिकटविण्याकरिता होतो.

मैथुन : संभोगाच्या वेळी नर असंख्य शुक्राणू शिश्नाच्या द्वारे मादीच्या जननेंद्रियात घालतो. या शुक्राणूंच्या योगाने अंड्यांचे निषेचन (फलन) होते. बहुतेक माद्यांमध्ये मैथुन एकदाच होते. मैथुनानंतर नर लवकरच मरतो. मादी मात्र अंडी घालण्यासाठी काही काळ जिवंत राहते. मधमाश्यांची राणी सु. दोन वर्षे जिवंत राहून अंडी घालीत असते. काही कीटकांचे नर पुष्कळ माद्यांशी अनेक वेळा मैथुन करतात, तर पुष्कळ जातींत एकच नरमादी परस्परांशी अनेक वेळा मैथुन करतात.

जनन : कीटकांच्या बहुतेक माद्या, काही अपवाद सोडल्यास, निषेचनानंतर अंडी घालतात. काही दिवसानंतर या अंड्यांतून डिंभ बाहेर पडतात. मात्र काही कीटक अंडी घालण्याऐवजी लहान पिल्लांनाच जन्म देतात. मावा कीटकांची मादी अंडी न घालता अर्भकांना जन्म देते. अशा जननास जरायुजता असे म्हणतात. परंतु काही कीटकांमध्ये अनिषेचित अंड्यांपासूनच नवी प्रजा निर्माण होते. अशा प्रकाराच्या जननास ⇨ अनिषेकजनन म्हणतात.मावा,मधमाश्यांच्या वांझ माद्या इ. अनेक कीटकांत असे जनन आढळून येते. जननाचे आणखीही काही प्रकार आहेत. काही कीटकांमध्ये अप्रौढावस्थेतच जननकार्य सुरू होते. अशा जननाला शावकीजनन म्हणतात.माइएस्टर कीटकांचे डिंभ अनेक डिंभाना जन्म देतात आणि असे जनन अनेक पिढ्यांपर्यंत सुरू असते. त्यानंतर मात्र काही डिंभांचा विकास होऊन प्रौढ नर आणि माद्या तयार होतात व मैथुनानंतर डिंभ जन्माला येऊन शावकीजनन पुन्हा सुरू होते. काही कीटकांत एकाच अंड्यातून अनेक कीटक जन्मला येतात. अशा जननाला बहुभ्रूणता म्हणतात. जननाचा हा प्रकार हायमेनॅप्टेरा गणातील काही परजीवी कीटकांत आढळतो.


जीवनवृत : मैथुनानंतर बहुतेक माद्या अंडी घालतात. ती अतिशय लहान असून निरनिराळ्या आकारांची असतात. काही अंडी अलगअलग घातलेली असतात तर काहींचे पुंजके असतात. झुरळ, खंडोबाचा किडा यांसारख्या काही कीटकांत अंडी अंडसंपुट (अंड्यांना बंदिस्त ठेवणारी पिशवीसारखी संरचना) तयार करून त्यात घातलेली असतात. अंडी घालण्याच्या जागाही विविध असतात. काही कीटक झाडाझुडपांच्या निरनिराळ्या भागांवर अथवा त्यांच्या कोशिकांत अंडी घालतात काही जमिनीवर किंवा मातीत घालतात काही अन्नधान्यात, पाण्यात अथवा इतर कीटकांच्या शरीरावर किंवा शरीरात घालतात. अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या लहान जीवांना लगेच अन्न मिळेल अशी काळजी अंडी घालतानाच घेतलेली असते. निरनिराळ्या कीटकांच्या माद्यांची अंडी घालण्याची क्षमताही भिन्न असते. मावा कीटकांच्या काही जातींत मादी हिवाळ्यात केवळ एकच अंडे घालते, तर वाळवीची राणी प्रति सेकंदास एक याप्रमाणे हजारो अंडी घालते. पिकाचे नुकसान करणाऱ्या अनेक पतंगाच्या माद्दा १०० – ४०० अंडी घालतात.

अंडी घातल्यावर त्यातून लागलीच डिंभ बाहेर पडत नाहीत. अंड्यांत भ्रूणविकास पूर्ण झाल्यावरच त्यांतून डिंभ बाहेर पडतात. जरायुज कीटकांत भ्रूणविकास मादीच्या जननंगातच होतो. त्यामुळे अशा माद्या प्रत्यक्ष डिंभांनाच जन्म देतात.

अंड्यांतून बाहेर पडल्यावर जवळपास उपलब्ध असलेल्या अन्नावर डिंभाची वाढ होऊ लागते. कीटकांची वाढ होत असताना ते अनेक वेळा कात टाकीत असतात, म्हणजे त्यांच्या शरीरावरील सगळी बाह्यत्वचा निघून जाते. या क्रियेला निर्मोचन म्हणतात. झुरळात सात वेळा आणि टोळात पाच वेळा निर्मोचन होते शेंबडी (शेमटी) आणि अश्म-पतंग तर तीस पेक्षा जास्त वेळा कात टाकतात.

पूर्णरूपांतरण (स्वरूप व संरचना यांत पूर्ण बदल होणाऱ्या) असलेल्या कीटकांत कात टाकून डिंभांची वाढ पूर्ण झाल्यावर त्यांना कोशावस्था प्राप्त होते. ही अवस्था येणाच्या अगोदर पूर्ण वाढ झालेले डिंभ खाणे बंद करतात त्यांचे शरीर आकुंचन पावल्यासारखे दिसू लागते व त्यांच्या बाह्य त्वचेचे कोशावरणात रूपांतर होऊन त्यांना कोशावस्था येते. कोशात डिंभाचे संपूर्ण परिवर्तन होऊन प्रौढ कीटक बाहेर पडतो. अरूपांतरण अथवा अर्धरूपांतरण (रूपांतरण हा खालील परीच्छेद पहावा) असलेल्या कीटकांत कोशावस्था नसते, त्यामुळे डिंभ आणि प्रौढ कीटक यांत फारसा फरक नसतो. निरनिराळ्या कीटकांत डिंभावस्थेचा काळ भिन्न असतो. तो काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यत असू शकतो. तसेच पूर्णरूपांतरण असलेल्या कीटकांमध्ये कोशावस्थेचा काळही वेगवेगळा असतो.

प्रौढ कीटक पुन्हा जननाचे कार्य सुरू करतात. नाकतोड्यांची वर्षातून फक्त एकच पिढी तयार होते, तर माशी व इतर काही कीटकांच्या वर्षातून अनेक पिढ्या तयार होतात. काही कीटकांमध्ये डिंभावस्थेचा काळ फार मोठा असतो. अशा कीटकांची पिढी पूर्ण होण्यास वर्षाहून अधिक काळ लागतो. ग्रिष्म-मुद्‍गलात (जून बिटल) डिंभावस्था २—४ वर्षे असते, तर सिकाडामध्ये ती १७ वर्षांपर्यत असते.

रूपांतरण : अंड्यांतून बाहेर पडल्यावर कीटकांची क्रमश: वाढ होऊन त्यांच्या शरीरात स्थित्यंतरे घडून येतात. अशा निरनिराळ्या अवस्थांमधून कीटकांच्या होणाऱ्या विकासास रूपांतरण म्हणतात. आदिम गणांतील पंखहिन कीटकांची वाढ होत असताना जननेंद्रिंये व बाह्य जननांगे यांच्या विकासाशिवाय कोणतेच स्थित्यंतर होत नाही. म्हणून अशा कीटकांच्या विकासाला अरूपांतरण असे म्हणतात. बहुतेक कीटकांत मात्र निश्चित स्थित्यंतरे घडून येतात. अशा कीटकांच्या विकासाला रूपांतरण म्हणतात. रूपांतरणाचे अर्धरूपांतरण आणि पूर्णरूपांतरण असे दोन प्रमुख भाग पडतात.

अर्धरूपांतरण असलेल्या कीटकांमध्ये अंड्यातून बाहेर पडल्यानंतर वाढ होत असताना शरीरावर पंख व जननांगे विकास पावू लागतात. याशिवाय कोणतेच स्थित्यंतर आढळून येत नाही. अशा कीटकांच्या पिलांना अर्भक म्हणतात. अर्भक आणि प्रौढ शरीररचनेच्या बाबतीत जवळजवळ सारखेच असतात. हेमिप्टेरा, ऑर्‍थॉप्टेरा इ. गणांतील कीटकांमध्ये अर्धरूपांतरण आढळते.

बऱ्याच कीटकांचा विकास अंडी, डिंभ, कोश आणि प्रौढ अशा चार अवस्थांमधून होतो. अशा प्रकारच्या विकासाला पूर्णरूपांतरण म्हणतात. लेपिडॉप्टेरा, कोलिऑप्टेरा, डिप्टेरा वगैरे गणांतील कीटकांमध्ये पूर्णरूपांतरण असते.

ह्याशिवाय काही कीटकांत विकास होत असताना दोन वा त्यापेक्षा अधिक डिंभावस्था आढळून येतात. अशा कीटकांच्या रूपांतरणाला अतिरूपांतरण म्हणतात. असे रूपांतरण हिंग्यात (सोश्यात) आढळते.

स्वसरंक्षणाचे उपाय : कीटकांमध्ये विविध प्रकारची संरक्षणात्मक शरीररचना आढळून येते. काही कीटकांच्या अंगावर शुक (राठ केस) किंवा काटे असतात, तर काहींच्या शरीरातून विषारी द्रव स्त्रवतो. अशा कीटकांमध्ये विषारी केस असलेल्या अळ्या, हिंगे इत्यादींचा समावेश होतो. काही कीटकांची शरीररचना परिस्थितीशी बेमालूम जुळणारी असते, त्यामुळे शत्रूपासून त्यांचा बचाव होतो. फॅस्मिडा गणातील काही कीटक गवतासारखा आकार धारण करतात, तर काही फुलपाखरे, पंतग व इतर कीटक पानांचा व फुलांचा आकार किंवा रंग अथवा दोन्हीही धारण करतात. अशा परिस्थितिसादृश्यामुळे ते पक्ष्यांना सापडू शकत नाहीत. अशा सादृश्यास संरक्षक सादृश्य म्हणतात. मधमाश्या, गांधील माश्या इ. कीटकांना विषारी नांगी असते. काही फुलपाखरे व माश्या पक्ष्यांना किंवा बेडकांना खायला न आवडणाऱ्या फुलपाखरांचे रंगरूप धारण करतात. अशा प्रकारच्या सादृश्याला संरक्षक ⇨ अनुकृती म्हणतात. गोणी – शलभ (बॅगवर्म) व कंबल-पतंग (कॅडिस फ्लाय) यांच्या अळ्या आपल्याभोवती पाने, वाळलेल्या काटक्यांचे बारीक तुकडे इ. वस्तुंचे आवरण तयार करून स्वत:चे संरक्षण करतात. हेमिप्टेरा गणातील काही ढेकणांच्या अंगातून घाण वास येणारा द्रव स्त्रवतो, काही कीटकांच्या शरीरावर भीती वाटावी असे अवयव असतात. वाळवी, मुंग्या व मधमाश्यांसारखे समाजप्रिय कीटक घरे (वारुळे किंवा पोळी) बांधून संरक्षणाची तरतूद करतात. असे अनेक उपाय योजून कीटक स्वसंरक्षण करतात. [→ मायावरण ]

दीप्ती : बऱ्याच कीटकांमध्ये प्रकाश निर्माण करणारी विशिष्ट इंद्रिये असतात. कोलिऑप्टेरा गणातील काही डिंभात व मुद्‍गलांत (भुंग्यांत) ही इंद्रिये उदराच्या पश्च टोकाकडे असून त्यांवर पारदर्शक बाह्यत्वचेचे आवरण असते. या कीटकांपैकी काजवा सर्वांच्या परिचयाचा आहे. अशा कीटकांनी निर्माण केलेला प्रकाश हिरवट पिवळा, हिरवा, नारिंगी अथवा लालसर असतो. प्रकाशाची निर्मिती करणारी अशी इंद्रिये शरीराच्या इतर भागांवरही असू शकतात. ही इंद्रिये विशिष्ट कोशिकांची बनलेली असून त्या कोशिकांत ल्युसिफेरीन हे द्रव्य असते. या द्रव्याचे ल्युसिफेरेज एंझाइमाच्या (शरीरातील रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या पदार्थाच्या) साहाय्याने ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन] होऊन प्रकाश उत्पन्न होतो. या प्रकाशापासून उष्णता उत्पन्न होत नाही म्हणून त्याला शीत प्रकाश म्हणतात. नर आणि मादी मैथुनकाली परस्परांना आकर्षित करण्याकरिता या प्रकाशाचा उपयोग करतात [→ जीवदीप्ती ]


समाजप्रिय कीटक : बहुतेक कीटकांचे जीवन एकाकी असते. नर-मादीचे मैथुनकालात होणारे मीलन सोडले तर एकाच जातीतील कीटकांचा परस्परांशी संबंध नसतो. टोळ एकत्र संचार करीत असलेले दिसतात, परंतु या समुदायातील प्रत्येक टोळ एकाकीच असतो. हे टोळ आपल्या संततीचीही काळजी घेत नाहीत. या उलट हेलिक्टस नावाची एकाकी माशी जमिनीत लहान लहान छिद्रे करून प्रत्येकात एक अंडे व त्यातून बाहेर पडणाऱ्या जीवास लागणारे अन्न ठेवते आणि अंड्यांचे व त्यातून बाहेर पडणाऱ्या डिंभांचे रक्षण करते. आपल्या पत्याची, निदान त्याच्या आरंभावस्थेत, काळजी घेण्याची ही प्रवृत्ती सामाजिक जीवनाची सुरुवातच म्हणावयास पाहिजे.काही कीटकांत सामाजिक जीवन बरेच उन्नत झालेले असते. अशा कीटकांत वाळवी, मधमाश्या, मुंग्या वगैरे कीटकांचा समावेश होतो. या कीटकांची कुटुंबसंस्था प्रायः नर-मादीच्या एकाच जोडीपासून अथवा एका बीजधारणा झालेल्या मादीपासून तयार होते आणि ती अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहते. या कुटुंबसंस्थेत घराचे रक्षण, पिलांची जोपासना, अन्नसंचय वगैरे नियोजित कामे कुटुंबीयांकडून होत असतात. समाजप्रिय कीटकांचे आयुष्य एकाकी कीटकांपेक्षा साधारणपणे जास्त असते.

महत्त्व : कीटकांची संख्या अगणित असून प्राण्यांच्या एकूण जातींपैकी ७० टक्के जाती कीटकांच्या आहेत. ते जमिनीवर त्याचप्रमाणे पाण्यातही राहतात. माणसाला भक्ष्य म्हणून उपयोगी पडणारे मासे, बेडूक इ. प्राणी जलचर व इतर कीटक यांच्यावर उपजीविका करतात. पुष्कळ वन्य जमाती कीटकांचा खाण्यासाठी उपयोग करतात. काही कीटकांपासून मिळणारे रेशीम, मध, लाख इ. पदार्थ जीवनोपयोगी असून त्यांच्यापासून माणसाला बराच धनलाभही होतो. शिवाय, काही परजीवी व हिंस्त्र कीटक पिकांचे नुकसान करणाऱ्या कीटकांवर जगत असल्यामुळे हानिकारक कीटकांचे नियंत्रण करण्याकरिता अशा कीटकांचा उपयोग होतो. परंतु कीटकांचे महत्त्व केवळ त्यांच्यामुळे होणाऱ्या फायद्यामुळेच नसून त्यांच्यामुळे होणाऱ्या अपरिमित हानीमुळेही आहे. कीटकांच्या अनेक जाती पिकांवर आक्रमण करून करून पिकांचे नुकसान करतात. साठविलेले धान्य, लाकूड, रेशीम, लोकर, कागद इ. अनेक पदार्थांवर ते उपजीविका करीत असल्यामुळे त्यांच्यापासून फार मोठे नुकसान होते. ढेकूण, उवा, डास वगैरे कीटक माणसांचे व पाळीव जनावरांचे रक्तशोषण करतात. अनेक कीटक माणसांच्या व पाळीव जनावरांच्या काही रोगांचा प्रसार करतात त्यात डासांमुळे हिवताप, पीतज्वर, हाडमोड्या ज्वर माश्यांमुळे कॉलरा, हगवण, क्षय पिसवांमुळे प्लेग अशा अनेक रोगांचा समावेश होतो. काही कीटक वनस्पतीच्या विषाणुजन्य (व्हायरसजन्य) रोगांचा प्रसार करून फार मोठी हानी करतात.

रोग : कीटकही रोगांपासून मुक्त नाहीत. त्यांना होणाऱ्या रोगांत सूक्ष्मजंतुजन्य रोग, कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहीत सूक्ष्म वनस्पतिजन्य) रोग, विषाणुजन्य रोग, प्रजीवजन्य (एककोशिक जीवांमुळे म्हणजे प्रोटोझोआंमुळे होणारे) रोग व सूत्रकृमिजन्य (नेमॅटोडजन्य) रोग हे मुख्य होत.

सूक्ष्मजंतूंमुळे मधमाश्यांच्या डिंभांचा ‘परिदूषित संतती’ हा रोग, टोळांची आव, जपानी मुद्‍गलांचा दुध्या रोग इ. रोग होतात. ‘परिदूषित संतती’ या रोगामुळे मधमाश्यांचे डिंभ मोठ्या प्रमाणात मरून मधुमक्षिकापालन कार्यात मोठीच अडचण निर्माण होते. या रोगावर उपचार करून मधमाश्यांना वाचविता येते. टोळ व जपानी मुद्‍गल हे हानिकारक कीटक असल्यामुळे त्यांना होणाऱ्या रोगांचा या कीटकांच्या जैव नियंत्रणाकडे उपयोग होण्यासारखा आहे. या दृष्टीने बॅसिलस थुरिंजिएन्सिस हा सूक्ष्मजंतू महत्त्वाचा आहे. या सूक्ष्मजंतूमुळे रेपिडॉप्टेरा गणातील बऱ्याच कीटकांच्या अळ्यांना रोग होतात म्हणून त्यांचा उपयोग कीटकांचे नियंत्रण करण्याकरिता होऊ लागला आहे. तसेच त्यांच्यापासून कीटकनाशक द्रव्येही तयार करण्यात आलेली आहेत.

कवकांच्या अनेक जातींपासून कीटकांना रोगबाधा होते. कवक कीटकांच्या त्वचेतून आत घुसून आतील उतकांमध्ये वाढते. लेपिडॉप्येरा, डिप्टेरा इ. गणांतील कीटकांना एम्पूसा एंटॉमॉप्थोरा वंशांतील अनेक कवकांपासून रोग होतात.

कीटकांना रोगग्रस्त करणाऱ्या विषाणूंमध्ये बहुतल (अनेक पृष्ठे असलेल्या घन वस्तूच्या आकाराचे, पॉलिहेड्रल) विषाणू विशेष महत्त्वाचे असून त्यांच्यापासून मुख्यत्वे लेपिडॉप्टेरा गणातील कीटकांना रोग होतात. थोड्याफार प्रमाणात हायमेनॉप्टेरा, डिप्टेरा व इतर काही गणांतील कीटकांनाही ह्या विषाणूंपासून रोग होतात. बोरेलिना काँपिओलिस हा विषाणू पिकांवरील काही कीटकांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे.

प्रोटोझोआ संघातील अनेक एककोशिक जीवांपासून कीटकांना रोग होतात. यांपैकी रेशमाच्या किड्यांचा (अळ्यांचा) पेब्राइन रोग आणि मधमाश्या व नाकतोडे यांना अमीबामुळे होणारा उत्सर्गी नलिकेचा रोग हे महत्त्वाचे आहेत.

कीटकांना सूत्रकृमींमुळे रोग होतात. गोलकृणींच्या एक हजाराहून अधिक जाती कीटकांना अपायकारक असल्याचे आढळून आले आहे. निओअँप्लेक्टाना वंशाच्या काही जाती कीटकांच्या जैव नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत.

नियंत्रण : कीटकांमुळे होणारी हानी टाळण्यासाठी त्यांच्या नियंत्रणाकरिता उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. कीटक नियंत्रणाच्या अनेक पद्धती असून त्यांत यांत्रिक नियंत्रण, संवर्धन नियंत्रण, भौतिक नियंत्रण, रासायनिक नियंत्रण, जैव नियंत्रण, विलग्नवास (क्वारंटाइन) नियंत्रण इ. पद्धती महत्त्वाच्या आहेत. या सर्व पद्धतींत रासायनिक नियंत्रणाचा वापर विस्तृत प्रमाणावर करण्यात येत असून त्यासाठी विविध कीटकनाशके उपलब्ध आहेत. कीटक नियंत्रण यशस्वी करण्यासाठी कोणत्याही एका पद्धतीवर विसंबून न राहता शक्य असेल तितक्या पद्धतींचा उपयोग करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे नियंत्रण करण्याच्या पद्धतीस संकलित नियंत्रण म्हणतात [→ कीटक नियंत्रण]

उदयकाल व क्रमविकासाची रूपरेषा : कीटकांची उत्पत्ती केव्हा झाली हे जरी निश्चित सांगता येत नसले, तरी जीवाश्मांवरून (खडकांतील पुरातन अवशेषांवरून) त्यांची उत्पत्ती आर्थोपोडा संघातील ट्रायलोबाइटांपासून झाली असावी असे मानण्यास बरीच जागा आहे, हे प्राणी पुराजीव महाकल्पात सु. चाळीस कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर होते व त्यांचे अस्तित्व चौदा कोटी वर्षे टिकून होते. सर्वात पुरातन कीटक उत्तर कारबॉनिफेरस कल्पातील (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकांत आढळले आहेत. त्यानंतरच्या पर्मियन कल्पात (सु. २७.५ ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) शंकुमंत (शंकूच्या आकाराचे प्रजोत्पादक इंद्रिय असलेल्या) वनस्पतींची जंगले उत्पन्न झाली व पूर्ण रूपांतरण असलेल्या कीटकांचा उदय झाला.

हल्लीच्या कीटकांशी तुलना करता पुराजीव महाकल्पातील कीटक आकारमानाने फारच मोठे होते. कारबॉनिफेरस कल्पातील चतुरांसारख्या काही कीटकांच्या पंखांचा विस्तार ७५ सेंमी. एवढा होता. पर्मियन कल्पात मात्र त्यांचे आकारमान लहान होऊ लागले.

मध्यजीव महाकल्पात (सु.२३ ते ९ कोटी वर्षापूर्वीच्या) ट्रायासिक (सु. २३–२० कोटी), जुरासिक (सु. १८.५–१५.५ कोटी) व क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी ) कल्पांचा समावेश होतो. या काळात पुराजीव महाकल्पातील पूर्णरूपांतरण असलेल्या कीटकांमध्ये बरीच भर पडली व काही नविन गण अवतरले. मात्र बहुतेक पुराजीवी कीटकगणांचा नाशही झाला. ट्रायासिक कल्पात उत्पन्न झालेल्या गणांत मेकॉप्टेरा, पॅराट्रायकॉप्टेरा, न्यूरॉप्टेरा, ओडोनेटा, कोलिऑप्टेरा वगैरे गणांचा समावेश होतो. जुरासिक कल्पात लेपिडॉप्टेरा सोडून सध्या आढळून येणाऱ्या गणांमधील ठळक फरक दिसू लागले. कीटकांच्या जीवाश्मांची संख्या क्रिटेशस कल्पातील खडकांमध्ये कमी दिसून येते. या काळातील खडकांत आढळणारे बहुतेक जीवाश्म कोलिऑप्टेरा गणांतील कीटकांचे आहेत. लेपिडॉप्टेरा गण याच काळात अचानक उत्पन्न झाला.


नवजीव महाकल्पात (सु. ६.५ कोटी वर्षांपूर्वीपासून ते आजपर्यंत काळात) तृतीय (सु. ६.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वींच्या) आणि चतुर्थ (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वींच्या) कल्पांचा समावेश होतो. या महाकल्पात सपुष्प वनस्पतींची वृद्धी झाली व मधमाश्या आणि वाळवी या कीटकांचा विकास झाला. या महाकल्पात कोलिऑप्टेरा गणातील कीटकांचा बराच प्रभाव दिसून येतो. सध्या माहिती असलेल्या कीटकांपैकी बहुतेक कीटकांचे जीवाश्म जगाच्या निरनिराळ्या भागांतील तृतीय कल्पातील खडकांमध्ये आढळतात.

निरनिराळ्या काळांत सापडलेल्या अशा कीटकांच्या जीवाश्मांवरून त्यांच्या क्रमविकासाची (उत्क्रांतीची ) बरीच कल्पाना येते. कीटकजीवाश्म व आजचे कीटक यांच्या शरीररचनेच्या तुलनात्मक अभ्यासावरून कीटकांच्या क्रमविकासाचे तीन भाग पडतात. पहिल्या भागात समावेश होणाऱ्या कीटकांमध्ये वक्षावर साधी परंतु कार्यक्षम पंखांची बाह्यवाढ दिसू लागली. मात्र बसलेल्या स्थितीत कीटकांना हे पंख उदरभागावर मिटून घेता येत नव्हते. अशा कीटकांपैकी ⇨ चतुर व शेंबडी हे आजही आढळतात. दुसऱ्या भागातील कीटकांच्या पंखांवर शिरा निर्माण होऊ लागल्या आणि या कीटकांना पंख मिटून त्यांनी उदरभाग झाकता येऊ लागला. ऑर्‍थॉप्टेरा व हेमिप्टेरा गणांतील कीटक असे आहेत. क्रमविकासाच्या तिसऱ्या भागात पूर्णरूपांतरण असलेल्या कीटकांचा विकास होऊ लागला. असा क्रमविकास सु. २२.५ कोटी वर्षापूर्वी सुरू झाला. त्यावेळी पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या क्रमविकासाला नुकतीच सुरुवात झालेली होती.  पहा : आर्थोपोडा जीवाश्म. संदर्भ : 1. Imms, A. D. A General Textbook of Entomology, Bombay, 1957.

2. Klots, A. B. Klots, E. B. Living Insects of the World, London, 1959.

3. Metcalf, C. L. Flint, W. P. Destructive and Useful Insects, New York, 1962. 4. Ross, H. H. A Textbook of Entomology, New York, 1964. बोरले, मु. नि.              “