आ. 1. एफेस्टिया क्युनिएला : (अ) अळी, (आ) केष, (इ) पतंगपिठातील पतंग : लेपिडॉप्टेरा गणाच्या पायरॅलिडॉइडिया अधिकुलाच्या फायसिटिडी पतंगकुलात या कीटकांचा समावेश होतो. हे कीटक मुख्यत्वे पिठाची नासाडी करतात. त्यांच्या जीवनचक्रातील सर्व अवस्था पिठातच आढळतात.उष्ण व उपोष्ण कटिबंधांत सर्वत्र ह्यांचा प्रसार झालेला आहे समशीतोष्ण प्रदेशांत देखील उबदार हवामानात हे आढळतात. या कीटकांचे मूलस्थान यूरोपातील भूमध्यसामुद्रिक प्रदेशात असावे परंतु आता सर्व जगभर त्यांचा प्रसार झाला आहे. पिटाच्या गिरण्या, धान्य आणि पीठ साठविण्याची गुदामे, बिस्किटे व चॉकलेट-टॉफीचे कारखाने वगैरे ठिकाणी हे प्रामुख्याने आढळतात.

युरोपमधील जातीचे शास्त्रीय नाव एफेस्टिया क्युनिएला किंवा आता अनागॅस्टा क्युनिएला आणि अमेरिकेतील जातीचे प्‍लोडिया इंटरपंक्टेला असे आहे. दोन्ही जातींचे कीटक सर्व जगभर सारखेच आढळतात. या दोन्ही जातींमध्ये बरेच साम्य आहे. 

आ. 2. प्लोडिया इंटरपंक्टेला : (अ) अळी, (आ) केष, (इ) पतंगप्रौढ कीटकाची लांबी सु. १ सेंमी. असते. रंग फिकट करडा असून त्यावर धातवीय चमक असते. प्‍लोडियाच्या पंखांचा रंग अंगावर चमकदार पांढरा व टोकाकडे लालसर उदी असतो. पंखावरच्या शिरा स्पष्ट दिसतात. एफेस्टियाच्या पंखांवर दोन फिकट काळसर नागमोडी पट्टे असतात. पंखांच्या कडांवर बारीक केस असतात. शृंगिका (सांधेयुक्त लांब स्पर्शेंद्रिये) लांब व लवचिक असून कीटक बसल्यावर त्या त्याच्या पाठीवर दुमडून घेतल्या जातात. पंख शरीरावर मिटले जातात. मादी नरापेक्षा लहान आणि फिकट रंगाची असते. मादी गुदामाच्या भिंतींच्या फटींमध्ये, पोत्यांच्या शिवणीमध्ये वा सरळ पिठात वा धान्यातच अंडी घालते. मादी पांढरट, लांबोडकी, अगदी बारीक, एकएक किंवा १२ ते ३० च्या समूहांमध्ये एका वेळी ३०० ते ४०० अंडी घालते. ३ ते ६ दिवसांत अंडी उबून अळ्या बाहेर पडतात. एफेस्टियाची अळी पिवळट रंगाची तर प्‍लोडियाची फिकट गुलाबी किंवा हिरवट रंगाची असते. अंगावर तुरळक केस असतात. या अळ्या पिठातून वावरतात आपल्या शरीरातून स्त्रवणार्‍या एक प्रकारच्या चिकट स्त्रावापासून स्वत:भोवती एक नळीसारखे किंवा बोगद्यासारखे आवरण तयार करतात. त्यामुळे त्या वावरतील त्या सर्व पिठात या चिकट नळ्या व जाळ्या आढळतात. या वेळी अळ्या पिठाची सर्वांत जास्त नासाडी करतात. या आवरणास पीठ चिकटून बसते आणि त्याची गोळी तयार होते. अळी अवस्थेचा कालावधी वातावरणातील उष्णतामानावर अवलंबून असतो. वातावरण थंड असेल तर कोषावस्था कधीकधी दोन वर्षांनंतर देखील येते परंतु साधारणपणे १२-१५ दिवसांनंतर अळी कोषावस्थेत जाते. या वेळी अळीची वाढ पूर्ण झालेली असून तिची लांबी २ ते २.५ सेंमी. झालेली असते. पिठाच्या व धान्याच्या पृष्ठभागावर येऊन अळ्या तिथे कोष करतात. कोष लांबट असून त्याचा रंग रेशमासारखा पांढरट असतो. कोषातून प्रौढ कीटक बाहेर पडण्याचा काळदेखील हवेतील उष्णतामानावर अवलंबून असून तो ४ ते ३० दिवस असा असतो. सर्वसाधारण उबदार हवामानात कीटकाचे जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी सु. ४ ते ६ आठवडे लागतात.

या पीडक कीटकांमुळे धान्याची विशेषत: पिठाची होणारी नासाडी थांबविणे हा एक मोठाच प्रश्न आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये धान्याऐवजी (गहू, तांदूळ, सोयाबीन इ.) मोठ्या प्रमाणावर ती दळून तयार पीठच विकण्याची प्रथा असल्याने त्या देशांमध्ये हा प्रश्न जास्त उद्‍भवतो. धान्य, पीठ, गवताचे बी, खाद्यपदार्थ, बिस्किटे, टॉफी, सुकी फळे घालून केलेली चॉकोलेटे, सोयाबीन, वाळलेली फळे, मुळे, दुधाची भुकटी, मृत कीटक, वस्तुसंग्रहालयातील चर्मपूरित (पेंढा भरलेले) प्राण्यांचे नमुने, प्राण्यांची कवचे व काती, विष्ठा, मधाच्या पोळ्यातील मेण व त्यातील परागकण इतके विविध प्रकारचे पदार्थ या कीटकांचे खाद्य असते परंतु सर्वात जास्त उपद्रव धान्याच्या पिठालाच होतो. पिठात हे पतंग झाल्यावर पिठाचा रंग बदलून त्याला मळकट पिवळट रंग येतो. सर्व पिठात अळ्यांची आवरणे (नळ्या) विखुरलेल्या असतात. त्यांना पीठ चिकटून पिठात सर्व जाळ्या व गोळ्या होतात. पिठाला बुरशीसारखा उबट वास येतो. जाळ्या काढून पीठ स्वच्छ केल्यानंतर देखील ते खाण्यालायक राहत नाही.

या कीटकांचा प्रसार बहुतकरून पिठाची व धान्याची पोती, खाद्य पदार्थांचे डबे, खोकी इत्यादींमधून होतो. त्यांचे अस्तित्व लक्षात आल्यावर त्यांचे खाद्य (धान्य, पीठ वगैरे) जाळून नष्ट करतात. साठवणीची पोती, खोकी, मांडण्या व गुदामे धुवून नंतर त्यांवर व गुदामात योग्य ते कीटकनाशक फवारतात. 

यांचा प्रतिबंध करण्यासाठी बरेच उपाय योजले गेले असले, तरी त्या सर्वांवर मात करून ह्या कीटकांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. यांच्या प्रतिबंधासाठी धान्याचे पीठ होत असताना गिरणीतच उष्णतेच्या साहाय्याने पीठ निर्जंतुक करतात किंवा कीटकनाशक रसायनांची धुरी पिठाला देतात. यांशिवाय गुदामातील पोत्यांची मांडणी अधून मधून बदलतात. गुदामात २.५ %  मिथॉक्सिक्लोर, ०.५ % पायरेथ्रीन किंवा अलेथ्रीन यांचा फवारा जास्त उपयुक्त ठरतो.पिठाची पोती पायरेथ्रीन किंवा पायपरोनिल ब्युटॉक्साइड व पायरेथ्रीन यांच्या १० : १ मिश्रणात बुडवून काढून मग वापरल्यास या पतंगांचा त्रास बराच कमी होतो.

जोशी, लीना